मुंबई : आयआयएफएल फायनान्सच्या संचालक मंडळाने हक्कभाग विक्रीद्वारे अर्थात राइट्स इश्यूच्या माध्यमातून १,२७२ कोटी रुपयांच्या निधी उभारणीला मंजुरी दिली. संचालक मंडळाने प्रतिसमभाग ३०० रुपयांप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात, आयआयएफएलने विद्यमान पात्र भागधारकांना हक्क समभाग विक्री करून १,५०० कोटी रुपयांच्या निधी उभारणीला मान्यता दिली.

आयआयएफएल फायनान्सने १,२७१.८३ कोटी रुपयांच्या निधी उभारणीसाठी ४.२३ कोटी समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २३ एप्रिल २०२४ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. रेकॉर्ड तारखेनुसार कंपनीचे पात्र भागधारक प्रत्येक ९ समभागांमागे एक हक्क समभाग मिळवण्यास पात्र असतील. विद्यमान भागधारकांना ३० एप्रिल ते १४ मे दरम्यान हक्कभाग विक्रीच्या माध्यमातून समभाग मिळ्वण्यासाठी अर्ज करता येणार आहे. मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात आयआयएफएल फायनान्सचा समभाग २.१२ रुपयांच्या घसरणीच्या ४२२.०५ रुपयांवर स्थिरावला.

हेही वाचा… अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक

विद्यमान कॅलेंडर वर्षात रिझर्व्ह बँकेने आयआयएफएल फायनान्सला सोने कर्जाची मंजुरी आणि वितरण करण्यास मनाई केली. सोने कर्ज वितरणात काही अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा… वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर

राईट इश्यू म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे आयपीओ म्हणजेच प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून कंपनीगुंतवणूकदारांसाठी पहिल्यांदाच समभाग उपलब्ध करून देते, तसेच हक्कभाग विक्रीद्वारे विद्यमान भागधारकांना बाजारभावापेक्षा स्वस्तात समभाग उपलब्ध करून देते.