अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी नवनीत राणांचा उल्लेख नाची, बबली आणि डान्सर असा केला होता. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला नवनीत राणांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी असं वक्तव्य माझ्याबाबत करण्यापूर्वी स्वतःच्या आईकडे आणि जिला सासरी पाठवलं त्या मुलीकडे बघायला हवं होतं. अमरावतीतल्या एका सभेत नवनीत राणांनी संजय राऊतांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

” कोण संजय राऊत? महिला जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. यांच्यासारख्या लोकांनी सीतेलाही तिचे भोग भोगायला लावले. मी अमरावतीची सून आहे. तरीही माझा अपमान केला. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीची लग्नानंतर सासरी पाठवणी केली तिचा विचार करायला हवा होता. ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला त्या आईचा विचार करायला हवा होता. माझ्यावर टीका करण्याआधी स्वतःच्या पत्नीकडे एकदा बघायचं होतं. एखादी महिला सार्वजनिक क्षेत्रात काम करते म्हणजे तिचा स्वाभिमान विकत नाही. नवनीत राणासह अमरावतीतल्या प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जोडला गेला आहे. संजय राऊत यांनी माझाच नाही प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे.”

हे पण वाचा- मतदारसंघाचा आढावा : अमरावती; जनतेच्या न्यायालयातील लढाई नवनीत राणांसाठी अग्निदिव्य ठरणार

रवी राणा म्हणाले तुझ्यासारखे ५६ आले तरी गाडून टाकू

नवनीत राणांचे पती रवी राणा यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा म्हणाले, “संजय राऊत अमरावतीला येऊन गेला अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर टीका केली. अतिशय खालच्या पातळीवर टीका केलेला संजय राऊत आता जनाब संजय राऊत झाला आहे. जनाब संजय राऊत, सून ले मेरी बात तू अमरावतीला येऊन तू नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेव ही अमरावती आहे. या अमरावतीत तुझ्यासारखे ५६ गाडण्याची ताकद आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली.तुमच्या वयाची मुलगी आहे नवनीत राणा आहे. १४ दिवस जेलमध्ये ठेवून देखील पोट भरले नाही वर परत तुम्ही अमरावतीला येऊन गाडण्याची भाषा बोलता. हिंदू शेरनी म्हणून आता नवनीत राणा पुढे आल्या आहेत. असं रवी राणा म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले होते?

” ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची…डान्सर.. बबली.. तुम्हाला खुणावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका अप्सरेने विश्वामित्रांनाही फसवले होते” हे विसरु नका. असं संजय राऊत म्हणाले होते.