लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी ५०’ २२,००० अंशांवरून २३,००० अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला असला तरी, या तेजीचा प्रत्यक्ष अनुभव मोजक्या गुंतवणूकदारांनाच अनुभवता आला आहे, याचे कारण म्हणजे काही मोजके समभागच निर्देशांकाच्या या मुसंडीत वाढू शकले आहेत. थोडे तपशिलाने पाहिल्यास, निफ्टीच्या अंतिम १,००० अंशांपेक्षा अधिक वाटचालीत या निर्देशांकात सामील निवडक पाच कंपन्यांच्या समभागांचे ७५ टक्क्यांहून अधिक योगदान राहिले आहे.

निफ्टी निर्देशांकाने १५ जानेवारीला २२,००० अंशांची पातळी गाठली होती. तर नंतरच्या ८८ कामकाज झालेल्या सत्रांमध्ये त्यात १,००० अंशांची भर पडली आणि गुरुवारी, २४ मे रोजी त्याने २३,००० अंशांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. अर्थात या कालावधीत या पाच निवडक समभागांचे मूल्य देखील सर्वाधिक वाढले आणि सहस्रांशाच्या तेजीत निफ्टी निर्देशांकातील अन्य ४५ समभागांचा वाटा अल्प अथवा नकारात्मक राहिला.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: सोन्याचे दर पाहून ग्राहकांच्या आनंदाने उड्या! १० ग्रॅमची किंमत ऐकून बाजारात गर्दी 

या १,००० अंशांच्या तेजीमध्ये आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक योगदान राहिले. जिचा निर्देशांक वाढीत १७.३ टक्क्यांहून अधिक वाटा राहिला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र आणि स्टेट बँकेने, प्रत्येकी अनुक्रमे १६ टक्के आणि १५ टक्के योगदान दिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे निर्देशांकातील वाढीमध्ये १५ टक्के योगदान आहे, तर भारती एअरटेलचे योगदान १४ टक्के आहे. त्या उलट, १५ जानेवारीपासून या ८८ सत्रांदरम्यान एचडीएफसी बँकेने निर्देशांकाच्या वाढीस अडसर निर्माण केला. म्हणजेच निर्देशांकाला खाली खेचण्यात तिचे १९ टक्के, तर बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स या अन्य प्रमुख समभागांचे अनुक्रमे ५ टक्के आणि ४ टक्के योगदान राहिले.