रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता गरुडांच्या प्रजातीवर होत असल्याचे एका नवीन अभ्यासातून उघड झाले आहे. युद्धामुळे धोक्यात आलेल्या पक्ष्यांनी त्यांचे उड्डाणाचे मार्ग बदलले आहेत, असंही करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांमध्ये दिसून आले. “पक्षी उड्डाण करत असताना त्यांना पाणी सापडले नाही तर ते अतिरिक्त सात किंवा आठ मैलांचं उड्डाण करतात,” असंही ईस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या अभ्यासाचे सह-लेखक चार्ली रसेल यांनी द गार्डियनला सांगितले. खरं तर हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया (UEA), ब्रिटिश ट्रस्ट फॉर ऑर्निथॉलॉजी (BTO) आणि एस्टोनियन युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

विशेष म्हणजे या सगळ्यांचा आधीपासूनच गरुडांवर अभ्यास सुरू होता. परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरने गरुडांच्या प्रजातीला लुप्त होणारी प्रजाती म्हणून घोषित केले आहे,” असेही रसेल या पीएचडीच्या विद्यार्थ्याने Wildlife.org ला सांगितले. “या पक्ष्यांनी युद्धाच्या संघर्ष क्षेत्रातून स्थलांतर करणे आम्हाला अपेक्षित नव्हते. तो एक अनपेक्षित प्रवास होता,” असंही रसेल यांनी अधोरेखित केले.

द गार्डियननुसार, टीमने मार्च आणि एप्रिल २०२२ मध्ये दक्षिण बेलारूसमध्ये १९ ग्रेटर स्पॉटेड ईगल्सच्या स्थलांतरित पद्धतींचा मागोवा घेतला आणि २०१८ ते २०२१ या कालावधीत २० पक्ष्यांच्या ६५ स्थलांतरांशी तुलना केली. मादी गरुड ग्रीसमधून प्रवास करतात, तर नर गरुड पूर्व आफ्रिकेतून स्थलांतर करतात. पक्षी सरासरी ८५ अतिरिक्त किलोमीटर प्रवास करतात. एका गरुडाने अतिरिक्त २५० किलोमीटरचा प्रवास केला. गरुडांनाही प्रवास करण्यासाठी सरासरी ५५ तास जास्त लागले. नर गरुड मार्च आणि एप्रिल २०२२ मध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत हळूहळू उडत असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचाः रईसी यांना शोधण्यासाठी वापरण्यात आलेली कोपर्निकस आपत्कालीन व्यवस्थापन सेवा काय आहे?

डेली मेलनुसार, मादी गरुडांना प्रवास करण्यासाठी १९३ तासांच्या तुलनेत २४६ तास लागले, तर नर गरुडांना १२५ तासांच्या तुलनेत प्रवास पूर्ण करण्यासाठी १८१ तास लागले. युक्रेनमध्ये युद्धापूर्वी ९० टक्के गरुड थांबले असले तरी युद्धाच्या उद्रेकानंतर फक्त ३२ टक्के गरुड राहिले आहेत. युद्धानंतर १९ पैकी फक्त सहा गरुड युक्रेनमध्ये थांबले होते, ज्यांची आधी संख्या २० पैकी १८ होती.

“पोलेशिया-बेलारूस अन् युक्रेनच्या सीमेवर पसरलेला एक मोठा प्रदेश युरोपमधील मोठ्या स्पॉटेड गरुडांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे, येथे १५० जोड्यांचे प्रजनन होते,” असेही रसेल यांनी न्यूजवीकला सांगितले. “या लोकसंख्येतील बहुतेक पक्षी संघर्षामुळे प्रभावित झालेल्या भागात स्थलांतरित झाले असतील,” असेही त्यांनी पुढे सांगितले. “या लोकसंख्येवर होणारे कोणतेही परिणाम, कोणत्याही प्रौढ मृत्यू किंवा कमी प्रजनन यशासह आधीच संघर्ष करत असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.” संशोधकांनी सांगितले की, ज्या भागात लष्करी हालचाली जास्त होत्या त्या भागात गरुडांनी त्यांच्या सामान्य मार्गापासून सर्वात मोठे विचलन केले. जीपीएस ट्रॅकर बसवलेल्या गरुडांना तोफखाना, जेट्स, रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रे तसेच सैनिक आणि नागरिकांचा सामना करावा लागला. खरं तर युद्धाचा वन्य प्राण्यांवर नकारात्मक परिणाम होतो.

द गार्डियनशी बोलताना रसेल म्हणाले की, पक्ष्यांनी सहजतेने निर्णय घेतले आहेत. पक्षी त्यांच्या स्थलांतराच्या वेळी कोठे उडायचे किंवा नाही हे शोधण्यासाठी दररोज सकाळी बातम्या पाहत नाहीत.” “सध्या आपण गरुडांच्या लोकसंख्येवरील ताण समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून संघर्षानंतरच्या परिस्थिती बदलल्यावर आपण केवळ मोठ्या स्पॉटेड गरुडांची लोकसंख्या पुन्हा वाढवू शकतो,” असेही त्यांनी सांगितले. लॉफबरो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जोश मिलबर्न म्हणाले, “क्वचित प्रसंगी वन्य प्राण्यांना मानवी संघर्षाचा फायदा होऊ शकतो. युद्धाचा संरक्षणाच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने वन्य प्राण्यांवर प्रचंड नकारात्मक प्रभाव पडतो.

“ग्रेटर स्पॉटेड ईगल्स सारखे स्थलांतरित पक्षी जगभर झपाट्याने कमी होत आहेत आणि या लुप्त होणाऱ्या प्रजातींवरील आमचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि कमी करणे अत्यावश्यक आहे. लष्करी प्रशिक्षण झोनमध्ये राहणाऱ्या पक्ष्यांसाठी तत्सम प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत, परंतु स्थलांतरित प्रजातींवर परिणाम दर्शविणारे हे नवीन निष्कर्ष म्हणजे पक्ष्यांवर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत, असेही रसेल यांनी सांगितले. रसेल यांनी न्यूजवीकला सांगितले की, संघर्षाचा प्रजातींच्या दीर्घकालीन स्थलांतरण पद्धतींवर परिणाम होऊ शकतो, यावर आमचा विश्वास नाही. आमचे परिणाम बहुधा तात्कालिक किंवा तुरळक घटनांना तोंड देण्याच्या आसपास असतात, ज्यामुळे गरुड घटना टाळण्यासाठी आणखी उड्डाण करून प्रतिसाद देतात आणि कमी ठिकाणी थांबतात. एकत्रितपणे याचा परिणाम प्रजनन कालावधीमध्ये होऊ शकते. प्रजननाला उशीर झाल्यामुळे त्यांची उत्पत्तीही कमी होते.