मुंबई: बिटकॉइन या आभासी चलनाने बुधवारच्या सत्रात पुन्हा एकदा मार्च २०२२ मधील ४४ हजार डॉलरची उच्चांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य ४४,१६५ अमेरिकी डॉलरवर पोहोचले असून, भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ३६ लाख ७९ हजार रुपये झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे, २०१० मध्ये एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय रुपयात फक्त ८ रुपये इतके होते. गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. कॉइनमार्केट कॅपच्या माहितीनुसार, बुधवारी पुन्हा एकदा बिटकॉइनचे मूल्य ४४ हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्वाचे डोळे विस्फारले गेले आहेत. २०२३ सालात बिटकॉइनचे मूल्य १६० टक्क्यांहून अधिक वधारले आहे. जगातील मोठे क्रिप्टो एक्सचेंज हे मोठ्या धक्क्यांमधून सावरत असताना हे घडणे विशेष लक्षणीय मानले जात आहे. जागतिक पातळीवरील ‘एफटीएक्स’ हे क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे, तर दुसरे क्रिप्टो एक्स्चेंज बायनान्स विरुद्ध खटला सुरू आहे.

हेही वाचा… व्याजदर स्थिर राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीस सुरूवात

जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नसली, तरी मोठ्या करांच्या भाराची त्या व्यवहारांवर जरब आहे. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेनेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही. तरी जगभरासह भारतात देखील बिटकॉइनच्या साहाय्याने व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ पाहत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitcoin value reached again at 44 thousand dollars print eco news asj