अगम्य शक्तीविषयीचं लोकांच्या मनातलं गूढ आणि त्या पार्श्वभूमीवर पुरुषाच्या भ्रमरवृत्तीला बळी पडलेल्या स्त्रियांचं दु:ख, त्यांच्या अतृप्त शरीराची कुचंबणा, हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाचा गाभा. या विषयामुळेच सविता आणि नाटकाची (दृश्य) नायिका कुसुम या दोघींच्याही वेदना प्रेक्षकांच्या मनाला थेट स्पर्श करतात. त्यामुळे नाटकाला काही टीकाकारांनी अगदी फाडून खाल्लं असलं, तरी प्रेक्षकांनी ते ‘हाऊसफुल’ केलं. या नाटकाचे १००० च्या वर प्रयोग झाले. आज ३९ वर्षानंतरही अनेकांच्या स्मरणात असणाऱ्या या नाटकाविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सविता दामोदर परांजपे’ हे माझ्या भावानं, शेखर ताम्हाणे यानं लिहिलेलं पहिलं व्यावसायिक नाटक १९८५ मध्ये रंगमंचावर आलं. माझ्या व्यावसायिक दिग्दर्शनाची सुरुवातही याच नाटकानं झाली. मुक्त न झालेल्या वाईट शक्ती, अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी जेव्हा एखाद्या जिवंत देहाचा ताबा घेतात तेव्हा काय घडतं, हा विषय रंगमंचासाठी नवीन असला तरी जनमानसात (विश्वास असो वा नसो!) वर्ज्य नव्हता आणि आज ३९ वर्षांनंतरही त्या अगम्य शक्तीविषयीचं गूढ लोकांच्या मनात तसंच आहे. म्हणूनच हे नाटक आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

हेही वाचा >>> शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

नाटक, सिनेमा वा तत्सम कलाकृतीचं बीज लेखकाच्या मनात रुजायला एखादी संवेदनशील घटना कारणीभूत ठरते. त्या १५-२० टक्क्यांच्या पायावर उर्वरित इमारत रचण्याचं कौशल्य त्या लेखकाचं! ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटकही या नियमाला अपवाद नव्हतं. त्याची शेखरनं अनुभवलेली बीजकथा अशी- ‘आयआयटी’मधून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यावर शेखर सुट्टीसाठी मामाकडे वसईला गेला होता. त्याचं वाचन दांडगं. त्याबरोबर हस्तरेषाशास्त्राचा अभ्यास होता. मामाच्या शेजारी एक चाळिशीतलं उच्चभ्रू जोडपं राहात होतं. त्यांची वाडी मामाच्या वाडीला लागूनच होती. त्या बाईंच्या पोटात अधूनमधून प्रचंड दुखत असे. सर्व डॉक्टर्स पालथे घालून झाले तरी गुण येत नव्हता. अखेर शेवटचा उपाय म्हणून एकदा मामा शेखरला म्हणाला, ‘‘शेजारच्या वहिनींचा हात तू जरा बघशील? तुझ्या दृष्टीनं पाहा यावर काही उपाय सापडतोय का! दोघंही थकलेत आता.’’

मामानं सुचवल्यानुसार शेखर त्या घरी गेला. बोलता बोलता त्या बाईंकडे रोखून बघू लागला. माणसांना पारखण्याची त्याची ती सवय होती. त्याही शेखरकडे तसंच पाहू लागल्या. नजरेच्या या खेळानं थोड्याच वेळात अस्वस्थ होऊन त्या शेखरला म्हणाल्या, ‘‘निघा आता.’’ यावर त्यांचा पती म्हणाला, ‘‘अगं, तो आपल्याकडे प्रथमच आलाय… त्याला लगेच कशाला घालवतेस?’’ वातावरण थोडं निवळल्यावर शेखरनं त्यांचा हात बघण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो न्याहाळतानाच पुन्हा एकदा त्यांच्याकडे रोखून बघत प्रश्न केला, ‘‘कोण आहेस तू ?’’ त्याचा तो प्रश्न आणि आवाजातली जरब ऐकून त्या बाईंचा पती गोंधळून गेला. त्यांना खुणेनं गप्प करत शेखरनं पुन्हा तोच प्रश्न केला. तेव्हा त्याच्या हातातला आपला हात सोडवून बाई थेट आपल्या बेडरूममध्ये निघून गेल्या. शेखर पुढे महिनाभर वसईतच होता आणि रोज त्या घरी जात होता. या कालावधीत काय झालं माहीत नाही, पण त्या बाई त्यांच्या आजारपणातून पूर्णपणे मुक्त झाल्या.

हेही वाचा >>> स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

यातून सावरल्यावर या घटनेवर कादंबरी लिहिण्याचा मनोदय त्यानं माझ्यापाशी व्यक्त केला. पण मी त्याला नाटक लिहिण्यासाठी उद्याुक्त केलं. हेच ते नाटक- ‘सविता दामोदर परांजपे’! या नाटकात सुरुवातीला शेखर आणि त्या बाईंच्या पहिल्या भेटीचा प्रसंग ‘जसा घडला तसा’ टाकला आहे. १९८५ मध्ये झालेल्या पहिल्या प्रयोगानंतर पुढच्या १० वर्षांत या नाटकाचे एक हजारच्यावर प्रयोग झाले. अलीकडे त्यावर आलेला चित्रपटही लक्षवेधी ठरला. यावरून या विषयाबद्दलचं प्रेक्षकांचं कुतूहल लक्षात येतं. अशा नाटकांना येताना बहुधा रसिक प्रेक्षक त्यातली श्रद्धा-अंधश्रद्धा, वाद-विवाद यात न पडता एकसंध नाटक या दृष्टीनं, कलाकृती म्हणून त्याकडे पाहतात.

या नाटकातील प्रमुख पात्रं म्हणजे शरद आणि कुसुम अभ्यंकर हे सुस्थितीतलं उच्चशिक्षित जोडपं (ज्यांच्या लग्नाला ८-१० वर्षं उलटूनही त्यांना मूलबाळ नाहीये.) कॉलेज शिक्षणासाठी अभ्यंकरांकडे राहणारी त्यांची पुतणी नीतू, कुसुमवहिनींच्या पोटदुखीवर इलाज करणारे त्यांचे फॅमिली डॉक्टर आणि या दुखण्याचा वेगळ्या दृष्टीनं शोध घेणारा रिसर्च स्कॉलर आणि हस्तरेखातज्ज्ञ अशोक. अभ्यंकरांच्या जवळच्या मित्राचा भाचा असलेला अशोक, आपल्या मामाकडे राहायला आला आहे आणि या मुक्कामात कुसुमवहिनींची हकिगत समजताच, यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तमोत्तम उपचार करूनही कुसुमची पोटदुखी कायम का? या अभ्यंकरांच्या प्रश्नाकडे डॉक्टर आणि अशोक दोघं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. अशोकचं म्हणणं असं, की हे विज्ञानाच्या पलीकडचं विश्व आहे, पण यावर अंधश्रद्धेनं नव्हे, तर विज्ञानानंच मात करता येईल. डॉक्टरांचा असल्या गोष्टींवर बिलकूल विश्वास नाही. अशोक ज्यांना ‘दुष्ट शक्ती’ म्हणतो, त्यांना ते ‘जुन्या, कटू विषयांची छाया’ म्हणतात. डॉक्टरांच्या मते, कुसुमच्या मनाचे दोन कप्पे झालेत. त्यातला एक ‘नॉर्मल’ आहे, तर दुसऱ्यात विचारांचा चिखल झालाय. हा गुंता सोडवण्यासाठी ते अभ्यंकरांना त्यांच्या लग्नाच्या आधीपासून जे जे घडलंय, ते ते प्रामाणिकपणे रेकॉर्ड करून, स्वत:च शांतपणे ऐकायला सांगतात. स्टडीरूममध्ये बसून ते रेकॉर्डिंग करत असताना, प्रेक्षकांना नेमकं काय घडलंय याची कल्पना येते.

सविता दामोदर परांजपे ही शरद अभ्यंकरांची जुनी मैत्रीण. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण सविताची देखणी मैत्रीण कुसुम हिच्याशी ओळख होताच, ते सविताला डावलून तिच्याशी लग्न करून मोकळे होतात. त्या लग्नाच्या रात्रीच सविता स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या करते. या घटनेनंतर अपराधीपणाची भावना अभ्यंकरांना कायम छळत राहते. त्यामुळे ते कुसुमला पूर्ण सुख देऊच शकत नाहीत. त्यांनी रेकॉर्ड केलेला हा कबुलीजबाब अनवधानानं कुसुमच्या कानी पडतो आणि ती त्यांना जाब विचारते, ‘‘का केलंत तुम्ही हे असं? मलाही फसवलंत आणि तिलाही!’’ पुरुषाच्या भ्रमरवृत्तीला बळी पडलेल्या स्त्रिया हा कधीही न संपणारा विषय. त्यामुळे दोघींच्याही वेदना प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्श करतात.

अभ्यंकरांची शरीरसुख देण्यातली असमर्थता नाटकातल्या एका प्रसंगातून स्पष्ट होते. बेडरूममधला सीन- नाइट गाऊनमधील कुसुम बेडरूममध्ये येऊन नवऱ्याच्या पांघरुणात शिरते आणि पायाच्या अंगठ्यानं त्याचा पाय घासायला सुरुवात करते. पण तो तिचा पाय सारखा बाजूला करत राहातो. शेवटी तो उठून खाली स्टडीरूममध्ये जाऊन बसतो. या वेळी एकही संवाद नाही. पण जे दिसतं, त्यावरून कुसुमची कुचंबणा प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचते. संपूर्ण नाटक ज्या तीन ठिकाणी घडतं, त्या जागा- म्हणजे अभ्यंकरांच्या घराचा हॉल, त्यातल्या जिन्यानं वर गेल्यावर लागणारी बेडरूम आणि जिन्याच्या दुसऱ्या बाजूला अभ्यासिका. हे सर्व प्रेक्षकांना एकाच वेळी दिसेल असं नेपथ्य आम्ही साकारलं. त्यामुळे वर पलंगावर पडलेली अस्वस्थ कुसुम प्रेक्षकांना दिसत राहते, त्याच वेळी खाली हॉलमध्ये चाललेल्या अशोक आणि अभ्यंकरांच्या संभाषणाकडेही त्यांचे कान लागतात.

सौभाग्यवती असल्याची (त्या काळची) महत्त्वाची खूण म्हणजे मंगळसूत्र. कुसुममध्ये दडलेल्या दोन व्यक्ती दाखवण्यासाठी आम्ही त्याचा खुबीनं वापर केला. जेव्हा सविता, कुसुमचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू लागे, तेव्हा कुसुमची पोटदुखी आणि मंगळसूत्राशी चाळा सुरू होई. नंतर थोड्याच वेळात ती ते काढून फेकून देई, तेव्हा तिची देहबोली पार बदलून गेलेली असे. कुसुमच्या देहात ‘सविता दामोदर परांजपे’ वावरू लागे. ज्या वेळी हे स्थित्यंतर घडे, त्या वेळी रंगमंचावरील कलाकारच नव्हे, तर संपूर्ण प्रेक्षागृहच अस्वस्थ होत असे. या बदलासाठी रिमाचा (रिमा लागू) किंचित खर्जातला आवाज चांगलाच परिणामकारक ठरला.

सविताला लागलेली शरीरसुखाची आस दाखवणारा प्रसंगही अंगावर काटा आणणारा! जेव्हा अशोक तिला विचारतो, ‘‘कुसुमला कायमचं सोडण्यासाठी तुला काय पाहिजे ते सांग…’’ तेव्हा तिचं थंड आवाजातलं उत्तर- ‘‘या शरीराला हवाय पूर्ण पुरुषाचा स्पर्श… देशील? मग मी निघून जाईन कायमची.’’ ऐकताना केवळ अशोकच नव्हे, तर संपूर्ण नाट्यगृह हादरतं. आजही उघडपणे व्यक्त केली न जाणारी स्त्रीची ही गरज किंबहुना हक्क रंगमंचावर मांडण्याचं धारिष्ट्य या नाटकानं दाखवलं होतं.

या नाटकाचा शेवटही पूर्वापार चालत आलेल्या समजुतींना पोषक ठरेल असा आहे. खरं तर पहिल्या सात-आठ प्रयोगांत कुसुम आपल्या मनावरील असह्य ताण संपवण्यासाठी स्वत:वर रॉकेल ओतून जाळून घेते असं दाखवलं होतं. पण नंतर बदललेला आणि अत्यंत परिणामकारक ठरलेला शेवट असा…

कुसुमकडे बघणाऱ्या अशोकला अचानक काही तरी वेगळं जाणवतं आणि तो ओरडतो, ‘‘ती गेली… कायमची!’’ तोच बाजूला जिन्याच्या पायरीवर बसलेली नीतू (जी आतापर्यंतच्या सर्व घटनांची साक्षी आहे.) एका हातानं पोट दाबून धरत, दुसऱ्या हातानं गळ्यातल्या चेनशी खेळू लागते. हे दृश्य बघताना सर्वांना जो धक्का बसतो तो शब्दात मांडणं कठीण! अख्खं प्रेक्षागृह सुन्न होतं. हेच या नाटकाचं यश.

या नाटकावर अनेक आसूडही उठले. काही टीकाकारांनी अगदी फाडून खाल्लं. मात्र प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दी करत आपला कौल दिला. याचा अर्थ असा, की ‘असं घडू शकतं’ यावरचा लोकांचा विश्वास म्हणा किंवा अंधविश्वास आहे. म्हणूनच हे नाटक लोकांना आवडलं असावं, असंच म्हणावं लागेल.

rajantamhanes35@gmail.com

शब्दांकन संपदा वागळे

waglesampada@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about famous marathi play savita damodar paranjape zws