म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांत गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. म्युच्युअल फंडात दीर्घकाळ आणि सातत्याने गुंतवणूक केली, तर महागाईवर मात करणारा चांगला परतावा मिळू शकतो. शिवाय म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतूनच चक्रवाढ दराने लाभाची किमया अनुभवायला मिळते, असे मत एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार झा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला हा संवाद…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा दृष्टिकोन कसा असावा?

– जागतिकीकरण म्हणजेच ‘चायना प्लस वन’ धोरण, आत्मनिर्भर भारत आणि उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजना यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा अर्थव्यवस्थेला होत आहे. उत्पादन क्षेत्रात २ लाख कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. यात सध्या संरक्षण क्षेत्र खूपच आशादायी असून सरकारने त्यामध्ये ८७ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही क्षेत्रात अनुकूल सरकारी धोरणे आहेत. देशाची लोकसंख्या जास्त असल्याचे अनेक फायदे सध्या होत आहेत. देशात कामकरी वयातील तरुणांची संख्या ६५ टक्क्यांहून अधिक आहे. लोकसंख्येत मध्यमवर्गीयांची संख्या ४४ कोटींच्या आसपास आहे. यामुळे बऱ्याचशा अमेरिकी कंपन्यांसह इतर परदेशी कंपन्या भारतात गुंतवणुकीस इच्छुक आहेत. असे असले तरी काही नकारात्मक गोष्टी देखील आहेत. महागाई किंवा खाद्यवस्तूंच्या किमतीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. महागाई सध्या ४.८ टक्क्यांवर म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीवर आहे. मात्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे २५ कोटींहून अधिक लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक आहेत. या स्थितीत येत्या काळात जोखीम तर राहणार आहेत पण दीर्घकालीन विचार केल्यास शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून ५, १० किंवा १५ वर्षे नियमित गुंतवणूक केल्यास संपत्ती निर्मिती निश्चित करता येईल. मात्र गुंतवणूक करताना ती धेयाधिष्टित असणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>दीर्घ मुदतीत चांदी सोन्याहून पिवळी ठरेल?

गुंतवणूक नेमकी कशी करावी?

बचत सर्वात महत्त्वाची आहे. बचत आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक ताकद देते. तरुण वयात बँकेत बचत करण्यास सुरुवात करण्यासही हरकत नाही. त्यांनतर पुढे आणखी बचत झाली किंवा उत्पन्न वाढले की आवश्यक आयुर्विमा विमा घेऊन स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करायला हवे. त्यांनतर मग म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वळायला हरकत नाही. अशी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीची एक-एक पायरी चढत जायला हवी. अखेरीस शेअर बाजाराचा अर्थात इक्विटीमध्ये देखील गुंतवणूक करावी. मात्र गुंतवणूकदारांनी बिटकॉइनसारख्या आभासी आणि उच्च जोखीम असलेल्या पर्यायापासून लांब राहावे.

म्युच्युअल फंडांद्वारेच चक्रवाढ लाभाची किमया शक्य

एलआयसी म्युच्युअल फंडासमोर काय आव्हाने आहेत?

– जानेवारी २०२४ मध्ये मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, परिस्थितीचा आढावा घेत व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एयूएम ३१ मार्च २०२३ अखेर १६ हजार कोटी होता तो आता २७ हजार कोटींपुढे नेण्यास यश आले आहे. तिमाही सरासरी एयूएम ३० हजार कोटींहून अधिक असून त्यात ७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तुलनेत म्युच्युअल फंड उद्योगात वाढीचे प्रमाण ३४ टक्के आहे. विश्वसनीयता हे एलआयसी म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य राहिले आहे. आमच्या देशात केवळ ३६ शाखा आहेत. त्यात चालू वर्षात वाढ करून त्या ५० वर नेण्याचा आमचा मानस आहे. सध्या ३०० कर्मचारी आमच्याकडे कार्यरत आहेत. एलआयसी म्युच्युअल फंड वितरकांचे जाळे वाढण्यासाठीही प्रयत्नशील आहोत. आमच्यामागे ‘एलआयसी’ सारख्या महाकाय संस्थेचे पाठबळ आहे. दोन्ही संस्थांच्या प्रगतीमध्ये वितरकांचे मोठे योगदान राहिले आहे. म्युच्युअल फंड व्यवसाय स्पर्धात्मक असून सध्या ४५ म्युच्युअल फंड घराणी सक्रिय आहेत. यासाठी आम्ही इक्विटी गुंतवणुकीचा संघ आणखी मजबूत करत असून आधीपासून डेट अर्थात रोखे श्रेणीमध्ये आमची चांगली कामगिरी राहिली आहे. आयडीबीआय म्युक्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर, त्यांच्या इक्विटी योजना आमच्याकडे आल्या. सध्या ३९ म्युच्युअल फंड योजना कार्यरत आहेत.

हेही वाचा >>>Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची – थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय? तो बंधनकारक असतो का?

एलआयसीचे पाठबळ असूनही एयूएम केवळ ३० हजार कोटींवरच सीमित कसे?

– वर्ष २०१५-१६ दरम्यान एलआयसी एमएफने नोमुरासोबत हातमिळवणी केली होती. मात्र त्या भागीदारीला हवे तसे यश मिळाले नाही. आता मात्र वाढीसाठी विविध धोरणे आखली जात असून एलआयसीकडूनही त्यासाठी मदत मिळत आहे. वर्ष २०१५ दरम्यान एयूएम ५५ हजार कोटींवर पोहोचला होता. मात्र त्यात पुन्हा घट झाली. यासाठी आता इक्विटी योजनांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत रोखे योजनांवर अधिक भर राहिला होता. पाच वर्षांपूर्वी इक्विटीमधील आमचे एयूएम २ हजार कोटींच्या आसपास होते. मात्र ३१ मार्च २०२४ अखेर ते १३ हजार कोटींपुढे गेले आहे. आता इथून ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत ते दुप्पट करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाने www.licmf.com या संकेतस्थळात अनेक बदल केले असून ते ग्राहकसुलभ बनविले आहे. मी स्वतः त्या माध्यमातून गुंतवणूक करतो. याआधी आमचे कोणतेही ॲप गुंतवणुकीसाठी उपलब्ध नव्हते. मात्र आता एलआयसी एमएफ इन्व्हेस्टर ॲप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

सेबीने मिड-स्मॉलकॅप क्षेत्रातील समभागांच्या वाढलेल्या मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त केली, याचा एकंदर काय परिणाम झाला आहे?

– एलआयसी म्युच्युअल फंडाकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील योजना नव्हत्या. मात्र आयडीबीआय म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर त्या योजना आमच्याकडे आल्या, त्या सध्या चांगली वाढ दर्शवत आहेत. भांडवली बाजार नियामक सेबी आणि म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने म्युच्युअल फंडांनी बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे अचानक होणाऱ्या विमोचनांची (रिडम्प्शन) पूर्तता करण्याकरिता स्मॉल आणि मिड-कॅप फंड योजनांची क्षमता तपासण्यासाठी ताण चाचणी अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. आम्ही रोज ताण चाचणी करतो आहोत. यासाठी सेबीने २५ टक्के किंवा ५० टक्के गुंतवणूकदारांनी एकाच वेळेस फंडातून पैसाची मागणी केल्यास अशा परिस्थितीत, निधी व्यवस्थापकाने फंडाच्या गंगाजळीतून खरेदी केलेले समभाग विक्री करण्यासाठी किती वेळ लागेल, असा निकष निश्चित केला आहे. एलआयसी एमएफ या निकषानुसार त्याच दिवशी म्हणजेच एका दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकतो, एवढी परिस्थिती उत्तम आहे. गुंतवणूकदार जर स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्यास त्याने दीर्घकालीन दृष्टिकोनच बाळगायला हवा. सहा-आठ महिन्यांत गुंतवणूक काढून घेण्याचा अजिबात विचार करायला नको. जे गुंतवणूकदार पहिल्यांदा गुंतवणूक करत आहेत, त्यांनी लार्जकॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करावी. कारण बाजारातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक असल्याने अस्थिरतेची जोखीम कमी असते.

लहान शहरांमध्ये अर्थजागरूकता वाढते आहे, तिथे पोहोचण्यासाठी एलआयसी एमएफचे प्रयत्न काय आहेत?

– एलआयसी एमएफ १४ ते १५ नवीन शाखा सुरू करणार आहे. त्यापैकी बहुतांश शाखा द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये उघडण्यात येतील. म्युच्युअल फडांच्या वाढीसाठी स्थानिक भाषांमध्ये आम्ही माहिती देत आहोत. सध्या नऊ भाषांमध्ये माहिती उपलब्ध केली आहे. कारण लहान शहरांमध्ये त्यांच्या भाषेत माहिती दिल्यास त्यांना याविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. सेबीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, अर्थ साक्षरता कार्यक्रम देखील घेत आहोत.

आपण स्वतःचे संपत्ती व्यवस्थापन कसे करता?

– एलआयसीमध्ये १९८९ मध्ये रुजू झाल्यापासून गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यावेळी म्युच्युअल फंड फारसे लोकप्रिय नव्हते. त्यामुळे त्यावेळी एलआयसी पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ, एनएससी यात गुंतवणूक करत होतो. मात्र २०१० पासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली.

गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार आवश्यक आहे का?

– आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे. कारण म्युच्युअल फंड वितरक किंवा आर्थिक सल्लागार गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार त्यांना योजनांची सविस्तर माहिती देऊ शकतो. गुंतवणूकदाराची आर्थिक स्थिती जाणून आणि भविष्यातील आर्थिक ध्येयांची माहिती घेऊन तो गुंतवणूक पर्याय सुचवतो. महागाई वाढत असताना त्यासोबत दोन हात करत कशा प्रकारे गुंतवणूक वाढवता येईल याबाबत तो त्याक्षेत्रातील तज्ज्ञ या नात्याने चांगले मार्गदर्शन करू शकतो. मुलांचे शिक्षण, परदेशात शिक्षण, लग्न, पर्यटन अशा विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळी गुंतवणूक करावी लागते. सध्या १,४०० वेगवगेळ्या योजना बाजारात आहेत. मी स्वतः म्युच्युअल फंड व्यवसायात कार्यरत असून एका मोठ्या म्युच्युअल फंड घराण्याचा मुख्याधिकारी आहे. मात्र तसे असूनही वेळेअभावी सर्व म्युच्युअल फंड योजनांचा सविस्तर अभ्यास करणे जिकरीचे होते. असेच इतर लोकांच्या बाबतीत देखील घडत असेल, त्यांच्या रोजच्या कामामुळे त्यांना कोणत्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हे निश्चित करता येत नसेल. यासाठी आर्थिक सल्लागार सोबत असणे आवश्यक आहे.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compounding is only possible through mutual funds print eco news amy