अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योती रेझिन्स ॲण्ड अधेसिव्ह लिमिटेड (बीएसई कोड ५१४४४८)

प्रवर्तक: जगदीश पटेल

बाजारभाव: रु. १,७०५/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: अधेसिव्ह

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५०.८२

परदेशी गुंतवणूकदार ०.३३

बँक/ म्यु. फंड/ सरकार ००

इतर/ जनता ४८.८५

पुस्तकी मूल्य: रु.८८.३

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: ७५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ४४.२६

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३८.५

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २३८८

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ७२.९

बीटा : ०.६

बाजार भांडवल: रु. २,०४६ कोटी (मायक्रो स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,८१८ / १,०५५

ज्योती रेझिन्स ॲण्ड अधेसिव्ह ही कृत्रिम (सिंथेटिक रेझिन्स) आणि बंधक (अधेसिव्ह) यांची भारतातील महत्त्वाची उत्पादक आहे. १७ वर्षांपूर्वी कंपनीने ‘युरो ७०००’ या ब्रँडअंतर्गत विविध प्रकारचे लाकूड चिकटवणारे (पांढरे गोंद) बाजारात आणले होते. आज युरो ७००० हा किरकोळ विभागात भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लाकूड चिकटवणारा ब्रँड आहे. कंपनी अनेक वैशिष्ट्यांसह उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि विविध सब्सट्रेट्ससाठी पर्याय प्रस्तुत करते. उदा. अँटी टर्माइट, वॉटरप्रूफ, विस्तीर्ण कव्हरेज, बुरशी प्रतिरोध, उष्णता प्रतिरोध, हवामानरोधक, उच्च फिक्सिंग ताकद, कोल्ड आणि हॉट प्रेस ॲप्लिकेशन्स, लाकूड, पीव्हीसी आणि ॲक्रेलिकसाठी वापर वगैरे. कंपनी अनेक देशांमधून कच्चा माल आयात करते. त्यानंतर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पांढरा गोंद गुजरातमधील संतेज येथील प्रकल्पामधून तयार केला जातो. त्यानंतर तयार झालेले उत्पादन ५०० ग्रॅमपासून ७० किलोपर्यंत वेगवेगळ्या आकारात पॅक केले जाते व नंतर उत्पादने किरकोळ बाजारात पुरवली जातात.

कंपनीची उत्पादन सुविधा अहमदाबाद येथे आहे. वाढती मागणी आणि बाजारपेठेतील विस्तारामुळे, कंपनीने मासिक उत्पादन क्षमता २००० टनांपर्यंत वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. सध्या, कंपनी भारतातील १२ राज्यांमध्ये २० शाखा आणि ५० वितरकांच्या मार्फत सेवा देत आहे. संपूर्ण भारतात कंपनीचे १०,००० सक्रिय किरकोळ विक्रेते असून ती तीन लाख सुतारांना सेवाही पुरवते.

कंपनीची मुख्य बाजारपेठ गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये असून कंपनी इतर राज्यांमध्ये आपली पोहोच वाढवण्याचा तसेच शाखा आणि वितरकांच्या वाढीसह विद्यमान राज्यांमध्ये प्रवेश वाढविण्याचा विचार करीत आहे. तसेच कच्चा माल आणि तयार मालाचा साठा वाढवण्यासाठी नवीन गोदामे उभारण्यावर भर देत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उलाढालीत ४६ टक्के वाढ नोंदवून ती २६१ कोटीवर नेली होती, तर नक्त नफ्यातही १३५ टक्के वाढ होऊन तो ४६ कोटींवर गेला होता. यंदाच्या जून २०२३ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ६१.१८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५.७४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत उलाढाल ४ टक्क्यांनी घसरली असली तरीही नक्त नफा मात्र तब्बल १११ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनी आपली एकूण वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर भर देत असून नवीन उत्पादन विकासावर आणि देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. उत्पादनांची वाढती मागणी पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून वार्षिक २५ टक्के वाढ दृष्टिक्षेपात असून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या प्रवर्तकांनी आपला हिस्सा ४९.९७ टक्क्यांवरून ५०.८२ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. प्रत्येक मंदीत एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कुठलेही कर्ज नसलेली ज्योती रेझिन्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये असायला हरकत नाही.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तु घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyoti resins adhesives top suppliers of synthetic wood adhesives in india print eco news asj