Premium

गौतम सिंघानिया आणि नवाज मोदींच्या भांडणात कंपनीचं कोट्यवधींचं नुकसान, रेमंड ग्रुपवर दुहेरी संकट

गौतम सिंघानिया यांनी याच महिन्यात पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होण्याची घोषणा X च्या सोशल मीडिया हँडलवरुन केली होती.

Gautam Singhania Vs Nawaz Modi
गौतम सिंघानिया आणि नवाज मोदींच्या वादात रेमंडचं नुकसान (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

बिझनेस टायकून अशी ओळख असलेले गौतम सिंघानिया सध्या प्रचंड चर्चेत आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्येच त्यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त होण्याची घोषणा केली. ज्यानंतर या दोघांमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचा परिणाम रेमंड कंपनीवर होतो आहे. गौतम सिंघानियांवर नवाज मोदींनी अनेक आरोप केले आहेत. १३ नोव्हेंबरनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड होते आहे. नवाज मोदी यांनी गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलींना मारहाण केली असा आरोप केला. ज्यानंतर गौतम सिंघानियांच्या अडचणी व्यावसायिकदृष्ट्याही वाढल्या आहेत. कौटुंबिक कलह आणि कंपनीचं नुकसान असं दुहेरी संकट गौतम सिंघानियांपुढे ओढवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रॉक्सी फर्मने नेमकं काय सुचवलं आहे?

बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार प्रॉक्सी अॅडव्हायजरी फर्मने गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांना चौकशीच्या दरम्यान संचालक मंडळापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. तसंच रेमंडला आता स्वतंत्र संचालकांची गरज आहे या संचालकांनी नवाज मोदींनी केलेले आरोप तपासून पाहावेत असं म्हटलं आहे. त्यामुळे गौतम सिंघानियांच्या अडचणी वाढल्या आहेत. या फर्मने एक पत्र लिहिलं आहे ज्यात असं म्हटलं आहे की जे आरोप झालेत त्याची चौकशी स्वतंत्रपणे केली जावी. त्यात गौतम सिंघानिया आणि नवाज मोदींनी पडू नये.

इतर संचालकांनी कंपनी वाचवण्याचा सल्ला

या सल्लागार फर्मने संचालकांना हेदेखील विचारलं आहे की या नवाज मोदींनी गौतम सिंघानियांवर केलेल्या आरोपांनंतरही तुम्ही मौन का बाळगलं आहे? कारण या पती पत्नीच्या या कलहामुळे रेमंडमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर्समध्ये झालेली अभूतपूर्व घसरण हेच दाखवून देते आहे असंही या फर्मने म्हटलं आहे. संचालक मंडळाचं मौन हे वेगळ्या अर्थाने घेतलं गेलं तर काय होईल? अशीही भीती व्यक्त केली आहे.

शेअर्समध्ये घसरण सुरुच

गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदींपासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. मंगळवारी रेमंडचा शेअर ४.९९ टक्के पडला आणि १५६६.९० रुपये प्रति शेअर अशा निचांकी नोंदीला बंद झाला. मागच्या काही दिवसांमध्ये शेअर्स १७.६५ टक्के घसरला आहे. याबाबत सल्लागार फर्मने असं म्हटलं आहे की गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांच्यातला वाद दीर्घकाळ चालणार आहे त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होण्यापासून वाचता आलं पाहिजे यासाठी आवश्यक उपाय योजले पाहिजेत. रेमंड ग्रुप आणि सिंघानिया कुटुंबाशी संबंध नसलेला वकीलही तुम्ही चौकशीसाठी नेमू शकता असाही सल्ला देण्यात आला आहे.

हे पण वाचा- नवाज मोदींचा नवा आरोप, “गौतम सिंघानियांनी मला उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या….”

गौतम सिंघानिया यांनी १३ नोव्हेंबरच्या दिवशी पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर नवाज मोदी यांनी घटस्फोटाच्या बदल्यात सिंघानिया यांच्या संपत्तीचा ७५ टक्के हिस्सा मागितला आहे. रेमंडचे मुख्य संचालक गौतम सिंघानिया हे ११ हजार ६२० कोटींचे मालक आहेत. अशात गौतम सिंघानियांवर नवाज मोदी सातत्याने आरोप करत आहेत. मला उपाशी पोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्याचाही आरोप नवाज मोदींनी नुकताच केला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam singhania nawaz modi separation proxy advisory firm iias says raymond independent directors must protect company from promoters scj

First published on: 29-11-2023 at 12:17 IST
Next Story
‘टीसीएस’चे शेअर बायबॅक १ डिसेंबरपासून; पहा तुमच्याकडील किती शेअर घेणार