पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांना शुक्रवारी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठविली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्क साधल्याच्या विधानाबाबत तथ्यांसह वस्तुस्थिती मांडण्यास सांगितले आहे.

दिल्लीतील मद्य घोटाळय़ात नाव आल्याबाबत भाजपकडून धमकीवजा प्रस्ताव आल्याचा आरोप आतिशी यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. भाजपने मला पक्षप्रवेशाचा प्रस्ताव दिला होता. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास एका महिन्यात अटक करू, अशी धमकी देण्याचा आल्याचा दावा त्यांनी केला होता.

हेही वाचा >>>३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा यांनाही अटक केली जाऊ शकते, असा दावाही आतिशी यांनी केला.  आतिशी यांच्या आरोपानंतर भाजपने त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आतिशी यांचे विधान असत्य व तथ्यहीन असल्याचा आरोप भाजपने केला.

निवडणूक आयोग ही भाजपची ‘उपकंपनी’ आहे का? – आतिशी

कारणे दाखवा नोटीस पाठविल्यानंतर दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोग ही भाजपची ‘उपकंपनी’ आहे का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला.  निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. निष्पक्षपाती राहणे, विरोधी पक्षांनाही समान संधी मिळणे, मुक्त व निष्पक्ष निवडणुका आयोजित करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे आतिशी म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission notice to aap leader atishi directed to reply to allegations made against bjp amy