आपल्या प्रदेशाबद्दल- इतिहासाबद्दल पाश्चात्त्यांशी, पाश्चात्त्यांच्याच भाषेत अधिकाधिक बोललं गेलं पाहिजे, हा वस्तुपाठ मूळचे इजिप्तचे डॉ. एडवर्ड सैद यांनी ‘ओरिएन्टॅलिझम’ या युगप्रवर्तक ग्रंथाद्वारे घालून दिलेला आहेच- वाएल शॉकी हा दृश्यकलेची भाषा वापरून तेच करतोय..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाएल शॉकी हा काही थोर चित्रकार वगैरे नाही. तो आज ५३ वर्षांचा आहे आणि पुढल्या काही वर्षांतच तो थोर ठरेलसुद्धा ; पण त्याला लोक ‘चित्रकार’ असं न म्हणता ‘दृश्यकलावंत’ म्हणतील.. त्याची कलाकृती व्हेनिस बिएनालेमध्ये इजिप्तच्या दालनात असणं, हे त्याचा मान वाढवणारं आहेच. पण त्या दालनात काय होतं? तर पाऊण तासांची एक फिल्म आणि काही शिल्पं.. ही शिल्पं फर्निचरसारखी वाटत होती. उदाहरणार्थ, इथं एक अंडगोलाकृती डायिनग टेबलासारखं टेबल होतं. या टेबलाला खूप पाय होते खेकडय़ासारखे.. आणि हे पाय एकसारख्या उंचीचे नसल्यामुळे ते टेबल म्हणजे कुणीतरी प्राणी आहे, तो चालतोय असं पाहाताक्षणी वाटत होतं. किंवा एक कपाट होतं आणि त्यात चिनीमातीच्या मोठय़ा बशांवर इंग्रजांच्या अमलाखाली इजिप्त असतानाच्या काळातली चित्रं निळय़ा रंगात छापलेली होती. फिल्मचा संबंध या टेबलाशी होता आणि बशांवरल्या चित्रांशीही होता. फिल्म पाहून झाल्यावर ती शिल्पं निराळीच भासत होती.. असं काय होतं एवढं त्या पाऊण तासांच्या फिल्ममध्ये?

 ‘ड्रामा १८८२’ हे त्या फिल्मचं नाव. भारतात पाय रोवण्यासाठी १८५७ चा उठाव ब्रिटिशांनी जसा चिरडला, तशीच इजिप्तमध्ये १८७९ पासून लढवय्या अहमद उराबी याच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली सशस्त्र चळवळ १८८२ मध्ये ब्रिटिशांनी चिरडून टाकली आणि इजिप्तवर कब्जा केला. त्याआधी शंभर वर्षांपूर्वी इजिप्तवर नेपोलियनचाही डोळा होता. मात्र कैरोतल्या लोकांच्या उठावामुळे १७८९ च्या ऑक्टोबरात फ्रेंच फौजांना काढता पाय घ्यावा लागला आणि १८०५ मध्ये मोहम्मद अलीची राजवट इथं आली, त्या घराण्याचा सहावा वंशज खेदिवे तौफीक पाशा याचा उराबी हा सेनापती. पण या खेदिवेनं ब्रिटिश व्यापाऱ्यांना मुक्तद्वार द्यायला सुरुवात केली, त्यांची तैनाती फौज ठेवायलाही होकार दिला, याविरुद्ध उराबी उभा राहिला. पण उराबीच्या नेतृत्वाखाली पसरत गेलेली चळवळ दाबण्यात ब्रिटिशांना यश मिळालं, ते कसं?

याचीच गोष्ट वाएल शॉकी सांगतोय. ती पडद्यावर असली, इतिहासाबद्दल असली, तरी डॉक्युमेण्टरी नाही.. ती संगीतिका आहे- ऑपेरा! अरबी भाषेत (इंग्रजीत वाचता येणाऱ्या अनुवादपट्टीसह) हा ऑपेरा रंगमंचावर नेपथ्य (सेट) लावून सादर होतोय आणि काही वेळा समीपदृश्यं असली तरी बऱ्याचदा प्रेक्षकांसमोर अख्खा रंगमंच आहे. या फिल्ममधली पात्रं अगदी तालात गायल्यासारखी बोलतात. त्यांच्या हालचालीसुद्धा अगदी नृत्यमय नाही, पण तालात होतात. उदाहरणार्थ दोन गटांमध्ये वाद होतो आहे, तेव्हा बोलत असणाऱ्या गटाचे लोक पुढे झुकतात आणि ऐकावं लागणाऱ्या गटाचे लोक उभ्याउभ्याच मागे झुकतात. या हालचाली नृत्यमय नाहीत, पण शैलीदार आहेत. यातून अख्ख्या फिल्मला दृश्याचीही लय मिळाली आहे. नेपथ्य शहरातल्या निरनिराळय़ा भागांचं आहे, कधी खेदिवे तौफीक याच्या गढीचंही आहे आणि ऑपेराच्या नऊ भागांत फिल्म विभागली गेली असल्यानं प्रत्येक दृश्य निरनिराळय़ा ठिकाणी घडतं. हे सारं नेपथ्य, १९३० ते १९६० च्या दशकापर्यंतचे मॉडर्निस्ट चित्रकार जी ‘शहरदृश्यं’ रंगवायचे, तसं दिसणारं आहे.  वाएल शॉकीच्या या फिल्मनं ग्रथित इतिहासाची मोडतोड अजिबात केली नसली, तरी काही ठिकाणी कल्पनाविस्ताराची मुभा घेतली आहे. ‘अलेक्झांड्रिया शहरात क्षुल्लक कारणावरून दंगली झाल्या. त्या बहुधा घडवल्या गेल्या होत्या. पण या दंगलींनंतर इंग्रजांच्या आग्रहावरून, सेनापती अहमद उराबी याचे अधिकार खेदिवे तौफीक यांनी काढून घेतले’ हा इतिहास आहे. तर हा ‘ड्रामा’ असं सांगतो की, माल्टा देशातला एक गुलछबू व्यापारी इंग्रजांच्या कळपात राहात होता, तो इजिप्तमधल्या एका अरबाच्या गाढवावरून दिवसभर फिरला आणि त्यानं पैसे दिले नाहीत, तेव्हा झालेल्या झकाझकीत गाढववाल्यावर त्यानं गोळी झाडली आणि तेवढं निमित्त दंगलीला पुरलं. पुढे उराबीनं स्वत:ची फौज उभी केली, खेदिवे आणि इंग्रजांनाही आव्हान दिलं, तेव्हा खेदिवेनं उराबीला बडतर्फ केलं आणि ब्रिटिशांनी अलेक्झांड्रियावर बॉम्बफेक सुरू केली. अख्खं शहर उद्ध्वस्त झालं. या उद्ध्वस्तीकरणाबद्दल तेव्हाचे ब्रिटिश इतिहासकार मात्र म्हणतात की, उराबीच्या माणसांनीच पराभव लक्षात आल्यामुळे मोडतोड करण्याचं ‘दग्धभू धोरण’ अवलंबलं होतं! हा दावा आज कुणालाही मान्य होण्यासारखा नाही, हे उघड आहे.

यानंतरचा एक प्रसंग मात्र इतिहासात घडलेला नाही, तो ‘ड्रामा- १८८२’च्या नाटय़मयतेसाठी वाएल शॉकीनं या फिल्ममध्ये आणला आहे. उद्ध्वस्त अलेक्झांड्रियाला ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरिया यांची भेट! हा प्रसंग सरळ फिल्ममध्ये घुसवणारा वाएल शॉकी कोण? तो काय इतिहासकार आहे का? बरं, इथं व्हेनिस बिएनाले या द्वैवार्षक महाप्रदर्शनातल्या ‘इजिप्त देशदालना’मध्ये वाएल शॉकीची ही फिल्म दाखवली जाते आहे, म्हणजे इजिप्तनं अधिकृतपणे त्याला निवडलंय. त्याची हैसियत काय?

इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया शहरात वाएल शॉकी वाढला, तिथल्याच विद्यापीठातून त्यानं चित्रकलेचं शिक्षण घेतलं, मग अमेरिकेत जाऊन पेनसिल्व्हानिया विद्यापीठातही शिकला; पण मायदेशात परत येऊन त्यानं वयाच्या ३९ व्या वर्षी ‘मास अलेक्झांड्रिया’ची स्थापना केली. ही संस्था इजिप्तमधल्या चित्रकार/ शिल्पकार/ मांडणशिल्पकार किंवा कॅमेऱ्याद्वारे दृश्यकलाकृती करणाऱ्या तरुणांना काही काळासाठी प्रशिक्षण देते, स्टुडिओची जागा देते. प्रचंड लोकसंग्रह वाएल शॉकीनं केला आणि तो उत्तम संघटक आहे, हे तर त्याच्या फिल्ममधूनही कळतं. पण कधी फिल्म, कधी शिल्पं, मांडणशिल्पं या प्रकारांतून त्यानं अरब इतिहास हा विषय नेहमी हाताळला आहे. अगदी २०१२ मध्ये वाएल शॉकीला प्रतिष्ठेचं ‘अबराज कॅपिटल आर्ट प्राइझ’ मिळालं, त्यासाठीही त्यानं केलेली कलाकृती ही इतिहासाचा दाखला देणारी होती. ते होतं एक छोटेखानी मांडणशिल्प. दर दोन मिनिटांनी पडदा उघडायचा, त्याच्या आड झाकलेली फ्रेम खुली व्हायची आणि या फ्रेममध्ये इसवीसन १०९९ चं एक दृश्य दिसायचं. त्यात मध्यभागी पोप आहे. जेरुसलेमला राजधानीचा दर्जा देऊन, पुढे अरब प्रदेशांकडे ख्रिस्ती फौजांनी कूच केली त्याआधीचं हे दृश्य आहे!

म्हणजे वाएल शॉकी हा अतिरेकी इस्लामवादी, अरब-अभिमानी वगैरेंपैकी आहे का? तो तसा असू शकत नाही, याची कारणं दोन. पहिलं म्हणजे त्याला युरोपीय-अमेरिकी कलाक्षेत्रात यश मिळवणं पसंत आहे, असं २०१२ पासूनच्या तपभरातल्या नोंदी सांगतात आणि वर्षांतला अर्धा वेळ तो अमेरिकेत असतो.  माझ्या गतकाळाबद्दल मी जसा विचार करतो, तो विचार किमान माझ्या कलाकृतीतून तरी मांडायचं स्वातंत्र्य मी घेतोय, एवढंच तो या पाश्चात्त्य जगाला सांगतो आहे. दुसरं कारण असं की, आपल्या प्रदेशाबद्दल- इतिहासाबद्दल पाश्चात्त्यांशी, पाश्चात्त्यांच्याच भाषेत अधिकाधिक बोललं गेलं पाहिजे, हा वस्तुपाठ मूळचे इजिप्तचे डॉ. एडवर्ड सैद यांनी ‘ओरिएन्टॅलिझम’ या युगप्रवर्तक ग्रंथाद्वारे घालून दिलेला आहेच- वाएल शॉकी हा तेच करतोय, फक्त तो लंडन/न्यू यॉर्कच्या आर्ट गॅलऱ्यांना पसंत पडणारी इन्स्टॉलेशन आर्ट, फिल्म, ऑपेरा यांची भाषा वापरतोय.

त्याचं हे तंत्र चांगलंच यशस्वी होतंय. इजिप्तच्या देशदालनापुढे त्याची ‘ड्रामा- १८८२’ ही फिल्म पाहण्यासाठी व्हेनिसमध्ये पहिल्या दोन आठवडय़ांत तरी रांगाच रांगा लागताहेत.

पण व्हिक्टोरिया राणीला इजिप्तमधल्या उद्ध्वस्त रस्त्यावर वाएल शॉकीनं का आणलं? तिचा आणि उराबीच्या समर्थकांचा संवाद का घडवून आणला?

याचं कारण केवळ पाश्चात्यांपुरतं मर्यादित नाही. ते वैश्विक आहे आणि हे वाएल शॉकीलाही माहीत आहे..

संहार कशासाठी घडवला गेला? तो आम्ही घडवलाच नाही, असा पवित्रा का घेतला गेला? हे ज्या हेतूनं झालं, तो शुद्ध होता का? हे प्रश्न ब्रिटिश राणीला वाएल शॉकी विचारू पाहतो आहे. त्यासाठी त्यानं जे केलंय, ते (म्यां भारतीयाच्या मते) या फिल्मचा उत्कर्षिबदू ठरणारं आहे. ‘राणी, तू गांधारी आहेस का?’ अशा शब्दांत वाएल शॉकीनं हा प्रश्न विचारला आहे.

याबद्दल वाएल शॉकीशीच बोललो. तेव्हा त्यानं सांगितलं की काही भारतीय मित्रांमुळे त्याला महाभारत माहीत झालं. कौरवांना धृतराष्ट्रानं आणि गांधारीनं आशीर्वाद दिला नव्हता, असंही वाचनात आलं. त्याआधारे त्यानं हा प्रश्न फिल्ममध्ये आणला आणि वसाहतवादी धोरणांना पाठिंबा का दिला गेला याची चर्चा व्हावी हे (एडवर्ड सैद यांनी आधीच केलेलं) आवाहनही फिल्ममधून मांडलं. या फिल्मचा दृश्य-परिणाम नंतरही आठवत राहणारा होता. वेडय़ावाकडय़ा पायांचं ते अंडगोलाकृती टेबल फिल्ममध्ये, युरोपीय सत्ताधीशांच्या एकत्रित बैठकीसाठी वापरण्यात येतं, तेव्हा त्या टेबलाचे खेकडय़ासारखे पाय लक्षात राहतात. या फिल्मच्या सेटमधून विशेषत: आशियाई, अरब चित्रकारांनी शहरदृश्यांमध्ये शोधलेली आधुनिकता दिसली, हेही आठवत राहतं. या वाएल शॉकीकडे लक्ष ठेवायला हवं, हेही उमगतं!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kalakaran egypt dr edward saidorientalize the book wael shockey amy