नृत्य फक्त कलावंतांसाठी नसतं. प्रत्येक व्यक्ती जन्मजात नट आणि नर्तक असतेच. उत्तम व्यायाम, सळसळता उत्साह, मन:शांती, एकूणच आयुष्यात स्थिरता आणि सरतेशेवटी अध्यात्माची अनुभूती, असा नृत्यातला प्रवास कुणीही पूर्ण करू शकतं. याचसाठी नृत्याकडे व्यायाम म्हणूनही पाहिलं पाहिजे! नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’च्या (२९ एप्रिल) निमित्तानं सांगताहेत प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपलं आरोग्य उत्तम राहावं असं सर्वांनाच वाटतं. आणि ते उत्तम ठेवण्याचे अनेक प्रकार आहेत… चालणं, धावणं, पोहणं, योगासनं करणं, एरोबिक्स करणं, जिममध्ये जाणं… हे सर्व तर आहेच. त्यात मी आणखीन एका प्रकाराची भर घालते- नृत्य!

आपल्या समाजात नृत्य अनंत अनादी काळापासून आहे. करमणुकीचं माध्यम, भक्तीचं माध्यम, आनंदाचं, संपर्क किंवा संवादाचं माध्यम, अशा सर्व कारणांनी समाजात नृत्याचं अस्तित्व आहेच आहे. नृत्य म्हणजे काय? शरीराची हालचाल, डोळ्यांची, भुवयांची, डोक्याची, हातापायांची, बोटांची हालचाल… आपण सर्वजण कळत-नकळत आपल्या रोजच्या आयुष्यात नृत्य करतच असतो की! बघा ना, समोरच्या व्यक्तीला आपण काही सांगायला लागलो, की प्रसंगाचं वर्णन करता करता आपोआप आपलं शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं हलतं. छोट्या मुलांना काही समजावून सांगायचं असेल, तर चेहरा मृदू होतो, हाता-बोटांमध्ये मार्दव येतं, शरीर थोडं खाली झुकू लागतं. कुठल्या थरारक घटनेचं वर्णन करायचं असेल, तर मग प्रसंगी शरीराच्या हालचालींना थाराच नसतो… असंख्य हातवारे केले जातात, डोळे छोटे-मोठे केले जातात, इकडेतिकडे ऊठ-बस, काही विचारू नका! मला वाटतं प्रत्येक मनुष्य जन्मत:च नट किंवा नर्तक असतो. जसजसे आपण मोठे होतो, तसतसा समाज आपल्याला आपल्या नैसर्गिक हालचाली रोखायला लावतो किंवा तसं शिकवतो. म्हणूनच मला ‘नृत्य’ हा प्रकार आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुचवावासा वाटतो.

आणखी वाचा-शिल्पकर्ती!

नृत्याचे अनेक प्रकार आहेत. माझ्या लहानपणी मात्र मला नृत्याचे दोनच प्रकार माहीत होते, लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य! तेदेखील आपल्या देशातलंच. नंतर अर्थातच माहितीत भर पडली. लोकनृत्यामध्ये तर अनेक प्रकार आहेत. प्रत्येक राज्याचं एक लोकनृत्य आहे. बऱ्याचशा पदन्यासांमध्ये साम्य असलं, तरी शैली थोडी वेगळी असतेच. भारतात आठ प्रकारचं शास्त्रीय नृत्य आहे. लहानपणी, सहा वर्षांची असल्यापासून ते अकरावी उत्तीर्ण होईपर्यंत ‘राष्ट्र सेवा दला’च्या कलापथकामध्ये मी अनेक प्रकारची लोकनृत्यं शिकले आणि प्रस्तुतदेखील केली; अर्थात सेवा दलाच्या कार्यक्रमांतूनच. सुरुवातीला मला केवळ भरतनाट्यम् आणि कथक माहिती होतं. नंतर हळूहळू इतर शास्त्रीय नृत्यांचीही ओळख झाली- मणिपुरी, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम्, कुचिपुडी, सत्तरीया… यातलं ‘ओडिसी’ तर माझा ‘प्यार’च बनून गेला! ओडिसीमध्ये माहीर होत होते, तेव्हा आपल्या देशातही पाश्चात्त्य देशांतून अनेक प्रकारच्या नृत्यशैली येऊ लागल्या होत्या. आता तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यशैली शिकवल्या जातात- हिपहॉप, जॅझ, बॉलरूम, क्लासिकल बॅले, साल्सा, ब्रेक, टॅप, जाईव, सांबा, झुंबा, स्टेप, लाईन, टँगो, वाल्ट्झ आणि इतरही.

नृत्याचा कुठलाही प्रकार- स्वत:साठी असेल किंवा इतरांसाठी असेल… तो अगदी मनापासून केला की शरीराला अत्यंत चांगला व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनतं आणि मनाला आनंद मिळतो. माझ्या मते त्यानं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. नृत्य केल्यानं शरीरात आणि मनात उत्साह निर्माण होतो. खूप सारं ‘अड्रेनलिन’ शरीरात स्रावतं आणि त्यामुळेही उत्साहवर्धक स्थिती खूप काळ टिकते. याची शारीरिक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. मग कुठला नृत्यप्रकार करावा? कुठल्या प्रकारानं जास्त फायदा होईल? त्यातल्या त्यात सोपा प्रकार कोणता? हे पुढचे प्रश्न असतात. माझ्या मते ते अवलंबून असतं आपल्या आवडीवर आणि आपल्या शरीराच्या आणि मनाच्या क्षमतेवर. तरीही वर्गीकरण करायचंच झालं, सोप्यापासून अवघडपर्यंत- तर मला वाटतं भारतीय लोकनृत्य, मग बरेचसे वर दिलेले पाश्चात्त्य नृत्यप्रकार, त्यानंतर भारतीय शास्त्रीय नृत्य आणि सरतेशेवटी क्लासिकल बॅले!

आणखी वाचा-सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

‘क्लासिकल बॅले’ मी शेवटी घेतलं, कारण आपली भारतीय शरीरयष्टी त्या नृत्य प्रकाराला योग्य नाही असं मला वाटतं. म्हणून ते आत्मसात करायला, अंगवळणी पडायला वेळ लागतो. त्याउलट महाराष्ट्रातली कोळी, आदिवासी, शेतकरी, धनगरी नृत्यं बघा… त्या संगीताची, त्या भाषेचीदेखील मजा लुटता येते आणि मग नृत्य सोपं वाटू लागतं. इतर राज्यांतली लोकनृत्यं शिकताना, करताना जरी भाषा समजली नाही, तरी संगीताचा आनंद लुटू शकतोच आपण. कारण ते ओळखीचं वाटतं. परंतु ‘क्लासिकल बॅले’चं तसं नाही, कारण त्याबरोबर पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत वापरलं जातं आणि फार कमी भारतीय लोकांना पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत ज्ञात आहे. दुसऱ्या क्रमांकावर मी क्लासिकल बॅले सोडून इतर सर्व पाश्चात्त्य नृत्यशैली ठेवल्या. कारण त्यातही मजा लुटता येते. यातल्या काही नृत्यांमध्ये वेगवान संगीत वापरतात आणि त्या वेगाचीच एक नशा चढते. मग उत्साह निर्माण होऊन संगीत-नृत्याचा आनंद लुटता येतो.

भारतीय शास्त्रीय नृत्यात मात्र माझ्या मते पूर्ण शरीराला भरपूर व्यायाम होतो. स्नायू, हाडं, सांधे भक्कम होतात. डोळे, भुवया, डोकं, मान, हात-पाय, सर्व अवयवांना व्यायाम होतो. महत्त्वाचं म्हणजे बोटं. शास्त्रीय नृत्यात बोटांच्या मुद्रा करतो आम्ही. उदाहरणार्थ- तर्जनी आणि अंगठा जोडून बाकीची बोटं सरळ, ताठ ठेवली की त्या मुद्रेला ‘हंसास्य’ म्हणतात. ही मुद्रा आपण सामान्य आयुष्यात अनेकदा वापरतो. सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे- ‘कित्ती छान! किती सुंदर!’ हे दर्शवायला आपण या मुद्रेचा उपयोग करतो. नृत्यातदेखील हेच आणि इतर अनेक अर्थ या मुद्रेतून निघतात. हे सांगण्याचा माझा उद्देश असा, की अशा विविध मुद्रा करण्यानंही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यास मदत होते.

काही वर्षांपूर्वी मी सुमन चिपळूणकर यांचं ‘मुद्रा व स्वास्थ्य’ हे पुस्तक वाचलं होतं. त्यातून मला कळलं की, मी नृत्यात ज्या मुद्रा करते, त्याचा माझं स्वास्थ्य चांगलं राखण्यात फायदा होतो. माझी समजूत होती, की माझी तब्येत उत्कृष्ट आहे, कारण मी नाचते! माझ्या स्नायूंना, हाडांना चांगला व्यायाम होतोय म्हणून. पण मुद्रेचा असा उपयोग माझ्या ध्यानीमनीदेखील नव्हता. ‘हंसास्य’ मुद्रा सातत्यानं केली तर आपल्या थायरॉइड आणि पिट्युटरी ग्रंथी सक्षम होतात असंही या पुस्तकांत म्हटलं आहे. याशिवाय आळस निघून जातो, मेंदू तीक्ष्ण होतो. म्हणूनच बहुधा भारतीय शास्त्रीय नृत्य करणारी माणसं निरोगी असावीत. त्यामुळे आपल्या व्यायाम प्रकारात ‘नृत्य’ हा प्रकार घ्यायला काहीच हरकत नाही.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?

मी आज ७० वर्षांची आहे. परंतु मला माझं वय जाणवतच नाही! इतर नृत्य मला प्रिय आहेच, पण माझ्या ओडिसी नृत्यानं मला आनंदाबरोबर ध्येय दिलं. आत्मविश्वास दिला. माझ्या हालचाली, चालणं यांना डौल प्राप्त करून दिला. सतत काही तरी करत राहण्याचं बळ दिलं. नृत्यामुळे येणारा डौल नक्कीच वेगळा असतो. म्हणूनच मी आग्रह धरेन, की नृत्य हा एक व्यायाम प्रकार होऊ शकतो. डौल असणं आणि व्यायाम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यायाम करता करता तो डौल येईल सुद्धा.

अर्थात यासाठी थोडा तरी वेळ द्यायला हवा. समजा नृत्य करायला- म्हणजे शिकायला जायला वेळ नाही असं वाटत असेल, तरी ‘ऑनलाइन’ क्लास असतातच. शिवाय नृत्याची ‘मॉड्युल’ बनवून, ‘डिजिटल’ रूपात ठेवलेली असतात. त्यातलं तुम्ही काही करू शकता. आणि हो, तुम्ही फार पूर्वी नृत्य शिकलेले असाल आणि मधल्या काळात खूप खंड पडला असला तरीही तुम्हाला पुन्हा केव्हाही नृत्याकडे वळता येणं शक्य आहे. कितीही काळाचा खंड पडला असला तरीही. तसंच तुम्ही कुठल्याही वयात नृत्य शिकायला सुरू करू शकता. १०, २०, ३० वर्षांच्या… ज्या वयात जे जमेल ते. कदाचित काही जणांना ५० व्या वर्षी जमणार नाही, पण जितपत जमवता येईल तेवढं जमवायला हवं. ना! मग बिनधास्त नाचा!

नृत्याबद्दल मीही फार सखोल विचार सुरुवातीला केला नव्हता. पण जसजशी वर्षं लोटली, तसतसं मी अनुभवलं, की एक प्रकारची मन:शांती आणि स्थिरता माझ्यात निर्माण झाली. आयुष्यातले अनेक कठीण प्रसंग मी लीलया हाताळू शकले. मन:शांती आणि स्थिरतेबद्दल बोलताना मला एक प्रसंग आठवतोय… मी स्वत:ला नास्तिक समजते. पण माझी माझ्या कामावर, नृत्यावर अपार श्रद्धा आहे. ती श्रद्धाच माझं अस्तित्व आहे, तीच माझा देव आहे. एकदा गोव्यात माझ्या नृत्याचा कार्यक्रम होता, खुल्या मैदानात, चर्चच्या समोरच. स्टेज असं बांधलं होतं, की नाचताना येशू बरोबर डोळ्यांसमोर दिसेल. मी चोखामेळ्याच्या अभंगांवर रचलेलं नृत्य सादर करत होते. चोखा मेळ्याला देवळात प्रवेश नसतो, तरी त्याची विठूवर अपार भक्ती आहे. मी पूर्ण नृत्य येशूला उद्देशून केलं, कारण तो सतत समोर होता. नृत्य करता करता मला रडू कोसळलं. चोखा देवळात जाऊन विठोबाच्या पायाशी रडत रडत कोसळतो… आणि मी येशूच्या डोळ्यांत पाहताना ईश्वरी, दैवी शक्तीसमोर कोसळले… पाहा, नृत्य असं माणसाला व्यायामापासून अध्यात्मापर्यंत पोहोचवतं!

chingooo@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous odissi dancer jhelum paranjape article on international dance day mrj