वेगाने वाढत विस्तारत जाणाऱ्या शहराचे औद्योगिकीकरण, पर्यावरण याची सांगड घालून सांडपाणी निचरा, व्यवस्थापन आणि या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बुधवारी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. स्वच्छ भारत अभियानात भरीव काम करण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत, तर बुधवारी औरंगाबादेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. नजीकच्या काळात यास दिशा व गती देण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळासमवेत आलेली तांत्रिक समिती २-३ दिवस येथेच थांबून माहिती घेणार आहे.
सांडपाणी-घनकचरा प्रक्रिया, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उद्योगांबाबत चर्चेत भर देण्यात आला. अमेरिकेतील नावाजलेली कंपनी फ्लर कार्पोरेशनचे शिष्टमंडळ बुधवारी औरंगाबाद भेटीवर आले. अमेरिकेत मुख्यालय असणारी फ्लर कार्पोरेशन ही कंपनी ऊर्जा, पायाभूत सुविधा, रसायन व सेवा आदी विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. फ्लर, ब्रँडी आणि अंकलोआ या कंपन्यांमध्ये संयुक्त करार झाला असून, तीनही कंपन्यांचे संयुक्त उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी औरंगाबाद भेटीवर आले. मंगळवारी शिष्टमंडळाने मुंबईस भेट दिली. शहराच्या औद्योगिक परिसरात गुंतवणुकीच्या असलेल्या संधीबाबत शिष्टमंडळ रात्री उशिरा सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आशिष गर्दे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सांडपाणी निचरा व व्यवस्थापन, तसेच या पाण्याचा पुनर्वापर यावर भर दिला आहे. केंद्रात व राज्यात योग्य समन्वय साधून अभियानास गती देण्याच्या हेतूने प्रशासनाने सहकार्य घेणे व नवीन संधीबाबत चर्चा करणे हा शिष्टमंडळाच्या भेटीचा मुख्य हेतू असल्याचे जेएनपीटीचे संचालक व सीएमआयएचे सदस्य विवेक देशपांडे यांनी सांगितले. शिष्टमंडळातील रिचर्ड ब्रॅडी, क्रिश पंडय़ा, संजय कालरा, ज्यो आदींनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर, जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता मुखेडकर आदी अधिकाऱ्यांसमवेत विस्ताराने चर्चा केली.