देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार ४०० पार’ चा नारा दिला आहे. १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्यांनी दिल्लीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन “अब की बार ४०० पार” चा नारा दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपाने हा नारा देणं सोडून दिलं आहे. तर, इंडिया आघाडीने अनेक मतदारसंघांमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान, तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्यासाठी मोदी आणि भाजपाने नेमकी कोणती रणनिती आखली आहे. भाजपा या निवडणुकीत कशी कामगिरी करेल? याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे.

हे ही वाचा >> “मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत

गिरिश कुबेर म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांना उत्तरं देण्याची वेळ आली आहे. माढा, माळशिरस, सोलापूर या भागात नरेंद्र मोदींना २४ तासांच्या आत दुसरी सभा घ्यावी लागली आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. तसेच नरेंद्र मोदी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या एक वर्ष आधीपासूनच दर महिन्याला किमान एकदा तरी महाराष्ट्राला भेट दिली आहे. मोदींचा जर महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांवर विश्वास असता तर त्यांनी महाराष्ट्राला इतक्या भेटी दिल्या असत्या का? असा प्रश्न पडतो. तसेच या निवडणुकीच्या पाच टप्प्यांमध्ये प्रचार करत असताना नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी नवनवे मुद्दे काढून भाषणं करावी लागली आहेत. यासह मोदींनी या निवडणुकीत आधीच्या दोन निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी रणनिती आखलेली दिसत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी १७ ते १८ वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे.