वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकी गुंतवणूकदार कंपनी ‘जीक्यूजी पार्टनर्स’चे अध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी राजीव जैन यांच्या अदानी समूहातील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १५० टक्क्यांनी वधारले आहे. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर त्यांच्या कंपन्यांच्या समभागांत गैरव्यवहाराच्या केलेल्या गंभीर आरोपांचे कंपन्यांच्या समभागमूल्यावर प्रतिकूल परिणाम दिसून आले होते.

मात्र या पडझडीत, अमेरिकी कंपनी जीक्यूजी पार्टनर्सने अदानी समूहातील चार कंपन्यांच्या समभागांमध्ये सुमारे १५,४४६ कोटी रुपयांनी गुंतवणूक केली. अदानी समूहातील अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडमधील सुमारे १७.२ कोटी समभाग त्यांनी एकगठ्ठा खरेदी केले होते. अदानी एंटरप्रायझेसमध्ये ५,४०० कोटी रुपये; अदानी पोर्ट्स ५,३०० कोटी; अदानी एंटरप्रायझेस सोल्युशन्समध्ये १,९०० कोटी; आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये २,८५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आता त्या गुंतवणुकीचे मूल्य ४.८ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. जून २०२३ मध्ये जैन यांनी पुन्हा १.३४ अब्ज डॉलरची नव्याने गुंतवणूक केली.

हेही वाचा >>>कॉसमॉस बँकेला ३८४ कोटींचा निव्वळ नफा

ऑगस्ट २०२३ मध्ये जैन यांनी अदानी पॉवरमध्ये ८,७०० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली. एकट्या अदानी पॉवरमधील या १.१ अब्ज डॉलर गुंतवणुकीचे आता २.७ अब्ज डॉलर मूल्य झाले आहे. एकूणच, जैन यांनी अदानी समूहामध्ये एकूण ४.३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३८,२३० कोटी रुपये गुंतले आहेत, ज्याचे आजचे मूल्य सुमारे ८३,१११ कोटी रुपयांच्या घरात आहे.

जीक्यूजी पार्टनर्स ही जागतिक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे, जी तिच्या सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी आणि ग्राहकांना दीर्घकालीन मूल्य मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. बाजारातील कल हेरण्याच्या दूरदृष्टीपणामुळे जैन यांचा यशस्वी गुंतवणूकदार म्हणून लौकिक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajeev jain gqg investment in adani shares at 83111 crores print eco news amy