अ‍ॅपल युजर्ससाठी आयफोन म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. जवळपास तीन वर्षांपूर्वी अॅपलकडून आयफोन युजर्सला धोक्याची सूचना देण्यात आली होती. काही आयफोनवर मर्सिनरी स्पायवेअर आणि पेगॅसस मालवेअरचा हल्ला झाल्याची ही सूचना होती. तेव्हा ऐन करोनाच्या काळात या मुद्द्यावर मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा अ‍ॅपलकडून अशाच प्रकारचा एक अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जगभरातल्या ९१ देशांमधील वापरकर्त्यांना ही सूचना अ‍ॅपलनं दिली असून त्यातले काही युजर्स भारतातही आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलंय?

अ‍ॅपलकडून जारी करण्यात आलेल्या या सूचनेमुळे आयफोन युजर्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, हा व्हायरसचा हल्ला नेमका कुणी केला आहे, याविषयी अ‍ॅपलकडून कोणताही दावा करण्यात आलेला नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही अशाच प्रकारचा अ‍ॅलर्ट अ‍ॅपलनं काही विरोधी पक्षांमधील नेत्यांना पाठवला होता. यात काँग्रेस खासदार शशी थरूर, आपचे खासदार राघव चढ्ढा, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचा समावेश होता.

गुरुवारी युजर्सला आले अ‍ॅपल ईमेल!

गुरुवारी ११ एप्रिल रोजी भारतातील काही अ‍ॅपल युजर्सला दुपारी साडेबाराच्या सुमारास हे ईमेल आले. नेमक्या किती युजर्सला हे अ‍ॅलर्ट ईमेल आलेत, याविषयी काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. विशेष म्हणजे या ईमेलमध्ये पेगॅसस स्पायवेअरचाही उल्लेख करण्यात आला आहे. आयफोनवर हल्ला करण्यासाठी पेगॅससचा वापर करण्यात आल्याची शंका त्यात वर्तवण्यात आली आहे.

अ‍ॅपलचा वापरकर्त्यांसाठी संदेश

दरम्यान, अ‍ॅपलनं आयफोन युजर्सला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणत्याही अनोळखी ईमेलवर आलेली अटॅचमेंट उघडू नये असंही या ईमेलमधून युजर्सला सांगण्यात आलं आहे.

२०२१ सालापासून आत्तापर्यंत अ‍ॅपलनं जवळपास १५० देशांमधील युजर्सला असे अ‍ॅलर्ट करणारे ईमेल पाठवले आहेत. गेल्या वर्षी भारतातल्या २० आयफोन युजर्सला असे अ‍ॅलर्ट आले होते.

Live Updates