अमरावती लोकसभा मतदारसंघात येत्या २६ एप्रिल रोजी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यामुळे आज (दि. २४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षांनी अमरावतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सर्व उमेदवार जोर लावून प्रचार करत आहेत. अमरावतीत भाजपा उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली. परंतु, बच्चू कडू यांनी आरक्षित केलेल्या मैदानावर ही सदर सभा होत असल्यामुळे मंगळवारपासून (२३ एप्रिल) अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बच्चू कडू यांनी मंगळवारी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केलं. तसेच आज शाहांच्या सभेवेळी एक लाख लोकांचा मोर्चा घेऊन या मैदानावर धडकणार असल्याची घोषणा केली. मात्र पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर दोन्ही सभा वेगवेगळ्या मैदानांवर पार पडल्या.

बच्चू कडू सभेला उपस्थित असलेल्या जनतेला, अमरावतीमधील मुस्लीम समुदायाला, स्थानिक लहान-मोठ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्ही त्या राणाला का घाबरता? त्यांच्यासाठी मी एकटा पुरेसा आहे. मुळात आमची लढाई राणाविरोधात नाही. राणा तर कोपऱ्यातलं एक लहानसं पिल्लू आहे. कुठेतरी कोपऱ्यात बसलेलं… आम्ही चालतो तेव्हा हा महाराष्ट्र हलतो. एवढंच काय तर आम्ही या सरकारमध्ये मंत्रिपद देखील घेतलं नाही. उलट आम्ही नव मंत्रालय निर्माण केलं. त्या राणाला सांगा तू तर नदीतून लोटाभर पाणी आणणारा आहेस. आम्ही तर स्वतः नवी नदी निर्माण केली आहे. विनाकारण उठला सुटला बच्चू कडूचं नाव घेत फिरतोस. तुला बच्चू कडूशिवाय कोणी दिसत नाही का? जास्त बोललास तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील… वांदे होतील तुझे… इतकं कुणाचं नाव घेणं बरोबर नाही. त्या संसाळ्यातल्या शेतकऱ्यांनी दोघांना (राणा दाम्पत्य) पाय लावून पळायला लावलं. त्या शेतकऱ्यांनी हनुमान मंदिरातून हाकललं.

माझं कार्यकर्त्यांना सांगणं आहे की, आता शेवटचे दोन दिवस आपण सजग राहिलं पाहिजे. क्यों की ये कत्तल की रात हैं (रात्र वैऱ्याची आहे). सगळा खेळ पालटणारी रात्र आहे. आता अफवा पसरतील, पैसे वाटणार असल्याची चर्चा होईल, पैसे वाटतीलही, पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.

हे ही वाचा >> “काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी”, वारसा करावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

बच्चू कडू म्हणाले की, रवी राणा यांनी सभेचं मैदान बदललं असलं तरी निवडणुकीचं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. मैदान कोणतंही असलं तरी रवी राणा यांना हरवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही परवानगी घेऊन आरक्षित केलेलं मैदान हिसकावून घेतल्यानंतर आम्ही आक्रमक व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. आक्रमक झाल्यानंतर आमच्या हातून काहीतरी चूक व्हावी, म्हणजे मला आणि उमेदवार दिनेश बुब यांना तुरुंगात टाकणं सोपं होईल, अशी त्यांची योजना होती. पण ही योजना तुमच्या (मतदारांच्या) आणि आमच्या समजंसपणामुळे फोल ठरली.