MLC Satyajeet Tambe Viral Video : लहान मुलांच्या जडणघडणीबाबत पालकवर्ग प्रचंड चिंतेत आहे. इंटरनेट आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं फार लवकर मोठी होतात. त्यामुळे मुलांना वाटतं की आपण आपले निर्णय घेण्यास आता सक्षम आहोत. परंतु वयाच्या कोणत्या टप्प्यावर कसे निर्णय घ्यायचे याची जाण अल्पवयीन मुलांमध्ये नसते. यातून अनेकदा पालक आणि मुलं यांच्यात प्रचंड वाद होतात. त्यातच घरात मुली असतील तर हे वाद अनेकदा टोकाला जातात. वयात येणाऱ्या मुलींना वळण कसं लावावं, त्यांना बाहेरच्या वाईट जगापासून दूर कसं ठेवावं हा मोठा प्रश्न आहे. पण प्रश्नांची असंख्य उत्तरेही आहेत. यातलच एक उत्तर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल (२४ जानेवारी) राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सर्वांशी शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


मुलांच्या भविष्यासाठी त्यांची बालपणातील जडणघडण फार महत्त्वाची असते. लहान मुलं खरतर आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनातून शिकतात आणि त्यांच्या जडणघडणीत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचाच मोठा प्रभाव असतो. कधी कधी आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडतात तर कधी कधी वाईट! पण चांगल्या वाईट घटनांमधून आपल्या मुलांनी काय शिकावं, कसं शिकावं, किती गोष्टी आत्मसात कराव्यात हे पालकांचं काम असतं. त्याकरता मुलांमध्ये मानसिक शिस्त असावी लागते. मानसिक शिस्त म्हणजे पालक जे सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात याची जाणीव त्यांना असावी लागते. यातूनच ते प्रगल्भ होत जातात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतात. लहान मुलांच्या निर्णय घेण्याच्या भूमिकेबाबत सत्याजित तांबे यांनी फार मोलाचा सल्ला दिला आहे. सत्यजित तांबे यांना अहिल्या नावाची मुलगी असून ती सध्या ९ वर्षांची आहे. त्यांनी तिच्यासाठी १८-२५ चा नियम तयार केला आहे. या नियमानुसार अहिल्या वयाच्या १८ वर्षापर्यंत स्वतःचे निर्णय घेऊ शकणार नाही. तर १८ ते २५ वयापर्यंत ती वडिलांच्या मदतीने, चर्चा करून निर्णय घेऊ शकते.

याबाबत सत्यजित तांबे म्हणाले, “मुलं आता advance होत जात आहेत. तिला मी म्हणालो आपल्याला हे करायचं आहे, तर ती म्हणते नाही बाबा मला ते करायचं आहे. शेवटी मी तिला एक नियम बनवून दिला आहे. तो नियम असा आहे की, ती बारावी होईपर्यंत तिचे सगळे निर्णय मी घेणार. बारावी झाल्यावर म्हणजेच १७-१८ वर्षांनंतर ती निर्णय घेऊ शकते, पण अंतिम निर्णय माझाच राहणार. वयाच्या २५ वर्षांनंतर तिला जो निर्णय घ्यायचा आहे तो तिने घ्यावा. हा निर्णय मी तिला रोज सांगतो, जेणेकरून ते तिच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि तिने परत त्याविषयी माझ्याशी वाद घालता कामा नये. त्यामुळे २५ नंतरच्या आयुष्याचा पाया आता सुरू झाला आहे.”

हा नियम प्रत्येकाच्या घरात लागू होईलच यातला भाग नाही. प्रत्येक मुलीची वैचारिक पात्रता निराळी असते. त्यामुळे आपल्या मुलांच्या मानसिक आणि वैचारिक पातळीचा विचार करून पालकांनी आपल्या मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यातही आपल्या घरात वयात येणारी मुलं असतील तर त्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. तरच मुलींच्या भविष्याचा पाया पक्का होऊ शकेल.

More Stories onचतुराChatura
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should be the future of girls 18 25 formula of told by maharashtra mlc satyajeet tambe sjr
First published on: 25-01-2024 at 20:59 IST