● माझे वय ३० आहे. शिक्षण बारावी कॉमर्स. ८ वर्षानंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे बीए साठी २०२३ मध्ये अॅडमिशन घेतले आहे. मला राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन मध्ये जॉब करत आहे ८ तासांची ड्युटी करून १६ तास माझ्यासाठी उपलब्ध आहेत. वाचनाला सुरुवात केली आहे पण सद्यास्थितीत वाचलेलं लक्षात राहत नाही. राज्यसेवा मी उत्तीर्ण होण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे

राहुल मोरे.

अभ्यासाच असं एक वय असतं. अभ्यासाची एक सवय असते. ती तुटल्यानंतर पुन्हा जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. बारावी कॉमर्सपर्यंत झालेला प्रवास व त्यातील मार्क कळवले नसल्यामुळे तुमची नक्की शैक्षणिक पातळी स्पर्धेच्या कोणत्या टप्प्यावर आहे याचे मला आकलन झालेले नाही. इयत्ता नववी ते बारावीच्या दरम्यान सातत्याने ६५ टक्के मार्क असतील, त्यातही भाषा विषयात चांगले मार्क असतील तर राज्यसेवा परीक्षांच्या रस्त्याला लागणे योग्य ठरू शकेल. अन्यथा अभ्यास सोडून एखादी गोष्ट, बातमी वा लेख नीट वाचणे, लक्षात ठेवणे व स्वत:च्या शब्दात त्याची टिपणी तयार करणे यावर किमान एक वर्ष प्रयत्न करावा. आपण लिहिल्या प्रमाणे आता बीएचे दुसरे वर्ष चालू आहे. येती दोन वर्षे राज्यसेवा परीक्षा हा शब्दही न काढता बीए च्या प्रत्येक विषयात ६५ टक्के मिळवणे हे एकुलते एक ध्येय ठेवा. विषयाच्या आकलनावर भर द्या. नंतरची चार वर्षे तुम्हाला राज्यसेवा परीक्षेची तयारी व परीक्षा देण्यासाठी उपलब्ध आहेत. तोच विचार सातत्याने मनात राहिला तर ना बीए, ना राज्यसेवा असे होण्याची शक्यता जास्त. तुमचेकडे दिवसाचे फक्त सहा तास असतात. सोळा नव्हेत. तुमच्या शिकण्यातील चिकाटीचे कौतुक वाटते त्याची नोंद येथेच करत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra 10th, 12th Results 2024: १० वी, १२ वीच्या निकालाबाबत बोर्डाकडून मोठी अपडेट; तारखांबाबत अधिकारी काय म्हणाले?

● मी कृषी महाविद्यालय, दारव्हा येथे वर्ष तीन मध्ये शिकत आहे. मी माझ्या सरांकडून आयएफएस याबद्दल खूप वेळेस ऐकलय. तेव्हा मी त्याबद्दल माहिती सुद्धा मिळविण्यास सुरुवात केली. परंतु या दरम्यान मला असे जाणवले की याचा अभ्यास हा पदवी शिक्षण सुरू असताना करावा लागतो.

त्यामुळे मी बरेच प्रयत्न करत आहे परंतु पदवी चे अभ्यासामुळे तो अभ्यास करणे कठीण जात आहे. मी आपला लोकसत्ता पेपर दररोज वाचत असतो. त्यामधे करिअरवर माहिती मिळते. मला २०२५ला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा पहिला प्रयत्न कश्याप्रकारे छान जाईल याचे थोडे मार्गदर्शन हवे होते? त्यासाठी कोणते क्लास करण्याची आवश्यकता पडेल का? अवांतर अभ्यास किती प्रमाणात करावे लागतो?

चेतन पवार. चेतन, मोठे होण्याची घाई करू नये. यूपीएससीची परीक्षा ही पदवीधर झाल्यानंतर देण्याचा विषय आहे. याचाच अर्थ पदवीसाठी असणारी आणि त्याच वेळी वयानुसार येणारी मॅच्युरिटी येण्यासाठी अजून एक वर्ष आहे. अॅग्रीच्या पदवीचे मार्क आयुष्यभर सांगण्याचा विषय आहे हे वाक्य नीट समजून घे. इतकेच नव्हे तर त्या मार्कां चा उल्लेख तुझ्या मुलाखतीत सुद्धा होऊ शकतो. थोडे गमतीत सांगायचे झाले तर माझ्या कॉलेजला मी पहिला आलो होतो हे अभिमानाने लिहिण्याचे वाक्य मिळवायचे का यूपीएससीचा अभ्यास आधीपासून करावा लागतो म्हणून त्या मार्कांकडे दुर्लक्ष करायचे हे तूच ठरवावेस. तुझ्या निमित्ताने इयत्ता दहावी पासून अशी स्वप्ने बघणाऱ्या लाखो मुलांकरता हे आवर्जून लिहीत आहे. उत्तम शैक्षणिक वाटचाल ही दमदारपणे करिअरचा पाया घडवते मग ते एमपीएससी असो किंवा अन्य. पदवी परीक्षा होईपर्यंत रविवारचे दोन तास व रोजचा अर्धा तास या पलीकडे यूपीएससीसाठीचा अभ्यास हा विषय डोक्यातून काढावा. मात्र विविध विषयांवरील लेखांचे वाचन करत त्यावर स्वत:ची मते बनवून टिपणे काढून ठेवणे याचा कायमच फायदा होतो. क्लास कोणता, खर्च किती, हा विषय आता नको. त्या ऐवजी घरच्यांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन खर्चाची तयारी, यासाठी किती प्रयत्न करावयाचे आणि जमल्यास स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मिळकत कशी उभी करणार? यावर थोडासा विचार सुरू करावास.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70