भारतात स्थायिक झालेल्या अँग्लो इंडियन समाजातील अनेक व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध बालसाहित्यिक रस्किन बॉण्ड. त्यांनी आतापर्यंत अनेक अजरामर साहित्यकृती लिहून ठेवल्या आहेत. रविवारी (१९ मे) त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांनी पीटीआयला एक खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की देशात अनेक ठिकाणी त्यांना परदेशी लोकांसारखीच वागणूक मिळते. बॉण्ड म्हणाले, “मी जरी लोकांना सांगितलं की, मी भारतीय आहे, तरीदेखील लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. यावेळी बॉण्ड यांनी ओडिशामधील सूर्य मंदिरात घडलेला एक प्रसंग सांगितला.”

रस्किन बॉण्ड म्हणाले, “कोणार्कच्या सूर्य मंदिरात (ओडिशा) प्रवेश करण्यासाठी परदेशी लोकांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. मी कोणार्कला गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडूनही अतिरिक्त शुल्क मागितलं. मी त्यांना म्हटलं की मी परदेशी नाही, मी भारतीय आहे. परंतु, त्यांना ते खरं वाटलं नसावं. शेवटी आमच्यातील वाद टाळण्यासाठी मी ते अतिरिक्त शुल्क दिलं. त्यावेळी रांगेत माझ्या मागे एक सरदारजी (शीख व्यक्ती) होते, त्यांच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट (इंग्लंडचे नागरिक) होता. त्यावेळी सूर्य मंदिराच्या व्यवस्थापकांनी त्या सरदारजींकडून अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांना आत जाऊ दिलं. कारण ते परदेशी दिसत नव्हते. मी परदेशी दिसत असल्यामुळे माझ्याकडून अधिकचे पैसे घेतले.”

बॉण्ड म्हणाले, “मला लेखक नव्हे तर अभिनेता व्हायचं होतं. मात्र मी अभिनेता होऊ शकलो नाही. मला टॅप डान्सर होण्याचीदेखील इच्छा होती. परंतु, मी त्यासाठीची शरीरयष्टी घडवू शकलो नाही. त्यानंतर मला जाणवलं की मी लिहू शकतो. मी एक पुस्तकी किडा होतो. मला वाचायला आवडायचंच, त्यामुळे मी लिहायला सुरुवात केली. मला वाटतं मी खूप चांगला निर्णय घेतला. जगात पुस्तकांपेक्षा चांगलं काहीच नाही. थोडं का होईना, आपण लिहायला हवं.”

कोण आहेत रस्किन बॉण्ड?

१९३४ साली हिमाचल प्रदेशमधील कसौली येथे जन्मलेले रस्किन उत्तराखंडच्या मसुरीजवळच्या खेड्यात स्थायिक झाले आहेत. ऑब्रे अलेक्झांडर बॉण्ड या ब्रिटिश नागरिकांचे हे पुत्र. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील विभक्त झाल्यावर रस्किन यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केला. रस्किन यांना बालवयातच वाचनाचा छंद लागला. वडिलांनी त्यांना रोज दैनंदिनी लिहायची सवय लावली. वडिलांचाही अकाली मृत्यू झाल्यामुळे रस्किन त्यांच्या आईकडे गेले. मात्र आईने त्यांना अनेक वर्षे वसतिगृहात ठेवलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी आईने त्यांना लंडनच्या एका कॉलेजात पाठवलं. तिथे लहान-मोठय़ा नोकऱ्या करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पण सतत मसुरी, तिथला निसर्ग, तिथले दिवस यांच्या आठवणीने बैचेन होणाऱ्या रस्किन यांनी स्वत:ला लिखाणात मग्न राहायची सवय लावली. या अवस्थेत त्याने ‘द रूम ऑन द रूफ’ हे पुस्तक लिहिलं. साध्या, सरळ भाषाशैलीने साहित्यिक वर्तुळात आणि समीक्षकात त्यांचं मोठे कौतुक होऊन प्रतिष्ठेचा ‘जॉन लेव्हलीन पुरस्कार’ मिळवून दिला.

हे ही वाचा >> Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

अवघ्या १७ व्या वर्षी राष्ट्रकुल साहित्यिकांसाठी असणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवल्यामुळे रस्किन बॉण्ड यांचे भवितव्य लंडनला राहून उजळणार यात शंका नव्हती. परंतु, या प्रसिद्धीहून रस्किन यांना आपल्या बालपणीच्या, हिमालयाच्या निसर्गरम्य सान्निध्यात काढलेल्या दिवसांची ओढ अधिक होती. पुरस्काराची मोठी थोरली रक्कम हाती पडताच त्या पैशांनी त्यांनी बोटीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते डेहराडूनजवल राहिले. तिथेच त्यांचं लेखन बहरलं.