राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र, आठ महिने झाले तरी शेतकऱ्यांची कर्जे माफ झालेली नाहीत. बोंडअळीची मदत जाहीर करून दोन महिने झाले तरी अजून मदत मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या गारपिटीचे पंचनामेही तातडीने करायला हे सरकार तयार नाही. हे सरकार फक्त बोलण्यात ‘ऑनलाईन’ आणि कामात ‘ऑफलाईन’ आहे, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज जिल्हा काँग्रेसचे शिबीर संपन्न झाले. या शिबीराला मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चव्हाण म्हणाले, गेल्या चार वर्षात भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे. सत्तेची मस्ती भाजप नेत्यांच्या डोक्यात गेली असून, सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे विकायला सांगितले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार हुकूमशाही पद्दतीने काम करते आहे. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या या हुकूमशाही सरकार विरोधात जनतेत तीव्र संताप आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेचा आवाज होऊन सरकारच्या दडपशाही विरोधात संघर्ष करावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षाच्या काळात सरकारने सामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. जनतेने कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रुपये उद्योगपती मित्रांना वाटले. ‘शहा’ आणि ‘तानाशहा’ची जोडी देशाला लुटण्याचे काम करते आहे. परदेशी शक्तींच्या इशाऱ्यांवर पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, जीएसटीसारखे अविचारी निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटात टाकले आहे. देशातल्या लोकांची अडचण झाली असून, पैसा घरात ठेवला तर नरेंद्र मोदी नोटाबंदी करून घेऊन जातात व बँकेत ठेवला तर नीरव मोदी घेऊन जातो, असा टोला त्यांनी लगावला.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले की, सरकारने कर्जमाफी ऐतिहासिक असल्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीचे पैसे मिळायला उशीर झाला म्हणून बँका व्याज आकारत आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बँकांना पैसे देण्याऐवजी तुम्हाला पाहून घेऊ, असा दम भरला आहे. पण मी त्यांना सभागृहात सांगणार आहे की, तुम्ही आता कोणालाच पाहण्याची गरज नाही. कारण पुढील निवडणुकीत जनताच तुम्हाला पाहून घेणार आहे, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government speaks online offline in work ashok chavans criticism
Show comments