मुंबई : गेले काही दिवस सैल झालेली पकड पुन्हा मजबूत करीत तेजीवाल्यांचे भांडवली बाजारात शुक्रवारी उत्साही पुनरागमन झाल्याचे दाखवून दिले. बँकिंग आणि वाहन कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळे चार सत्रातील घसरणीला लगाम बसला. इस्रायल-इराणमधील भूराजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने भांडवली बाजाराने नकारात्मक पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली होती. मात्र दुपारच्या सत्रात नीचांकी पातळीवरून सावरत बाजार सकारात्मक पातळीवर स्थिरावला.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९९.३४ अंशांनी वधारून ७३,०८८.३३ पातळीवर स्थिरावला. सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्स ६७२.५३ अंशांनी घसरून ७१,८१६.४६ या सत्रातील नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र गेल्या चार सत्रात झालेल्या पडझडीमुळे कमी किमतीला उपलब्ध असलेल्या बँकिंग क्षेत्रातील समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी गर्दी केली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील १५१.५१ अंशांनी वधारून २२,१४७ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार

“जागतिक पातळीवर नकारात्मकता असूनही, इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याच्या मर्यादित शक्यतेने देशांतर्गत भांडवली बाजारात लार्ज-कॅप समभागांमधील तेजीने बाजार सावरला. मात्र, खनिज तेलाच्या वाढत्या किमतीने चिंता कायम आहे, ज्यामुळे महागाईचा धोका निर्माण झाला, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, विप्रो, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी या प्रमुख कंपन्यांचे समभाग वधारले. तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स आणि इन्फोसिसच्या समभागात मात्र घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ४,२६० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. जागतिक स्तरावर अन्य प्रमुख बाजार निर्देशांक मात्र घसरणीसह बंद झाले. आशियाई बाजारांमध्ये, सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग नकारात्मक क्षेत्रात स्थिरावले. युरोपियन बाजारदेखील नकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते.

सेन्सेक्स     ७३,०८८.३३       ५९९.३४   ( ०.८३%)

निफ्टी         २२,१४७            १५१.५१   ( ०.६९%)

डॉलर          ८३.४८                 -४

तेल          ८७.६२                ०.५५