ऑस्करसाठी नामांकन मिळालेले माहितीपट निर्माते मॉर्गन स्परलॉक यांचे कर्करोगाने वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेच्या खाद्य उद्योगाची तपासणी आणि फास्ट फूडच्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी महिनाभर चालणारा महितीपट तयार केला होता, ज्यात त्यांनी स्वतः ३० दिवस मॅकडोनाल्डमध्ये मिळणारे फास्ट फूड खाल्ले. या माहितीपटानंतर मॅकडोनाल्डला मोठा फटका बसला होता, तर स्परलॉक यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.

मॉर्गन स्परलॉक कोण होते?

मॉर्गन व्हॅलेंटाईन स्परलॉक हे एक अमेरिकन माहितीपट निर्माते, नाटककार, पटकथा लेखक होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २३ चित्रपट दिग्दर्शित केले आणि जवळपास ७० चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म वेस्ट व्हर्जिनिया येथील बेकलेमध्ये झाला. स्परलॉकची आई एक इंग्रजी शिक्षिका होती. १९९३ मध्ये स्परलॉकने न्यूयॉर्क विद्यापीठातून चित्रपटात बीएफए पदवी प्राप्त केली. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

मॉर्गन व्हॅलेंटाईन स्परलॉक हे एक अमेरिकन माहितीपट निर्माते, नाटककार, पटकथा लेखक होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Watermelon at Cannes: हमास-इस्रायल युद्धादरम्यान कलिंगड कसे ठरले पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक?

‘सुपर साइज मी’ महितीपट

स्परलॉकचा डॉक्युड्रामा ‘सुपर साइज मी’ ७ मे, २००४ रोजी अमेरिकेमध्ये प्रदर्शित झाला. एका कार्यक्रमासाठी त्यांच्या पालकांच्या घरी असताना त्यांना या माहितीपटाची कल्पना आली. मॅकडोनाल्ड्सविरुद्ध दोषारोप करणाऱ्या दोन किशोरवयीन मुलींनी आपल्या लठ्ठपणासाठी केलेल्या खटल्याबद्दलच्या एका बातमीने ते प्रेरित झाले. त्यांच्या माहितीपटाची निर्मिती ६५ हजार डॉलरमध्ये झाली आणि त्यांनी २२ दशलक्ष डॉलरची कमाई केली. त्यांनी या माहितीपटासाठी ३० दिवस केवळ मॅकडोनाल्डमध्ये मिळणारेच खाद्यपदार्थ खाल्ले.

परिणामी, स्परलॉकच्या आहारात यू. एस. डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA)ने शिफारस केलेल्या कॅलरीजपेक्षा दुप्पट कॅलरीज आढळून आल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी सरासरी अमेरिकेचे लोक जसे जीवन जगतात, त्या प्रयत्नातन आपल्या दिनचर्येतून व्यायामही कमी केला. ते साधारणपणे दिवसाला सुमारे तीन मैल (४.८ किमी) चालायचे, मात्र नंतर ते केवळ १.५ मैल (२.४ किमी) चालू लागले. संपूर्ण प्रयोगादरम्यान स्परलॉक यांचे वजन ११ किलो वाढले, त्यांचे यकृत बिघडले आणि त्यांना नैराश्य आले. त्यांच्या डॉक्टरांनी या उच्च-कॅलरी आहाराच्या परिणामांची तुलना तीव्र मद्यपानाशी केली.

स्परलॉक यांनी या माहितीपटासाठी ३० दिवस केवळ मॅकडोनाल्डमध्ये मिळणारेच खाद्यपदार्थ खाल्ले. (छायाचित्र-रॉयटर्स)

परंतु, केवळ मॅकडोनाल्ड्समधील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे त्यांचे यकृत बिघडल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. प्रयोग पूर्ण झाल्यानंतर त्यांचे सामान्य वजन ८४ किलो परत यायला चौदा महिने लागले. त्यांच्या प्रॉडक्शनला सर्वोत्कृष्ट माहितीपट अकादमी पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आणि स्परलॉकने सर्वोत्कृष्ट माहितीपट पटकथेसाठी पहिला ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ पुरस्कार जिंकला. २००५ मध्ये, त्यांनी ‘सुपर साइज मी’ या माहितीपटावरून ‘डोन्ट ईट धिस बुक : फास्ट फूड अँड द सुपरसाइजिंग ऑफ अमेरिका’ या नावाने एक पाठपुरावा पुस्तक लिहिले. ६५ हजार डॉलरमध्ये तयार झालेल्या या माहितीपटाने २२ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्तची कमाई केली.

‘सुपर साइज मी २’ माहितीपट प्रदर्शित

२०१७ मध्ये स्परलॉक यांचा ‘सुपर साइज मी २ : होली चिकन’ हा माहितीपट प्रदर्शित झाला. हा संपूर्ण माहितीपट अमेरिकेत दरवर्षी नऊ अब्ज प्राण्यांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांवर, कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणार्‍या शेतकऱ्यांच्या आर्थिक संघर्षांवर आणि फास्ट-फूड चेनच्या भ्रामक आरोग्य दाव्यांवर आधारित होता. त्यांच्या गोंझो-शैलीतील चित्रपटनिर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्परलॉकने माहितीपटात विलक्षण ग्राफिक्स आणि विनोदी बाबींचा समावेश केला.

२०१७ मध्ये स्परलॉक यांचा ‘सुपर साइज मी २ : होली चिकन’ हा माहितीपट प्रदर्शित झाला. (छायाचित्र-रॉयटर्स)

फास्ट-फूड उद्योगांच्या कार्यपद्धतीत माहितीपटांमुळे बदल झाला का?

फास्ट-फूड आणि चिकन इंडस्ट्रीजवरील माहितीपटानंतर रेस्टॉरंट्समध्ये ताजे अन्न मिळू लागले, कामाची पद्धत बदलली आणि शेतातून थेट रेस्टॉरंट्समध्ये खाद्य पदार्थात वापरल्या जाणार्‍या वस्तू येऊ लागल्या. या माहितीपटामुळे फास्ट-फूड चेनला त्यांच्या मेनूमध्ये आरोग्यदायी वस्तू समाविष्ट करण्यास भाग पाडले आणि याचा परिणाम ग्राहकांवरही झाला. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या ऑनलाइन डेटाबेसनुसार, २००४ मध्ये ‘सुपर साइज मी’ प्रीमियर झाल्यानंतर नोंदवले गेले की, मॅकडोनाल्डच्या नफ्यात लक्षणीय घट झाली आणि मार्सच्या ‘किंग-साईज’ चॉकलेट बारसारखी उत्पादने टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली.

यूकेमध्ये, २००४ मध्ये मॅकडोनाल्डच्या प्रीटॅक्स नफ्यात तीन-चतुर्थांश घट झाली. चित्रपटाच्या रिलीजनंतर, मार्सने त्यांचा किंग-साइज चॉकलेट बार काढून टाकला आणि जवळजवळ सर्व फास्ट-फूड कंपनींनी विवाद आणि संभाव्य कायदेशीर बाबी टाळण्यासाठी त्यांचे ‘सुपर-साईज’ हे पर्याय बंद केले. त्यामुळे या सर्व कंपनींचा आणखी तोटा झाला.

#MeToo चळवळीमध्ये स्परलॉकने लैंगिक गैरवर्तनाचा स्वतःचा इतिहास उघड केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Prajwal Revanna Sex Scandal: अपहरण-लैंगिक छळ प्रकरणात एचडी रेवण्णा यांना जामीन कसा मिळाला?

स्परलॉकचे इतर माहितीपट आणि लैंगिक गैरवर्तनाचे आरोप

बॉय बँड वन डायरेक्शन, कॉमिक-कॉन एन्थुझियास्ट, लाईफ इन हेन्रिको काउंटी जेल, ए ग्लोबल सर्च ऑफ ओसामा बिन लादेन यांसारखे माहितीपटही त्यांनी तयार केले. ‘सुपर साइज मी २ : होली चिकन!’ माहितीपट २०१७ च्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार होते. परंतु, #MeToo चळवळीमध्ये स्परलॉकने लैंगिक गैरवर्तनाचा स्वतःचा इतिहास उघड केला. कॉलेजमध्ये त्यांनी बलात्कार आणि महिला सहाय्यकासोबत लैंगिक छळ केल्याचीही कबुली दिली, ज्यानंतर त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यांनी ‘एपी’ला सांगितले, “मला, मी केलेल्या गोष्टींची जाणीव झाली. मी सत्य सांगितले आणि माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. आपण चुकीचे होतो, हे मान्य करण्यास सक्षम असले पाहिजे.”