संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना दोन तरुणांनी सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात प्रवेश केला. हे दोन तरुण खासदारांच्या बाकांवरून धावत सुटले. काही खासदार त्यांना पकडण्यासाठी पुढे आल्यावर या दोघांनी स्मोक कॅनद्वारे सभागृहात पिवळा धूर पसरवला. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. हे दोन्ही तरुण व्हिजिटर पासच्या मदतीने सभागृहाच्या वर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत बसले होते. तिथून या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या होत्या. परंतु, या दोघांना कोणत्या नेत्याने/खासदाराने व्हिजिटर पास बनवून दिला असा प्रश्न उपस्थित केला जात होता. घटनेनंतर काही वेळाने या खासदाराचं नाव समोर आलं. भाजपाचे म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयाने या दोन्ही तरुणांना व्हिजिटर पास बनवून दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी. मनोरंजन यांनी खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयातून बनवून घेतलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश मिळवला होता. दरम्यान, खासदार प्रताप सिंह यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रताप सिंह यांच्याकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर उत्तर देताना प्रताप सिंह यांनी सागितलं की, दोन आरोपींपैकी एकाच्या वडिलांनी माझ्याकडे व्हिजिटर पास मागितले होते.

खासदार प्रताप सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, “आरोपीच्या वडिलांनी मला लोकसभा व्हिजिटर पासची मागणी केली होती. कारण त्यांच्या मुलाची संसदेच्या नवीन इमारतीला भेट देण्याची इच्छा होती.” तसेच आरोपी सागर शर्मा हा प्रताप सिंह यांचे स्वीय सहाय्यक आणि कार्यालयाशी सतत संपर्क करून पासेसची मागणी करत होता. प्रताप सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांना सांगितलं की, माझ्याकडे या दोन आरोपींबाबत इतकीच इतकीच माहिती आहे.

हे ही वाचा >> “जीते या हारे…”, सागर शर्माची पोस्ट चर्चेत; सर्व घुसखोर ‘भगत सिंग फॅन क्लब’ पेजवरून संपर्कात

सभागृहात घुसून राडा करणाऱ्या या दोन तरुणांची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. त्याचबरोबर आणखी दोघांना याप्रकरणी अटक केली आहे. सागर आणि मनोरंजनचा सभागृहात राडा सुरू असताना एक महिला आणि एक तरुणी संसदेबाहेर घोषणा देत होते. संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडलं. नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरला न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या होत्या, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp pratap simha explains why his office issued passes to parliament breach accused asc