Money Mantra: प्रश्न १: आपली कार विकताना गाडीची इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर करता येते का?
उत्तर: होय, गाडीची इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर करता येते, मात्र अशी ट्रान्सफर खरेदी तारखेपासून १५ दिवसांच्या आत करावी लागते व अशी विनंती खरेदीदाराने इन्श्युरन्स कंपनीला करावी लागते. यासाठी इन्श्युरन्स कंपनी सबंधित वाहनाची तपासणी करू शकते, करतेच असे नाही. तथापि, या पॉलिसीवरील ‘नो क्लेम बोनस’ खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर होत नाही.

प्रश्न २: आपल्या सध्याच्या कारला सीएनजी किट बसविल्यास तसे इन्श्युरन्स कंपनीला कळवावे लागते का?
उत्तर: होय, कळवावे लागते. आपण सध्याच्या गाडी सीएनजी किट बसविलेला असेल तर तसे इन्श्युरन्स कंपनी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) कळवावे लागते, तशी नोंद गाडीच्या आरसी बुकमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून होणे आवशक असते व अशी नोंद झालेल्या आरसी बुकची प्रत इन्शुरन्स कंपनीस द्यावी लागते.

हेही वाचा…Money Mantra: पुनर्विकासादरम्यान मिळणाऱ्या ट्रान्झिट भाड्यावर कर भरावा लागतो का?

प्रश्न ३: इलेक्ट्रिक कार अथवा स्कूटरच्या व्हेईकल इन्शुरन्ससाठी नेमकी काय सवलत आहे?
उत्तर: इंधन खर्चाची बचत व प्रदूषण होत नसल्याने सरकारी पातळीवर असे वाहन घेणाऱ्यास काही सवलती देऊ केल्या आहेत. त्यात अशा वाहनाच्या इन्शुरन्स प्रीमियममध्ये आयआरडीएने सवलत देऊ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रीमियम वर १५% सूट तर हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनच्या प्रीमियम वर ७.५% इतकी सूट देऊ केली होती तर आता २०२४-२५ साठी बॅटरीच्या क्षमतेनुसार प्रीमियम आकारले जाणार आहे. त्यानुसार ३० किलोवॅट क्षमतेच्या वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.१७८० तर ३० ते ६५ किलोवॅट क्षमतेच्या वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.२९०४ असेल व ६५ किलोवॅट क्षमतेवरील वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.६७१२ इतका असेल. इलेक्ट्रिक वाहनचा इन्शुरन्समध्ये प्रामुख्याने बॅटरी, तसेच अन्य इलेक्ट्रिक सुटे भाग, बॅटरीचार्जिंग स्टेशन, सबंधित अक्सेसरीज यांचा समावेश असतो. याशिवाय अन्य बाबी म्हणजे चोरी, अपघात, नैसर्गिक आपत्ती यातून होणारे नुकसान तसेच थर्ड पार्टी क्लेम यांचाही समावेश असतो.

प्रश्न ४ : थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय व अशी पॉलिसी असणे बंधनकारक असते का?
उत्तर: आपल्या मोटार वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे व ही पॉलिसी कॉम्प्रिहेनसिव्ह इन्शुरन्स पॉलिसीत समाविष्ट असते. त्यामुळे जर कॉम्प्रिहेनसिव्ह इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर वेगळी थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागत नाही, मात्र जर आपण कॉम्प्रिहेनसिव्ह इन्शुरन्स पॉलिसी घेणार नसू तर मात्र स्वतंत्र थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घ्यावीच लागते. या पॉलिसीमुळे केवळ तिऱ्हाईताच्या गाडीचे, प्रॉपर्टीचे किंवा तिऱ्हाईत व्यक्तीचे (थर्ड पार्टीचे) काही नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनीकडून तिऱ्हाईतास दिली जाते. आपल्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची (अपघात, चोरी,नैसर्गिक आपत्ती यासारख्या कोणत्याही कारणाने) भरपाई मिळत नाही.

हेही वाचा…सरफेसी कायदा आणि गैरवापर

प्रश्न ५ : इन्श्युरन्स क्लेम दाखल करताना कोणती कागदपत्रे इन्श्युरन्स कंपनीला द्यावी लागतात ?
उत्तर: १) आरसी बुकची सेल्फ अटेस्टेड प्रत
२) संबंधित गाडीची इन्शुरन्स पॉलिसी (पॉलिसी इन फोर्स)
३) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) प्रत
४) गाडी नवीन असल्यास खरेदी पावती (डिलिव्हरी चलनासहित)
५) गाडीचा अपघात झालेला असल्यास किंवा चोरीस गेली असल्यास पोलीस चौकीत केलेल्या तक्रारीची (एफआयआर ) प्रत
६) दुरुस्तीच्या क्लेमसाठी दुरुस्तीचे बील तपशीलासह व पेमेंट केल्याची पावती.

हेही वाचा…म्युच्युअल फंडातील ‘द किंग’

प्रश्न ६: इन्शुरन्स क्लेम कोणत्या कारणाने नाकाराला जातो?
उत्तर: खालील कारणस्तव क्लेम नाकारला जातो.
१) वाहक विनापरवाना गाडी चालवत असेल तर
२) वाहन परवाना आहे परंतु तो त्या प्रकारच्या वाहनास लागू नाही. (उदा: दुचाकीचा परवाना असताना कार, ट्रक, ट्रॅक्टर यासारखे वाहन चालविताना झालेला अपघात)
3) वाहनचालक वाहन चालविताना मद्य किंवा अन्य नशा करणाऱ्या पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत असल्यास
४) वाहनाचा कुठल्याही प्रकारच्या गैरवापर होत असताना (बेकायदेशीर कारणासाठी वापर होत असताना)