‘‘आता मंगळावर जायचे, तेवढयात एक जाडगेली बाई चेहरा वेडावाकडा करत, विचित्र आवाज काढू लागते. ती बाई नाही, ‘तो’च आहे.. असे एका खल-पात्राच्या लक्षात येते आणि होय.. या बाईचा चेहरा एखाद्या यंत्राची घडी उलगडावी तितके यंत्रवत् उघडून ‘तो’ प्रकटतो : ‘टोटल रिकॉल’ (१९९०) या चित्रपटातला आर्नोल्ड श्वार्झनेगर! चेहऱ्याची ती उलगडलेली घडी हातात घेऊन पुन्हा त्यापासून यथास्थित चेहरा करून, हातातला तो चेहरा श्वार्झनेगर आता त्याला जेरबंद करू पाहणाऱ्या रक्षकांकडे फेकतो. त्यांनी मोठया चेंडूसारखा झेललेला बाईचा तो चेहरा ‘गेट रेडी फॉर अ सरप्राइज’ असे म्हणत नाही तोच या चेहऱ्यातून मोठा स्फोट होतो. सर्वत्र धूर..’’- निव्वळ दृश्यांमुळेच लक्षात राहिलेला हा प्रसंग ज्यांच्यामुळे घडला, ते टिम मॅकगव्हर्न यांनी रविवारी, वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुंबईकर पत्नी रीना यांनीच ही निधनवार्ता जगाला सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रिचर्ड सेरा

‘टोटल रिकॉल’च्या नंतरही अनेक चित्रपट टिम मॅकगव्हर्न यांनी केले. पण १९९० सालच्या त्या चित्रपटातील ही दृश्ये त्यांनी पहिल्यांदाच संगणक वापरून घडवली होती. म्हणजेच, ‘व्हीएफएक्स’ म्हणून आज ओळखल्या जाणाऱ्या चमत्कृतीतंत्राचा वापर चित्रपटांत करण्याची सुरुवात त्यांनी केली होती. या चित्रपटासाठी त्यांना १९९० च्या विशेष अकॅडमी पुरस्काराने- होय, ‘ऑस्कर’ने- गौरवण्यात आले होते.

असा ऑस्करविजेता ‘व्हीएफएक्स’कार मुंबईत राहात होता, ‘डबल निगेटिव्ह’ किंवा ‘डीएनईजी’ या कंपनीत कार्यरत होता आणि या क्षेत्रातील अनेक भारतीयांना ‘टिम सरां’च्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होत होता, यावरून भारताच्या वाढत्या चित्रपट-दबदब्याची कल्पना येतेच; पण खुद्द टिम मॅकगव्हर्न यांची नवनवे काम करण्याची साठीनंतरही किती तयारी होती, हेदेखील दिसून येते. मुंबईखेरीज चेन्नई, बेंगळूरु, मोहाली इथे ‘डीएनईजी’च्या कामासाठी त्यांची येजा असे. पण भारतातून हॉलीवूडपटांची कामे करवून घेण्यावरच त्यांचा भर राहिला. टिम यांचे बालपण, शिक्षण याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण पंचविशीपासून ते या क्षेत्रात असावेत, असा तर्क काढता येतो. कारण सन १९८२ मधला ‘ट्रॉन’ हा  टिम यांचा पहिला चित्रपट होता. ‘स्पीड’, ‘डंकर्क’, ‘फर्स्ट मॅन’, ‘ट्रॅप्ड’, ‘अ‍ॅण्ट मॅन अ‍ॅण्ड द वास्प’ ही त्यांच्या आणखी काही गाजलेल्या  चित्रपटांची नावे. ‘सोनी इमेजवर्क्‍स’ची स्थापना त्यांनी केली आणि सोनी पिक्चर्सच्या या विभागाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. साठीनंतर मात्र भारत त्यांना खुणावू लागला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vfx oscar winner tim mcgovern personal information zws