डॉ. किशोर अतनूरकर
गर्भपातासाठी ‘मेडिकल ॲबॉर्शन’ची सोय उपलब्ध होणं ही स्त्रियांच्या प्रजननविषयक आरोग्याच्या बाबतीत घडलेली एक महत्वपूर्ण घटना आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या ९ आठवड्यापर्यंतचा गर्भपात हा गोळ्या घेऊन करता येतो. यासाठी आपल्या देशात कायद्याने मान्यता आहे. अर्थात डॉक्टरांची लेखी परवानगी त्यासाठी आ‌वश्यक असतेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भपात सुरक्षित व्हावा, त्याचे स्त्री आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ नयेत या दृष्टिकोनातून या घटनेला विशेष महत्व आहे. स्त्रीला गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात गर्भपात करायचा झाल्यास पूर्वी ॲनेस्थेशिया वा भूल देऊन ‘क्युरेटिंग’ करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता त्या अवघड प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. गोळ्या घेऊन गर्भपात करून घेणं म्हणजेच ‘मेडिकल ॲबॉर्शन’ ही प्रक्रिया करता येतं. अर्थात ही प्रक्रिया तुलनेनं सोपी असली तरी गोळ्या घेऊन ‘बिनधास्त’ राहाता येत नाही. त्यासाठी काही खबरदारी घ्यावी लागते.

हेही वाचा >>>GirlPower : महिला प्रवाशांसाठी इंडिगोची मोठी घोषणा, सुरक्षित प्रवासासाठी कंपनीने घेतला निर्णय!

आपल्या देशात साधारणतः गेल्या १० वर्षात ‘मेडिकल ॲबॉर्शन’ म्हणजे गोळ्या घेऊन गर्भपात करण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यानुसार आपल्या देशात ९ आठवड्यापर्यंत ‘मेडिकल ॲबॉर्शन’ करण्याची डॉक्टरांच्या परवानगीसह मान्यता दिली जाते.

गर्भपात करून घ्यावा, असं ठरवून आलेल्या स्त्रिया बहुतेक वेळेस आपल्या पतीसोबत डॉक्टरकडे येऊन सांगतात, ‘मासिकपाळी चुकली आहे, आठ-दहा दिवस होऊन गेले आहेत. आम्ही घरी ‘किटवर’ लघवी तपासली, टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पण आम्हाला गर्भपात करून पाहिजे, गोळ्या लिहून द्या.’ त्या स्त्रियांच्या बोलण्यात खूपच सहजता असते. मात्र अशावेळी या विषयाकडे त्या जोडप्याने गांभीर्यानी बघितलं नाही की काय, असं वाटून जातं. गर्भपात ‘ऑन डिमांड’ करून दिला जावा अशी व्यावहारिक दृष्टीने मुभा वैद्यकीय गर्भपाताचा कायदा (MTP Act) देतो. म्हणून काही ‘मागणीनुसार पुरवठा’ या तत्वावर हे करून दिलं जात नाही, याचं भान लोकांनी ठेवलं पाहिजे.

एखाद्या जोडप्याच्या बाबतीत समजा गर्भधारणा ‘चुकून’ झाली आणि ती नको असल्यास, केलेल्या गर्भपाताचे स्त्रीच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक संदर्भात काय परिणाम होतील या बाबतीत साधक-बाधक चर्चा कुटुंबाने करायला हवी आणि मगच त्याचा निर्णय घ्यायला हवा. कारण एकदा निर्णय झाला की रीतसर वैद्यकीय प्रक्रिया केली जाते. त्या स्त्रीची रीतसर गर्भपाताच्या ठराविक संमतीपत्रकावर स्वाक्षरी घेतली जाते.

हेही वाचा >>>कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….

‘मेडिकल ॲबॉर्शन’ घडवून आणण्यासाठी दोन प्रकारच्या गोळ्यांचा उपयोग केला जातो. त्या गोळ्या घेतल्यानंतर गर्भपात होतो. मात्र त्यानंतर १० ते १५ दिवसांनी पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊन, सोनोग्राफी करून गर्भपात पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी. आणि पुन्हा अशी अनियोजित गर्भधारणा राहू नये यासाठी पाळणा लांबविण्याच्या साधनाबद्दलचा डॉक्टरांकडून मिळालेला सल्ला कायम लक्षात ठेवायला हवा.

‘मेडिकल ॲबॉर्शन’ हे सर्जिकल(क्युरेटिंग) ॲबॉर्शनपेक्षा जास्त सोपं आणि सुरक्षित आहे, कारण गर्भपाताच्या या पद्धतीत ॲनेस्थेशिया देण्याची गरज नाही म्हणून रिस्क कमी आहे. क्युरेटिंग पद्धतीत, एखादं उपकरण गर्भाशयात सरकवावं लागतं, त्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव(Infection) होण्याची शक्यता असते, ती शक्यता ‘मेडिकल ॲबॉर्शन’ करताना नसते. गर्भपातासाठी गोळ्या लिहून देण्यापूर्वी डॉक्टर रक्ताची प्राथमिक तपासणी करावयास सांगतात. त्यात प्रामुख्याने रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण किती आणि रक्तगट कोणता हे बघितलं जातं. हिमोग्लोबीन १० पेक्षा कमी असेल तर गर्भपातानंतर रक्तवाढीसाठी म्हणून आयर्नच्या गोळ्या घ्याव्या लागतात. रक्तगट निगेटिव्ह असल्यास, एका गर्भपातानंतरचं दुसरं बाळ सुरक्षित जन्माला यावं यासाठी Anti-D चं इंजेक्शन द्यावं लागतं. गोळ्या घेऊन गर्भपात हा बऱ्याचदा सुरळीतच होतो. क्वचित प्रसंगी पोटात खूप दुखणं, रक्तस्त्राव जास्त होणं असं होऊ शकतं. असं झाल्यास ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या देखरेखेखाली ‘मेडिकल ॲबॉर्शन’ची प्रक्रिया झाली पाहिजे.

याचा दुसरा अर्थ असाही आहे की, गर्भपाताच्या गोळ्या या सर्दी-ताप, डोकेदुखी, पोटदुखी वगैरे किरकोळ कारणांसाठी डॉक्टरकडे न जाता औषधाच्या दुकानात जाऊन फार्मासिस्ट कडून जशा मागितल्या जातात, तशा ‘गर्भपाताच्या गोळ्या द्या’ असं सांगून त्याचा उपयोग करता येत नाही किंबहुना तसं करणं योग्य नाही. ‘मेडिकल ॲबॉर्शन’ डॉक्टरच्या देखरेखेखाली झालं पाहिजे. तसं न झाल्यास अतिरक्तस्राव, अर्धवट गर्भपात अशी गुंतागुंत होऊन त्या स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते हे लक्षात ठेवलं पाहिजे.

त्यामुळे गर्भपाताचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला पाहिजे. तसंच त्यानंतरही त्या स्त्रीची काळजी घ्यायला हवी.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For abortion it is necessary to take the medical abortion pill under the guidance of a specialist doctor amy