आर्थिक संकटात सापडलेल्या बायजू या एडटेक कंपनीच्या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाहीत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नाही. बायजूने अनेक ठिकाणची आपली कार्यालये बंद केली आहेत. आता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे. बायजूने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली असून, यंदा १०० ते ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी चालवली आहे. अडचणीत आलेली बायजू कंपनी कर्मचाऱ्यांना फोनवरून नोकरी गेल्याचे सांगत आहे.

फोनवरून कर्मचाऱ्यांना कमी केल्याचे सांगितलं जात आहे

कर्मचाऱ्यांना नोटीस पीरियडसुद्धा दिला जात नाही, त्यांना पीआयपी (परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन) वरही ठेवले जात नाही. थेट फोन करून त्यांना कार्यालयात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर बायजू कर्मचाऱ्यांना फोनवरून काढून टाकत आहे आणि त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (पीआयपी) वर न ठेवता थेट बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे, अशी माहिती मनी कंट्रोलने दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना नोटीस पीरियडसुद्धा दिला जात नाही. बायजू अनेक कर्मचाऱ्यांना इमेल पाठवत आहे, तर काहींना फोन करून नोकरीवरून काढून टाकल्याचं सांगत आहे. Think and Learn Pvt Ltd बरोबर तुमचा शेवटचा कामाचा दिवस ३१ मार्च २०२४ असेल, असंही इमेलमध्ये म्हटले जात आहे. तुमची अंतिम हिशेब प्रक्रिया कंपनीच्या धोरणानुसार केली जाणार असल्याचंही कर्मचाऱ्यांना सांगितलं जात आहे. नोकरी सोडण्याच्या औपचारिकतेबद्दल काही शंका असल्यास कृपया separations@byjus.com वर संपर्क साधा. नोकर कपातीचा सर्वाधिक फटका हा कंपनीच्या विक्री विभागाला बसणार आहे.

नोटीस पीरियड नाही, पगारही नाही

रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना एचआरमार्फत बोलावून कार्यालयात न येण्यास सांगितले जात आहे. त्यांना तात्काळ नोकरीवरून काढून टाकले जात आहे. कर्मचाऱ्यांना फोनवरून ते आता बायजूचा भाग नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना दुसरी नोकरी शोधण्याची संधीही मिळत नाही. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यास पुन्हा विलंब होणार असल्याची माहिती दिल्याच्या एका दिवसानंतर या नोकर कपातीची बातमी आली आहे. अडचणीत सापडलेली एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बायजूने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, पगार वितरणात पुन्हा विलंब होणार आहे. बायजूच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये या परिस्थितीसाठी अंतरिम आदेश जबाबदार असल्याचे सांगितले आहे. हा अंतरिम आदेश फेब्रुवारीच्या उत्तरार्धात काही भ्रष्ट विदेशी गुंतवणूकदारांनी बायजूच्या विरोधात प्राप्त केला होता. त्यामुळे राईट्स इश्यूच्या माध्यमातून उभारलेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ८ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार वाटप करण्याचे काम करत असल्याचे आश्वासनही बायजू यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास- बायजू

बायजूमधील काही दिशाभूल करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये अंतरिम आदेश मिळवला होता. चार विदेशी गुंतवणूकदारांच्या या बेजबाबदार कृतीमुळे आम्हाला निर्बंध उठेपर्यंत वेतन वितरण तात्पुरते गोठवावे लागत आहे,” असेही ईमेलमध्ये सांगितले आहे. भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसेच अनुकूल निकालाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. राइट्स इश्यूद्वारे उभारलेल्या निधीचा वापर करणे आणि सध्याची आर्थिक आव्हाने कमी करणे शक्य होणार आहे, असंही कंपनीने सांगितले आहे. आम्ही तुम्हाला आशावादी अन् खंबीर राहण्याचे आवाहन करतो. कंपनीने अलीकडेच आव्हानांवर मात केली आहे. आम्हाला विश्वास आहे की, शेवटचा अडथळाही आपण एकत्रित येऊन पार करू. आम्हाला न्याय मिळणार असून, आर्थिक अडचणी लवकरच दूर होतील. व्यवस्थापनाने या कठीण काळात कर्मचाऱ्यांचा संयम, समजूतदारपणा आणि सतत समर्पण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचाः अरविंद केजरीवाल करणार Work from Jail? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

१०००० लोकांना आधीच काढण्यात आले

बायजूची नोकर कपातीची ही काही पहिली वेळ नाही. संकट सुरू झाल्यापासून कंपनीने आतापर्यंत १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने देशभरातील कार्यालयेही बंद केली आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. आता हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यातील कर्मचाऱ्यांचे पगारही थांबवले होते. त्यांचा पगार नंतर आला असला तरी मार्चचा पगार पुन्हा लांबला आहे. गेल्या दोन वर्षात बायजूने जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तसेच व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भागीदार अन् गुंतवणूकदारांबरोबर कायदेशीर लढाईचाही कंपनीला सामना करावा लागत आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वी बायजू इंडियाने जवळपास १४ हजार जणांना रोजगार दिला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये व्यवसायाच्या पुनर्रचनेसाठी नोकरकपात करण्यात आली, अशी माहिती मनी कंट्रोलने दिली आहे. नवीन सीईओ अर्जुन मोहन यांनी कंपनीचा पदभार स्वीकारल्यानंतर खर्च कमी करण्याबरोबर रोख प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुनर्रचना जाहीर केली. जवळपास ४५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना होती. चांगल्या काळात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आता आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागत आहे, असंही बायजूच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. बायजूकडून अनेक खटले दाखल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळेच कर्मचारी आणि संस्थासुद्धा प्रचंड तणावातून जात असल्याचंही बायजूच्या एका प्रवक्त्याने मनी कंट्रोलला सांगितले.