जगभरातील लोक अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना गूगल मॅप्सचा (Google Maps) उपयोग करतात. या ॲपच्या मदतीने ठरावीक ठिकाणे, कमी ट्रॅफिक असणारा रस्ता, आजूबाजूचा परिसर यांची माहिती मिळते. त्यामुळे या ॲपचा आता जगभरात वापर होऊ लागला आहे. पण, याच गूगल मॅपमध्ये अशी बरीच फीचर्स आहेत, जी खूप कामाला तर येतीलच; शिवाय तुमचा युजर एक्स्पिरियन्स आणखी भारी होईल. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

१. जेमिनी एआय गूगल मॅप्सवर संवाद साधू शकते –

गूगल मॅप्स नुकतेच जेमिनीद्वारे जनरेटिव्ह एआय क्षमतेने सुपरचार्ज झाले आहे; जिथे तुम्ही आता फक्त व्हॉइस कमांड वापरून विशिष्ट स्थानावर नेव्हिगेशन सुरू करू शकता. बाईक चालविताना तुम्ही या फीचरचा उपयोग करू शकता.

२. इलेक्ट्रिक वाहन सेटिंग्ज –

EV वाहन वापरकर्त्यांना चार्जिंग स्टेशन शोधणे सोपे जाईल. फक्त Google Maps वर तुमचा चार्जर टाईप निवडा आणि electric vehicle charging stations near me म्हणजेच माझ्याजवळील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधा यावर क्लिक करा. तुम्हाला गूगल मॅप्स इलेक्ट्रिक वाहनाशी सुसंगत असलेली जवळपासची चार्जिंग स्टेशन्स हायलाइट करून दाखवेल. मग ते दोन, तीन किंवा अगदी चारचाकी वाहन असो.

३. गूगल मॅप्ससह तुम्ही ‘Travel back in time’ हे प्रवास फीचर वापरून काही वर्षांपूर्वी एखादे ठिकाण किंवा स्थान कसे दिसायचे ते पाहू शकता. लक्षात ठेवा की, हे फीचर केवळ निवडक ठिकाणे आणि स्थानांसाठी उपलब्ध आहे.

४. मित्र आणि कुटुंबासह लाइव्ह लोकेशन शेअर करा –

गूगल मॅप्स वापरून, तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करू शकता. नवीन ठिकाणी प्रवास करताना तुम्ही या फीचरचा वापर करू शकता आणि इतरांची मदत घेऊ शकता. तुम्ही विशिष्ट कालावधीसाठी किंवा प्रवास संपेपर्यंतही लाइव्ह लोकेशन शेअर करू शकता. जर लाइव्ह लोकेशन शेअर करणे थांबवायचे असेल, तर तुम्हाला ते मॅन्युअली बंद करावे लागेल. लक्षात घ्या की, हे फीचर तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम करील.

५. वाहन पार्किंगचे ठिकाण सेव्ह करा –

बऱ्याच शहरांमध्ये पार्किंगची ठिकाणे शोधणे कठीण जाते. त्यामुळे आपण आपली गाडी कुठे पार्क केली आहे हे लक्षात ठेवणे कठीण जाते. तर तुम्ही ‘सेव्ह युवर व्हेइकल पार्किंग’ हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या वाहनाचे अचूक GPS स्थान चिन्हांकित करू शकता; ज्यामुळे तुम्ही परत आल्यावर कार/बाईक कुठे पार्क केली आहे हे शोधणे सोपे जाईल.

हेही वाचा…फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या

६. हवामानाची माहिती मिळवा –

तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करणार असाल, त्या ठिकाणची रीअल-टाइम हवामानाची थेट माहिती गूगल मॅप तुम्हाला देईल. त्यामुळे अनोख्या ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी त्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज घेता येईल.

७. इनडोअर लाइव्ह व्ह्यू –

विमानतळ किंवा मोठ्या मॉलमध्ये अनेकदा एकमेकांना शोधण्यात वेळ निघून जातो. कारण- येथे नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. तर तुम्ही इनडोअर लाइव्ह व्ह्यू या फीचरच्या मदतीने विमानतळ किंवा मॉलमधील विशिष्ट स्टोअर किंवा तुमचे बोर्डिंग गेट सहज शोधू शकता. तसेच ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सध्या हे फीचर सध्या फक्त १० हजार ठिकाणांपुरते मर्यादित आहे.

८. ऑफलाइन मॅप डाउनलोड करा –

प्रवास करताना एक मोठी भीती असते ती म्हणजे कधी नेटवर्क गेले तर; ज्याशिवाय नेव्हिगेशन ॲप बंद होऊ शकते. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही जात असलेल्या ठिकाणचा ऑफलाइन नकाशा डाउनलोड करणे केव्हाही फायदेशीर ठरते. वापरकर्त्यांना गूगल मॅप्सवर विशिष्ट शहरांचे नकाशे डाउनलोड करण्याची सुविधाही मिळते.

९. ऑफिस आणि घराचा पत्ता सेव्ह करून ठेवा –

ऑफिसला पोहोचायला उशीर झाला असेल, तर कॅब बुक करताना घाई-गडबडीत पत्ता चुकीचा टाकला जाऊ शकतो. त्यामुळे गूगल मॅप्समध्ये घर आणि ऑफिसचा पत्ता सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्ही घराबाहेर पडल्यावर एखादी कॅब बुक करायची असेल, तर तुम्हाला एका क्लिकवर लवकर पोहोचण्याचा जलद मार्ग गूगल मॅप्स दाखवेल.

१०. एआयसह नवीन ठिकाणे शोधा –

सध्या निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध एआय फीचर गूगल मॅप्सवर नवीन ठिकाणे शोधण्यास मदत करील. तुम्ही पार्टीला जाण्यासाठी नवीन ठिकाणे, किराणा माल खरेदी करण्यासाठी नवीन ठिकाणे गूगल मॅप्सवर शोधू शकता आणि सर्वोत्तम उपलब्ध पर्याय निवडण्यात तुम्हाला एआय मदत करील. तर ही आहेत गूगल मॅप्सची १० सीक्रेट फीचर्स आहेत; ज्यांची माहिती आपण या लेखातून पाहिली.