डॉ.आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण नेहमीच एखादा घोटाळा ऐकलं की म्हणतो ‘पॉन्झी स्कीम’ होती. आता तुम्हाला वाटेल की, पॉन्झी हा इंग्रजीमधला एखादा शब्द असेल. पण तसे काहीही नसून पॉन्झी हे एक आडनाव असून चार्ल्स पॉन्झी याने केलेल्या घोटाळ्यावरून हे नाव घेतले आहे. या माणसाने अमेरिकेत असा घोटाळा केला की, लोकांचे पैसे ठेवी म्हणून स्वीकारायचे आणि त्यावर भरपूर व्याज देण्याचे आमिष दाखवायचे. जास्त व्याजाच्या आमिषाने आणखी लोक आले की, त्यांच्याही ठेवी घ्यायच्या आणि नवीन आलेल्या ठेवींतून जुन्यांचे व्याज द्यायचे. म्हणजे एक प्रकारचा पिरॅमिडच उभारायचा आणि त्यातून आपला हिस्सा काढून घ्यायचा. जेव्हा हा फुगा फुटतो तेव्हा काही वर्षांची शिक्षा भोगून पुन्हा असेच काहीतरी करायचे. जे या प्रकारात हुशार असतात त्यांचे बिंग जरा उशिरा फुटते तर काहींचे लगेचच. चार्ल्स पॉन्झीने केलेला घोटाळा जेव्हा उघड झाला तेव्हा हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि वेगवेगळ्या देशांतील सहा बँकांनासुद्धा याची झळ बसली. अशा योजनांना तो एक आपले नाव देऊन गेला आणि ते म्हणजे ‘पॉन्झी स्कीम’. याचा मुख्य गाभा हा एखादा उद्योग असतो, जो अतिशय चांगला चालला असून त्यामधील नफ्यातून एवढे पैसे देणे शक्य आहे असे भासवले जाते.

या महाठगाने आपल्या आयुष्यात इतके उद्योग केले की, अख्ख्या वर्षाचे ”वित्तरंजन” सदराचे ५२ भाग देखील कमी पडतील. ३ मार्च १८८२ ला इटलीमधील एक लहान शहरात त्याचा जन्म झाला. महाविद्यालयात श्रीमंत मुलांबरोबर त्यांच्या सारखे राहण्यासाठी तो काहीच्या काही खर्च करत असे. त्यामुळे महाविद्यालय सोडावे लागले आणि पुढे तो कंगाल झाला. मग त्याने इटलीमधून अमेरिका गाठली. त्याच्या शब्दात सांगायचे तर तो स्वप्नांचा देश. १५ नोव्हेंबर १९०३ ला तो बोस्टन शहरात उतरला आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. पण तिथेही चोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्याची हकालपट्टी करण्यात आली. मग त्याने आपला मोर्चा वळवला तो कॅनडात. तिथेही काही त्याची फारशी चलती नव्हती पण तिथे तो अत्यंत महत्त्वाचे गणित शिकला ते म्हणजे चिट फंड फ्रॉड. तिथे त्याने एका बँकेत नोकरी सुरू केली ज्याचे नाव होते झेरॉसी बँक. ही बँक ६ टक्के व्याज द्यायची जेव्हा इतर बँका फक्त ३ टक्के व्याज द्यायच्या. थोडी वर्षे हे केल्यानंतर अर्थातच बँक बुडाली आणि त्याचे मालक पैसे घेऊन मेक्सिकोमध्ये पळाले. पण पॉन्झी मात्र इथेच होता, कारण तो बँकेत फक्त नोकरी करायचा. बँक बुडाल्यानंतर त्याच्याकडे एका ग्राहकाचा ४२३ डॉलरचा धनादेश त्याला सापडला, जो त्याने खोटी सही करून वटवण्याचा प्रयत्न केला. त्यात तो पकडला गेला आणि त्याला ३ वर्षांची शिक्षा झाली. तिथून सुटल्यावर वर्ष १९११ मध्ये त्याने पुन्हा एकदा अमेरिकेची वाट धरली. इथे आल्यावर अप्रवासी लोकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश देण्याचा धंदा सुरू केला आणि परत एकदा २ वर्षांसाठी गजाआड गेला. तिथून आल्यावर त्याला ”रोज” भेटली आणि तिच्या प्रेमात स्वतःला सुधारायचे त्याने ठरवले. लग्नानंतर त्याने सासऱ्यांच्या उद्योगाला हातभार दिला आणि अर्थात तो धंदाही बुडाला. नंतर त्याने असा धंदा सुरू केला ज्यामुळे इतिहास घडला आणि त्याचे आडनाव अजरामर झाले!

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra finance what is ponzi scheme mmdc amy