Anti-Rape Wears To Avoid Rape Cases: बाईचे कपडे, बाईची लिपस्टिक, बाईची बोलण्या-चालण्या- हसण्याची पद्धत, बाईचे मित्र या सगळ्या कारणांची ओझी लादून शेवटी बाईलाच बलात्काराचं कारण ठरवणारे लोक आपणही पाहिले आहेत. बाईने अंगभर कपडे घातले तर सत्कार होईल नाहीतर बलात्कारच होत राहतील अशी अत्यंत दर्जाहीन भाषणं देणारी मंडळी कदाचित लहान वयातील किंवा अगदी अंगभर साडी नेसलेल्या आजीच्या वयातील महिलांवर होणारे अत्याचार सहज आपल्या दृष्टीक्षेपातून बाजूला ढकलतात. राजकारण्यांनी तर मागे एकदा बलात्काराची विचित्र कारणं असं पुस्तक लिहायला घेतल्याप्रमाणे बेताल वक्तव्य केली होती, एक म्हणे फाटकी जीन्स घालणाऱ्या महिला लैंगिक अत्याचाराला कारणीभूत आहेत, दुसरा म्हणे चाउमीन खाणाऱ्या महिलांवर बलात्कार होण्याची शक्यता असते. या असंवेदनशील वक्तव्यांमध्ये भर घालणारा एक नवीन प्रकार सध्या बाजारात आला आहे. तो म्हणजे, “अँटी रेप वेअर” सोप्या शब्दात सांगायचं तर बलात्कार थांबवू शकणारी अंतर्वस्त्र!

बलात्कारविरोधी उत्पादनं काय काम करतात?

एक न्यूयॉर्क-आधारित स्टार्ट-अप एआर वेअरने, स्त्रियांसाठी बलात्कारविरोधी अंडरवेअर तयार केले आहे. अंडरवेअरच्या मधल्या भागात एक लवचिक कापड असते जे कापले किंवा फाटले जाऊ शकत नाही आणि फक्त ते परिधान केलेल्या महिलेलाच काढता येऊ शकते. अगदी स्पष्टच सांगायचं तर हे अंतर्वस्त्र ‘लॉक करण्यायोग्य’ पोशाख आहे जो स्त्रियांच्या योनीला लॉक करतो अशी जाहिरात केली जात आहे.

तर दुसरा प्रकार सॉनेट एहलर्स या दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांनी विकसित केला आहे. यात अंतर्वस्त्राच्या मधल्या भागात टॅम्पॉनप्रमाणे एक अधिकचा भाग जोडलेला असतो ज्याला रेझरसारखे तीक्ष्ण टोक असते, जेव्हा महिला हे अंतर्वस्त्र परिधान करतील आणि त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न होईल तेव्हा अत्याचार करणाऱ्याला यामुळे इजा होईल व तितक्या वेळेत महिलेला पळ काढता येईल अशी काहीशी या उत्पादनामागची कल्पना आहे.

श्रीमंत होण्याच्या नादात उत्पादक काय विसरले?

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही उत्पादनाची निर्मिती ही कदाचित महिलांच्या संरक्षणासाठीच केलेली असावी पण या अतिरिक्त काळजीचं, खर्चाचं ओझं महिलांवरच लादून आपण “बाई गं तूच जबाबदार आहेस अत्याचाराला”या म्हणण्याला खतपाणी घालतोय असं वाटत नाही का? समाजातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर बलात्कारविरोधी साधने हे उत्तर नाही,तर पळवाट आहे. याउलट एक समाज म्हणून अशा घटना घडणारच नाहीत किंवा कुणीही स्वतःला इतरांवर अत्याचार करण्याइतकं शक्तिशाली समजणारच नाही हा बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्याउलट या परिस्थितीचा फायदा घेऊन महिलांना ग्राहक व स्वतःला व्यावसायिक म्हणवण्याचा प्रकार हा लाजिरवाणा आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्याचार करणारी व्यक्ती ही संधी साधून हल्ला करत असते हा नियोजित हल्ला नसतो मग अशावेळी महिलांनी १२ महिने, ३६५ दिवस, २४ तास नेहमी या संरक्षक अंतर्वस्त्रांचा वापर करायचा असा या कंपन्यांचा सल्ला आहे का? बरं समजा महिलांनी ही उत्पादने स्वीकारली तरी त्यात त्या किती कम्फर्टेबल असतील? भलेही हे ब्रॅण्ड्स आपण वापरत असलेल्या कापडाविषयी, डिझाईनविषयी मोठी मोठी आश्वासने देत असतील पण २४ तास आपण संरक्षक ढाल वापरून वावरतोय हा विचारच महिलांना त्रास देणार नाही का? एखाद्या लढवय्याला, योद्ध्याला, सैनिकाला समजा २४ तास संरक्षणाच्या ड्युटीवर नेमलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याच्यावर किती दबाव, ताण असेल

हे सगळे मुद्दे रास्त असताना या बलात्काराविरोधी कपड्यांबाबत एक कायदेशीर वाद म्हणजे हे सगळे उपाय लिंगभेद करणारे आहेत. म्हणजे बलात्कार, अत्याचार हे फक्त बारीक, सुडौल महिलांवर होत नाहीत (उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे). लहान मुलं, पुरुष, ट्रान्स पुरुष/ महिला या सगळ्यांसाठी उपाय करणं महत्त्वाचं नाही का?

बलात्कारविरोधी उपाय काय?

NCRB च्या अहवालानुसार भारतात २०२२ मध्ये एकूण ३१,५१६ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली होती. तर NFHS च्या अहवालानुसार, बलात्काराच्या 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे कधीच नोंदवली जात नाहीत. बलात्कार, लैंगिक अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांकडून तक्रार केली जात नाही कारण बहुतांश पीडितांवर ओळखीच्याच लोकांकडून अत्याचार केले जातात.

हे ही वाचा<< “मला हरव, तुझ्याशी लग्न करेन”, म्हणणारी १०८ किलोची ‘सिंहीण’; गूगल डूडलवर झळकणाऱ्या बानूची पडद्यामागची गोष्ट!

बलात्काराचे कायदे अस्तित्वात असूनही, भारतात शिक्षा होण्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. या प्रश्नांवर आपण कधी लक्ष केंद्रित करणार आहोत? स्त्रियांना त्यांच्या सुखसोयीपासून दूर ढकलण्यापेक्षा आणि त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारी उत्पादने विकून श्रीमंत होण्यापेक्षा, बलात्कार करणाऱ्यांसाठी कठोर कायदे बनवून व अत्याचारांची मानसिकता बदलून आपण समाज म्हणून पुढे जायला हवं!