Bangladesh MP Murder Case बांगलादेशचे खासदार दोन आठवड्यांपूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले होते, मात्र दुसर्‍याच दिवसापासून ते बेपत्ता होते. बुधवारी सकाळी बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि अद्याप मृतदेह सापडलेला नाही. अन्वारुल अझीम अनार १२ मे रोजी कोलकाता येथे पोहोचले, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ते बेपत्ता झाले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी हेदेखील सांगितले की, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अझीम यांची कोलकाता येथील एका घरात नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली होती, असे यात सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहमंत्री खान यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या हत्येत बांगलादेशातील लोक सामील होते. भारत आणि बांगलादेशातील पोलिस दल हत्येचा तपास करत असून हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असल्याने प्रकरण नवीन वळण घेण्याची शक्यता आहे. अनार यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. अनार यांची हत्या कोणी केली? आणि आतापर्यंतच्या तपासात कोणते मोठे खुलासे झाले याविषयी जाणून घेऊ या.

हेही वाचा : अरविंद केजरीवालांना जामीन, मग हेमंत सोरेन यांना का नाही? सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

अन्वारुल अझीम अनार कोण होते?

अन्वारुल अझीम अनार हे बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगचे खासदार होते. ते झेनैदह-४ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ५ जानेवारी २०१४ साली ते पहिल्यांदा संसदेवर निवडून आले होते. २०१८ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. भारत-बांगलादेश सीमेवरील झेनैदह हे क्षेत्र गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. २००८ मध्ये इंटरपोलने अनार यांच्याविरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस जारी केली होती. २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले.

अन्वारुल अझीम अनार हे बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगचे खासदार होते. (छायाचित्र-पीटीआय)

अनार कधी बेपत्ता झाले?

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनार १२ मे रोजी बारानगरमधील मंडोलपारा येथे एका मित्राच्या घरी गेले होते. गोपाल बिस्वास असे या मित्राचे नाव असून ते सोन्याचे व्यापारी आहेत. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाले आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते, असे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तात कौटुंबिक मित्राचा हवाला देत असे म्हटले आहे की, खासदाराने आपण दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांची ढाकामधील त्यांच्या कुटुंबाशी बोलचाल झाली आणि ते दिल्लीला जाण्यासाठी निघाले, असे यात सांगण्यात आले.

‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, अनार यांनी त्यांचे मित्र बिस्वास यांना मेसेज करून कळवले की, त्यांना दिल्लीला जायचे आहे. “त्याच रात्री आपण दिल्लीला पोहोचलो असल्याचेही अनार यांनी मित्राला कळवले. आपण व्यस्त असल्याने सतत संपर्क न करण्याची सूचनाही या संदेशाद्वारे देण्यात आली आणि त्यानंतर अनार यांच्याशी थेट संपर्क झालाच नाही. बिस्वास यांनी बारानगर पोलिस ठाण्यात अनार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. वडिलांशी संपर्क न झाल्याने खासदाराच्या मुलीनेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या तपासात काय?

पोलिसांना त्यांच्या कोलकाता उपनगरातील फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. याच ठिकाणी अनार यांना शेवटचे पाहिले गेले. १३ मे रोजी ते इतर तिघांसह फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दिसले. यावरून त्यांच्याबरोबर काहीतरी गैर घडल्याचा आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय निर्माण झाला. पोलिसांना अद्याप मृतदेह सापडलेला नाही. आनंदबाजार पत्रिकेतील वृत्तानुसार, कोलकाता पोलिसांनी शहरातील न्यू टाऊन परिसरात एका फ्लॅटच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत.

१३ मे रोजी दुपारी १.४० च्या सुमारास अनार कोलकाता येथील रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टला भेटण्यासाठी कॅबमधून निघाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले की, त्यांनी न्यू मार्केट परिसरातून आणखी एका बांगलादेशी नागरिकाला आपल्याबरोबर घेतले आणि नंतर न्यू टाऊनमधील फ्लॅटकडे निघाले, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनार यांच्याबरोबर दोन पुरुष आणि एक महिला फ्लॅटमध्ये शिरल्याचे दिसून आले आहे. पुढच्या तीन दिवसांत हे तिघेही फ्लॅटबाहेर पडले, मात्र त्यांच्याबरोबर अनार कुठेही दिसले नाही. स्थानिक पोलिसांकडून हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) हस्तांतरित करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल सीआयडीचे महानिरीक्षक अखिलेश कुमार चतुर्वेदी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “१८ मे रोजी आम्हाला माहिती मिळाली की बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांचे सहकारी गोपाल बिस्वा यांनी १३ मे पासून अनार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. “तपास सुरू असताना २० मे रोजी आम्हाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून पश्चिम बंगाल सरकारच्या चौकशीकडे लक्ष देण्याची सूचना मिळाली. २२ मे रोजी आम्हाला त्यांच्या हत्येची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांनी त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेतला आणि प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले,” असे चतुर्वेदी म्हणाले.

हेही वाचा : गोपी थोटाकुरा ठरले पहिले भारतीय अंतराळ पर्यटक; अंतराळातील पर्यटन म्हणजे काय? प्रवासासाठी किती खर्च येतो?

फॉरेन्सिक टीमने फ्लॅटचे सर्वेक्षण केल्याची माहिती आहे. “आम्हाला काही माहिती मिळाली आहे, जी आत्ताच सांगता येणार नाही. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंटतज्ज्ञ फ्लॅटचा तपास करत आहेत,” असे चतुर्वेदी यांनी माध्यमांना सांगितले. बांगलादेशातील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी मोहम्मद हारून रशीद यांच्या म्हणण्यानुसार, खासदाराकडील दोन फोन अधून-मधून अॅक्टिव झाले. १६ मे रोजी सकाळी अनारच्या फोनवरून त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकाला कॉल करण्यात आला, पण तो कनेक्ट झाला नाही. जेव्हा सहाय्यकाने कॉल परत केला तेव्हा संबंधित व्यक्तीने कॉल उचलला नाही. राज्य पोलिसांनी बिहार आणि छत्तीसगडमधील पोलिसांशीदेखील संपर्क साधला, कारण मोबाइलचे सिग्नल बिहारमध्येही दिसले. बांगलादेशचे खासदार ज्या फ्लॅटमध्ये शेवटचे दिसले होते, तो फ्लॅट बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्याच्या मालकीचा आहे. त्याने हा फ्लॅट अख्तरझमन नावाच्या अमेरिकन नागरिकाला भाड्याने दिला होता.

खासदार अन्वारुल अझीम अनार यांची मुलगी कोलकात्याला जात असल्याची माहिती आहे. खासदार बेपत्ता असल्याचे कळाल्यानंतर कुटुंबाने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली, त्यानंतर दिल्लीतील उच्चायुक्त आणि कोलकाता येथील उप उच्चायुक्तांना ताबडतोब सतर्क करण्यात आले होते. हसीना यांना अनार यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबाचे सांत्वन केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh mp anwarul azim anar murder case rac