भारतात उपचारासाठी आलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची कोलकाता येथील एका सदनिकेत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पश्चिम बंगाल गुन्हे अन्वेषन विभागाने एका व्यक्तीला गुरुवारी (२३ मे) अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार खासदार अनार यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून सदनिकेत बोलविले गेले असावे आणि तिथे गेल्यानंतर भाडोत्री मारेकऱ्यांकडून त्यांची हत्या झाली असावी. पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमेवर असलेल्या भागात राहणारा रहिवासी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख उघड करण्यास नकार दिला. पुढील तपास होईपर्यंत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख उघड करता येणार नाही. सदर व्यक्ती मारेकऱ्यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासानुसार खासदार अनार यांचा अमेरिकेतील जवळच्या मित्राने या हत्याप्रकरणात सामील असलेल्यांना पाच कोटी रुपये दिले होते, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली असल्याचे टाइम ऑफ इंडियाच्या वृत्ता म्हटले आहे.

बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या कशी झाली?

अनार यांची कोलकाताच्या न्यू टाऊनमधील सदनिकेत हत्या झाली होती. ही सदनिका अनार यांच्या अमेरिकेतील मित्राची असल्याचे सांगितले जात आहे. या सदनिकेत दि. १३ मे रोजी खासदार अनार हे काही लोकांसह या सदनिकेत गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले आहे.

महिलेने हनी ट्रॅप केल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदनिकेचे मालक आणि अनार यांचे अमेरिकेतील मित्र यांच्या ओळखीच्या महिलेने अनार यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याची शक्यता आहे. महिलेच्या निमंत्रणावरून सदनिकेत गेल्यानंतर काही वेळातच अनार यांची हत्या करण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रणानुसार अनार हे एक महिला आणि पुरुषासह गुन्हा घडलेल्या सदनिकेत जाताना दिसत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, खासदाराच्या जुन्या मित्रानेच थंड डोक्याने कट रचून मित्राचा खून करण्यासाठी पाच कोटींची सुपारी दिली. खासदार अनार या सदनिकेत गेलेले दिसले आहेत. मात्र ते बाहेर पडल्याचे दिसत नाही. त्याचवेळी त्यांच्यासह सदनिकेत गेलेले दोन इसम तिसऱ्या दिवशी दोन मोठ्या बॅग बाहेर घेऊन येताना दिसतात.

पश्चिम बंगाल सीआयडीचे महानिरीक्षक अखिलेश कुमार चतुर्वेदी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “१८ मे रोजी आम्हाला माहिती मिळाली की बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांचे सहकारी गोपाल बिस्वा यांनी १३ मे पासून अनार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. “तपास सुरू असताना २० मे रोजी आम्हाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून पश्चिम बंगाल सरकारच्या चौकशीकडे लक्ष देण्याची सूचना मिळाली. २२ मे रोजी आम्हाला त्यांच्या हत्येची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांनी त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेतला आणि प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले,” असे चतुर्वेदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police suspect bangladesh mp honey trapped before murder by contract killers kvg