करोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देऊ केली होती. या सुविधा अजूनही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहेत. या कंपन्यातील कर्मचारी देशातील कोणत्याही काना-कोपऱ्यात बसून काम करू शकतात. परंतु, कामाची ही पद्धत कर्मचारी आणि कंपन्यांच्या मुळावर येत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. दरम्यान याबाबत आता टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. क्रितिवासन यांनी या रिमोट (घरातून काम करण्याची सोय) पद्धतीचे काम बंद करण्याचे आवाहन केले आहे. कार्यालयात काम करताना वरिष्ठांचं काम पाहून इतर सहकारी काम शिकत असतात, असं त्यांनी यावेळी नोंदवलं. ते नॅसकॉम कार्यक्रमात बोलत होते.

“घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही. टीसीएस टीमवर्क आणि फेलोशिपला महत्त्व देते. करोना काळात ३०-४० टक्के कर्माचारी भरती करण्यात आली. परंतु, ते कार्यालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते कंपनीची मूल्ये आणि संस्कृती कशी आत्मसात करतील?” असाही प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा >> Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड

“वरिष्ठ कर्मचारी आणि अधिकारी कसे काम करतात हे पाहून इतर कर्मचारी शिकत असतात. टीसीएस वर्क फ्रॉम होम पद्धतीला समर्थन देत नाही. कारण पारंपरिक कार्यालयीन वातावरणच सर्वात प्रभावी पद्धत आहे. आमचे सर्व कर्मचारी पुन्हा ऑफिसमध्ये येण्यास इच्छुक आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

टीसीएस कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यासाठी अल्टिमेटम

टीसीएसमध्येही करोनाकाळात वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली होती. परंतु आता जनजीवन सुरळीत झालेले असतानाही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये परतले नाहीत. त्यामुळे कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना अजून एकदा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एनजी सुब्रमण्यम यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, आम्ही संयम बाळगत आहोत. परंतु, कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात जावे लागेल अशी तत्वतः भूमिका घेतली आहे. आम्ही कर्मचाऱ्यांना यावर अंतिम निर्णय पाठवला आहे. जर ते कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.