२२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले नाना पटोले?

“नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये भाषण केलं. ते म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर ते मी आणलेल्या योजना काढून घेतील. राम मंदिरही त्यात आलं असं ते म्हणाले. गहू आणि तांदूळ देतात ती योजनाही आमचीच आहे. आम्ही काही त्या योजना बंद करणार नाही. तसंच गरीबांना आम्ही प्लॅस्टिकचे तांदूळ देणार नाही. योग्य प्रमाणात अन्न, धान्य आणि साखर देणार. ” असा टोला नाना पटोलेंनी लगावला आणि राम मंदिराबाबत भाष्य केलं.

हे पण वाचा- राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर काय होणार? बांधकाम पूर्ण होण्याबाबत अध्यक्षांनी दिली माहिती

राम मंदिराचं शुद्धीकरण करणार

“आम्ही सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार आहोत. कारण आमच्या सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांनी या विधीला विरोध केला होता. त्यामुळे चार शंकराचार्यांना आम्ही बोलवू आणि राम मंदिराचं शुद्धीकरण करुन घेऊ. तसंच त्या मंदिरात आम्ही राम दरबार स्थापन करु कारण आत्ता त्या मंदिरात राम दरबार नाही. मूळ जी मूर्ती बाजूला सारण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार मंदिरात सजवू. तसंच शंकराचार्यांच्या हस्ते आम्ही मंदिराचं शुद्धीकरण करु, कारण त्यांचंच हे म्हणणं आहे की जो विधी झाला तो धर्माला धरुन झाला नाही. आम्ही सुधारणा करु. धर्माच्या आधारावर सुधारणा करु, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी केलं ते अधर्माच्या आधारावर सगळं केलं असाही टोला नाना पटोलेंनी लगावला.

शरद पवारांच्या विलीनकरणाच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले नाना ?

“राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी मला सांगितलं की देशभरात भाजपाच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा परिणाम जाणवतो आहे. त्यामुळे काँग्रेस हाच पर्याय आहे असं प्रादेशिक पक्षांना वाटतं आहे. याच आधारावर शरद पवारांनी विलीनीकरणाचं वक्तव्य केलं असेल.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

आता नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याच्या कारणावरुन मंदिराची प्राणप्रतिष्ठा पुढे ढकलावी असं आवाहन केलं होतं. मात्र २२ जानेवारीलाच हा सोहळा पार पडला. आता नाना पटोलेंनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nana patole imp statement about ram temple what did he say scj
Show comments