एप्रिल महिन्यात झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३९ दिवसांनंतर आरोपीला अटक केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपीला अटक केल्यानंतर त्याने सांगितलेलं हत्येचं कारण हादरवून टाकणारं आहे. उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

देवीलाल आणि सीता या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. विवाहबाह्य संबंधातूनच ही हत्या झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे देवीलालच्या पत्नीनेच या हत्येसाठी मदत केली आहे. सीतादेखील विवाहित होती. तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. परंतु, तिचा नवरा तिच्याबरोबर राहत नसल्याने तिची मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर गेली आणि मुलगा सीताबरोबर राहिला. परंतु, देवीलालने गेल्यावर्षी या मुलाची डोकं फोडून हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती असतानाही सीताने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. तर, देवीलाल यालाही तीन मुले आहेत.

हेही वाचा >> अखेर प्रज्वल रेवण्णा समोर आला! सेक्स स्कँडल प्रकरणी Video जारी करून म्हणाला, “या सगळ्याला पूर्णविराम…”

अशी केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीलाल आणि सीता यांच्या विवाहबाह्य संबंधाविषयी देवीलालच्या पत्नीला कळलं. त्यामुळे या दोघा पती-पत्नीने मिळून सीताची हत्या करण्याचे ठरवले. देवीलालने सीताला एका नातेवाईकाच्या घरी घेऊन जायचे असल्याचे सांगितले. बाईकवर काही वेळ प्रवास केल्यानंतर देवीलाल आणि सीता रस्त्याच्या कडेला असलेल्या दारूच्या दुकानात थांबले. दोघांनी तिथे एकत्र मद्यपान केले. त्यानंतर देवीलाल परमार याने तिला एका जंगलात नेले आणि विश्रांतीच्या बहाण्याने झोपण्याचे नाटक केले. सीतानेही विश्रांती घेण्याचे ठरवले. यावेळी देवीलालने सीतावर चाकूने हल्ला करून तिची गळा चिरून तिची हत्या केली. सीताच्या हातावर देवीलालच्या नावाचा टॅटू देखील होता. पकडले जाऊ नये म्हणून त्याने सीताच्या हातावरील कातडेसुद्धा ओढून काढले.

जंगलात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना काहीही सापडलं नाही. परंतु, एका हवालदाराला देवीलालबद्दल त्याच्या एका सूत्राकडून माहिती मिळाली. पोलिसांनी देवीलालला चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.