तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजूज’ने नऊ दिवसांच्या विलंबानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यास सुरुवात केली आहे. वेतन देण्याची प्रक्रिया पुढील १० दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कंपनीने वाद सुरू असलेल्या चार गुंतवणूकदारांच्या गटाला वेतन-दिरंगाईसाठी जबाबदार धरले आहे.

वेतनाला झालेल्या विलंबाबाबत कंपनीने कर्मचाऱ्यांकडे खेद व्यक्त केला आहे. हक्कभाग विक्रीच्या (राइट्स इश्यू) माध्यमातून उभारलेल्या निधीतूनदेखील वेतन देता आले नसल्याचे कंपनीने त्यात नमूद केले आहे. शिवाय वेतनासाठी कंपनीने इतर पर्यायी व्यवस्था केली असून त्या माध्यमातून वेतन दिल्याचे कर्मचाऱ्यांना उद्देशून धाडलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संयम आणि समजूतदारपणाची प्रशंसादेखील केली आहे. चार परदेशी गुंतवणूकदारांसोबत सुरू असलेल्या वादामुळे कंपनी सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे, परिणामी, प्रत्येक कर्मचारी आणि संपूर्ण परिसंस्थेला प्रचंड तणावाचा सामना करावा लागत आहे. या दुर्दैवी परिस्थितीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ वेतनश्रेणीतील २५ टक्के कर्मचाऱ्यांना पूर्ण तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन मिळणार आहे.

हेही वाचा : ‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित खर्चासह इतर परिचालन खर्चाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राइट्स इश्यूद्वारे २० कोटी डॉलरचा निधी उभारला होता. मात्र प्रोसस, जनरल अटलांटिक, सोफिना आणि पीक एसव्ही – या चार परदेशी गुंतवणूकदारांच्या गटाने इतर भागधारकांच्या पाठिंब्यासह संस्थापकांच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) बेंगळूरु खंडपीठाकडे तक्रार केली होती. बैजूज’ची पालक कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संस्थापक बैजू रवींद्रन आणि कुटुंबीयांची २६.३ टक्के मालकी आहे, तर डच गुंतवणूकदार कंपनी प्रोससच्या नेतृत्वाखालील भागधारकांची ३२ टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी आहे.