लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : कॉसमॉस बँकेला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ३८४ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, बँकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा उच्चांकी निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ३५ हजार ४०८ कोटी रुपये झाला असून, त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात एकूण ४ हजार ६६२ कोटी रुपयांची वाढ झाली, असे काळे म्हणाले. बँकेच्या एकूण ठेवी २० हजार २१६ कोटी रुपयांवर पोहोचल्या असून त्यात २ हजार ५८७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेचे कर्ज वितरण १५ हजार १९२ कोटी रुपये झाले असून त्यात २ हजार ७५ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेचे ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) ३.२२ टक्के असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) १.५४ टक्के आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) १५.४३ टक्के आहे. बँकेला मार्चअखेर ४६१ कोटींचा करपूर्व नफा झाला असून ३८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या विक्रमी कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

हेही वाचा >>>रिलायन्स कॅपिटलची दिवाळखोरी प्रक्रियेसाठी मुदतवाढीची ‘एनसीएलटी’कडे मागणी

मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने मुंबईमधील मराठा सहकारी बँक (७ शाखा) आणि साहेबराव देशमुख सहकारी बँक (११ शाखा) या दोन बँकांचे विलीनीकरण करून घेतले. या विलीनीकरणामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये बँकेच्या ५० शाखा कार्यरत झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेच्या ७ राज्यांत एकूण १७० शाखा आहेत. बँकेने आतापर्यंत एकूण १८ छोट्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. या विलीनीकरणामुळे लाखो ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण झाले आहे, अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कासार यांनी दिली.