मुंबई : वाढता निधी ओघ, किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागात झालेली वाढ आणि बाजारातील तेजी यामुळे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांखालील फंडामधील मालमत्ता २०२४ अखेर २.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत ८३ टक्क्यांनी वधारली आहे.

नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येतील वाढ ही या श्रेणीतील फंडांच्या मालमत्तेतील वाढीला पूरक ठरली आहे. मार्च २०२४ मध्ये या श्रेणीतील फंडांच्या ‘फोलिओ’ची (गुंतवणूकदार खाते) संख्या १.९ कोटींपर्यंत पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.०९ कोटी होती आणि त्यात ८१ लाख नवीन गुंतवणूकदारांची भर पडली आहे, हे स्मॉल-कॅप फंडांकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल दर्शविते.

हेही वाचा… ‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री

‘फायर्स’चे उपाध्यक्ष (संशोधन) गोपाल कवलिरेड्डी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वाधिक वेगवान असून, भांडवली बाजारात सूचिबद्ध होऊ इच्छिणाऱ्या अनेक कंपन्या भांडवली बाजारात नशीब अजमावत आहेत. मात्र सध्या सार्वत्रिक निवडणुका, मान्सूनचा अंदाज, आर्थिक क्रियाकलाप, चलनवाढ, जीडीपी वाढीचे अंदाज आणि सरलेल्या तिमाहीत कंपन्यांची कमाई यांसारख्या घटकांचा स्मॉल-कॅप कंपन्यांच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, स्मॉल-कॅप फंडांमध्ये ४०,१८८ कोटी रुपयांचा ओघ आला, जो मागील आर्थिक वर्षात २२,१०३ कोटी रुपयांच्या प्रवाहापेक्षा जास्त राहिला आहे. मात्र मार्च महिन्यात स्मॉल-कॅप फंडांतून दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच ९४ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला.

हेही वाचा… आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार

‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी काही दिवसांपूर्वी स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांच्या उच्च मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त केली होती. शिवाय ते कधीही फसव्या बुडबुड्यांमध्ये रूपांतरित होऊ शकते, असा इशाराही दिला होता. त्यानंतर बहुतांश स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. त्यांनतर म्युच्युअल फंड कंपन्यांना या फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. गेल्या काही तिमाहीत म्युच्युअल फंडांच्या स्मॉल आणि मिडकॅप योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाह आल्याच्या पार्श्वभूमीवर ही चिंता निर्माण झाली आहे.

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता मार्च २०२३ अखेर १.३३ लाख कोटी रुपये होती. ती आता २.४३ लाख कोटी रुपयांच्या शिखरावर पोहोचली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात स्मॉलकॅप निर्देशांक ६० टक्क्यांनी वधारला आहे. तसेच, मजबूत आर्थिक क्रियाकलाप आणि कमाईच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना आहे. हे घटक स्मॉलकॅप फंडांमधील मालमत्ता वाढीस कारणीभूत ठरले आहेत.