Copernicus Emergency Management Service रविवारी इराणचे राष्ट्राअध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. मात्र, ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, त्या ठिकाणच्या हवामानामुळे हेलिकॉप्टरचा शोध घेणे अवघड होते. जोवर हेलिकॉप्टरचा शोध लागत नाही, तोवर तेथे मदत पोहोचवणेही कठीण बाब होती. त्यामुळे इराणने लगेचच युरोपियन युनियनची मदत मागितली. इराणने मदतीची विनंती केल्यानंतर युरोपियन युनियनने आपली जलद उपग्रह मॅपिंग सेवा सक्रिय केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोपियन कमिशनर फॉर क्रायसिस मॅनेजमेंट जेनेझ लेनार्सिक यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत म्हटले, “इराणच्या विनंतीनंतर इराणचे अध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री यांना घेऊन गेलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर आम्ही युरोपियन युनियनची ‘कोपर्निकस ईएमएस’ जलद प्रतिसाद मॅपिंग सेवा सक्रिय करीत आहोत.”

हेही वाचा : दूषित रक्तामुळे हजारो लोकांना एचआयव्ही; ब्रिटनमधला आरोग्य घोटाळा उघड

हिमवादळासारख्या परिस्थितीत रात्रभर शोध घेतल्यानंतर सोमवारी (२० मे) अखेर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. जलद मॅपिंग सेवा ही ‘इमर्जन्सी मॅपिंग सर्व्हिस (ईएमएस)’च्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे; जी युरोपियन युनियनच्या कोपर्निकस प्रोग्राम अंतर्गत येते. कोपर्निकस ईएमएस म्हणजे काय आणि त्याची जलद मॅपिंग सेवा कशी कार्य करते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

युरोप युनियनचा कोपर्निकस प्रोग्राम

कोपर्निकस प्रोग्राम हा युरोपियन युनियनच्या अंतराळ कार्यक्रमाचा भाग आहे. सेंटिनेल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपग्रहांच्या संचामधून माहिती संकलित करून, पृथ्वी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे निरीक्षण करणे हे या प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी उपग्रहांच्या संचामधून मिळणार्‍या डेटावर प्रक्रिया केली जाऊन, त्याचे विश्लेषण केले जाते. याचा वापर अनेक क्षेत्रांमधील विस्तृत प्रयोगांसाठी केला जाऊ शकतो. युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए)च्या वेबसाइटनुसार यामध्ये जमीन व्यवस्थापन, सागरी वातावरण, हवेतील वातावरण, आपत्कालीन स्थिती, हवामान बदल या बाबींचा समावेश आहे. वेबसाइटमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, वापरकर्त्यांना संपूर्ण माहिती विनामूल्य मिळते.

१९९८ मध्ये लाँच झालेल्या कोपर्निकस प्रोग्रामला पूर्वी ग्लोबल मॉनिटरिंग फॉर एन्व्हायर्न्मेंटल सिक्युरिटी (जीएनईएस) म्हटले जायचे. सध्या हा प्रोग्राम युरोपियन स्पेस एजन्सी आणि युरोपियन एनव्हायर्न्मेंट एजन्सी (ईईए)च्या समर्थनासह युरोपियन कमिशन (ईसी)द्वारे लागू केला जातो.

कोपर्निकस ईएमएस म्हणजे नक्की काय?

कोपर्निकस ईएमएस (Copernicus EMS) २०१२ पासून कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती आणि मानवतावादी संकटे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी उपग्रह रिमोट सेन्सिंग आणि इन सिटू डेटा स्रोतांमधून मिळविलेली भौगोलिक व स्थानिक माहिती हा कोपर्निकस ईएमएस प्रोग्राम प्रदान करतो.

त्यात मॅपिंग आणि दुर्घटनांचा प्रारंभिक सावधानतेचा इशारा अशा दोन घटकांचा समावेश आहे. मॅपिंग हा घटक उपग्रह प्रतिमांवर आधारित नकाशे आणि विश्लेषण करण्याची कामगिरी बजावतो. तसेच दुर्घटनांचा प्रारंभिक सावधानतेचा इशारा घटकाद्वारे पूर, दुष्काळ व जंगलातील आग यांबद्दल प्रारंभिक स्वरूपात सावध करणारे इशारे मिळतात. त्यासह जंगलातील आगीच्या दुष्परिणामांची वास्तविक वेळ कळण्यास मदत होते.

मॅपिंग घटकामध्ये दोन मॉड्युल्स आहेत. एक म्हणजे जलद मॅपिंग (रॅपिड मॅपिंग) आणि दुसरे म्हणजे धोका आणि पूर्ववत स्थितीबाबतचे मॅपिंग (रिस्क आणि रिकव्हरिंग मॅपिंग). जलद मॅपिंग मॉड्युल रईसी यांचे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर शोधण्यासाठी सक्रिय करण्यात आले होते. धोका आणि पूर्ववत स्थितीबाबतचे मॅपिंग आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. हे मॉड्युल तत्काळ माहिती प्रदान करू शकत नाही. या मॉड्युलद्वारे आठवडाभरात किंवा महिनाभरात आवश्यक ती माहिती दिली जाते. या महितीचा वापर सतर्कता आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी केला जातो.

हेही वाचा : राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात?

जलद मॅपिंग कसे कार्य करते?

जलद मॅपिंग मॉड्युलद्वारे उपग्रह प्रतिमा भूस्थानिक डेटा आणि आवश्यक असण्यास सोशल माध्यमांच्या आधारावर नकाशा प्रदान करतो; ज्यावर प्रक्रिया केली जाते आणि विश्लेषण तयार केले जाते. नकाशे द्रुतगतीने प्रदान करण्यासाठी ही सेवा आवश्यकतेनुसार उपग्रह प्रतिमा, भूस्थानिक डेटा आणि सोशल मीडिया प्राप्त करते, प्रक्रिया करते व विश्लेषण करते. कोपर्निकस वेबसाइटनुसार जलद मॅपिंग सेवा चार भिन्न प्रॉडक्ट्स पुरवू शकते. त्यातून वापरकर्त्यांना काय हवे आहे, ते वापरकर्ते निवडू शकतात.

-रेफरन्स प्रॉडक्ट्स : आपत्कालीन परिस्थिती उदभवण्यापूर्वीची माहिती प्रदान करते.

-फर्स्ट एस्टिमेट प्रॉडक्ट्स : एखादी आपत्ती घडल्यानंतर सर्वाधिक प्रभावित झालेल्या ठिकाणांचे मूल्यांकन प्रदान केले जाते.

-डेलिनिएशन प्रॉडक्ट : आपत्ती घडल्यानंतरच्या परिस्थितीवर होणारा परिणाम, त्याची व्याप्ती आणि अद्ययावत माहिती पुरवते.

-ग्रेडिंग प्रॉडक्ट : नुकसानीचे मूल्यांकन, स्थानिक वितरण आणि आपत्ती आल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती प्रदान करते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copernicus emergency management sevice raisi helicopter rac