पीटीआय, नवी दिल्ली

किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये ४.८५ टक्क्यांसह पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या फेब्रुवारी महिन्यातील ५.०९ टक्क्यांवरून किरकोळ महागाई दराने दिलासादायी घसरण दाखवली असली, तरीही हा दर रिझर्व्ह बँकेकडून निर्धारित ४ टक्क्यांच्या समाधान पातळीच्या वरच अद्याप टिकून आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ५.१ टक्के आणि ५.०९ टक्के असा सारखाच राहिला होता. तर गेल्यावर्षी मार्च २०२३ मध्ये तो ५.६६ टक्के पातळीवर होता. याआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये महागाई दर हा ४.८७ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य घटकांमधील महागाईचा दर मार्च महिन्यात ८.५२ टक्के होता, जो आधीच्या महिन्यातील ८.६६ टक्क्यांवरून किरकोळ घटला आहे. जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरणामुळे अन्नधान्याच्या किमतीतील अनिश्चिततेबाबत चिंता सरलेली नाही. सततच्या भू-राजकीय तणावामुळे वस्तूच्या किमती आणि पुरवठा साखळीला धोका निर्माण होतो.

हेही वाचा >>>व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

किरकोळ महागाई दराचा अंदाज घेऊन रिझर्व्ह बँक व्याजदरासंबंधी धोरण निश्चित करत असते. मध्यवर्ती बँकेने विद्यमान आर्थिक वर्षात सामान्य पर्जन्यमान गृहीत धरून किरकोळ महागाई ४.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि तापमानवाढीचा परिणाम शेतीवर होऊन, अन्नधान्य महागाईबद्दल चिंताही तिने एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीनंतर व्यक्त केली आहे. एप्रिल-जून २०२४ तिमाहीत महागाई दर ४.९ टक्के आणि सप्टेंबर तिमाहीसाठी ३.८ टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.