वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव आहे. या गावातील प्रेरणा नावाच्या शाळेत पंतप्रधान मोदी यांचे प्राथमिक शिक्षण पार पडले. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या शाळेच्या विकासाची मोहीम हाती घेतली आहे. भारतातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना एका आठवड्यासाठी या शाळेत वेळ घालविण्याची संधी मिळणार असून या प्रकल्पाअंतर्गत ‘अतिविकसित जीवन कसे जगायचे’ या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प केंद्र व राज्य (गुजरात) सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. याच प्रसंगाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांच्या गावाचे असलेले एक आगळे वेगळे ऐतिहासिक महत्त्व समजून घेणे प्रासंगिक ठरावे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

शहराला स्वतःचा इतिहास असतो…

प्रत्येक जागेला, शहराला स्वतःचा इतिहास असतो, तसेच संस्कृतीही असते. अनेक जनसमूह त्या शहरात स्थायिक होतात. त्यांची संस्कृती त्याच भागात बहरते व कालांतराने नष्टही होते. किंबहुना या संस्कृतींची पाळेमुळे त्या शहराच्या भूमीत खोलवर रुजलेली असतात. या संस्कृतींच्या भग्न अवशेषातून आपल्याला त्या शहराच्या आजच्या विकासाची रूपरेखा ठरविण्यास मदत होते. त्यामुळेच प्राचीन स्थळांचा अभ्यास करणे किंवा त्याविषयी जाणून घेणे, हे महत्त्वाचे ठरते. वडनगर हे शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव असल्याने या शहराला राजकीय महत्त्व आहे. परंतु, त्या पलीकडे या शहराला स्वतःचा इतिहासदेखील आहे. हा इतिहास आपल्याला थेट इसवी सनपूर्व सातव्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत म्हणजेच या शहराचा गेल्या ३००० वर्षांत झालेला अविरत विकास दर्शवतो.

आणखी वाचा : विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?

वडनगर हे शहर नेमके कोठे आहे?

वडनगर उत्तर गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यात आहे. या शहराचे प्राचीन स्थान साबरमती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर होते. सद्यस्थितीत ही नदी शहराच्या आग्नेय दिशेला वाहते, तर दुसरी रूपेन नावाची नदी शहराच्या वायव्य दिशेला वाहते. असे असले तरी स्थानिक परंपरेनुसार हे शहर कपिला नावाच्या छोट्या नदीच्या उजव्या तीरावर वसले होते, ज्याचे रूपांतर मध्ययुगीन काळात शर्मिष्ठा तलावात झाल्याचे मानले जाते. अबुल फजल लिखित अकबराच्या आइन-ए-अकबरीत या शहराचा उल्लेख आढळतो, या उल्लेखानुसार या शहरात जवळपास ३६० पाण्याची कुंड होती आणि प्रत्येक कुंडावर एक पॅगोडा होता. वडनगर हे इंग्रजी एल (L) अक्षराच्या आकाराचे शहर आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शहराची रचना ही मध्ययुगीन काळात झाली आहे. विशेष म्हणजे या शहराचा इतिहास २७०० वर्षांपेक्षा जुना असून प्रत्येक काळात या शहरात वस्ती झाली होती. प्राचीन काळापासून आतापर्यंत सलग मानवी वस्तीचे पुरावे या शहरात सापडतात. म्हणूनच पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्राचीन वडनगरः व्यापारी तसेच बौद्ध संघाचे केंद्र

ऐतिहासिक संदर्भांनुसार हे ठिकाण प्राचीन व्यापारी मार्गावर आहे. प्राचीन भारतात समुद्र व भू -मार्गाने व्यापार होत असे. या दोन्ही स्वरूपाच्या व्यापारी मार्गांना जोडणाऱ्या शहरांच्या यादीत ‘वडनगर’चा समावेश होत होता. यातील एक मार्ग वायव्येकडील सिंध प्रांताकडे जाणारा होता तर दुसरा गुजरातमधील बंदरांना उत्तर भारताशी जोडणारा होता. प्राचीन भारतात हे शहर वृद्धनगर, अनर्तपूर, अनर्तपुरा, आनंदपूर, चमटकीरपूर, स्कंदपूर, नगरका अशा विविध नावांनी ओळखले जात होते. विशेष म्हणजे इसवी सनाच्या सहाव्या शतकात ह्युएन त्स्यांग या चिनी बौद्ध भिक्खूने या स्थळाला भेट दिली होती. तसेच त्याने या शहराबद्दल नोंदविलेल्या वर्णनात हजाराहून अधिक बौद्ध भिक्खू १० वेगवेगळ्या बौद्ध संघात असल्याचे नमूद केले होते. तसेच वडनगर हे पश्चिम भारतातील बौद्ध तत्वज्ञानाचे महत्त्वाचे केंद्र असल्याचेही त्याने नोंदविले आहे.

पश्चिम किनारपट्टी आणि धम्म

इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकापासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागाने बौद्ध धम्माच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणूनच भारतातील ८० टक्के बौद्ध लेणी – ऐतिहासिक बौद्ध संघ महाराष्ट्र- गुजरातसह पश्चिम भारतात आढळतात. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश बौद्ध स्थळे ही प्राचीन व्यापारी मार्गावर आहेत. बौद्ध धम्म व व्यापार यांचा घनिष्ट संबंध होता. प्राचीन भारतात बौद्ध धम्माला व्यापारी संघाचा आश्रय मोठ्या प्रमाणात होता, हा सिद्ध झालेला इतिहास आहे. वडनगर हे प्राचीन व्यापारी तसेच बौद्ध संघांचे शहर होते. त्यामुळे प्राचीन भारताच्या ऐतिहासिक व धार्मिक इतिहासात या शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मथुरेचा बोधिसत्त्व वडनगरमध्ये

१९९२ साली प्रथमच वडनगरमध्ये लाल वालुकाश्मात कोरलेली बोधिसत्त्वाची प्रतिमा सापडली. या बोधिसत्त्वाच्या प्रतिमेवर ही प्रतिमा ‘चैत्य सम्मतीयासाठी’ आणल्याचा अभिलेखीय संदर्भ आहे. तसेच या प्रतिमेची शैली ही मथुरा परंपरेतील आहे. या प्रतिमेच्या शोधामुळे या शहराचे व बौद्ध संघांचे असलेले नाते उघडकीस येण्यास मोलाची मदत झाली, असे अभ्यासक मानतात. याशिवाय नवीन उत्खननात गोलाकार स्तूप सापडला आहे. या स्तूपाची रचना व्यासपीठावर करण्यात आलेली असून सभोवती प्रदक्षिणा पथाची रचना असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

इंडो-रोमन व्यापारातील महत्त्व

या स्थळावरील उत्खननात रोमन पद्धतीचे चिकणमातीचे इंटॅग्लिओ मिळाले आहे. तसेच ग्रीको-इंडियन राजा अपोलोडोटस दुसरा याचे नाणे या ठिकाणी सापडल्यामुळे या शहराचा व रोमचा व्यापारी संबंध इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून होता, हे समजते. याशिवाय इतर मिळालेली मृद भांडी या परिसराचा ससानिड आणि पश्चिम आशियाशी असलेला संबंध स्पष्ट करतात.

मध्ययुगीन-आजचे तटबंदीयुक्त वडनगर

या शहराला असलेल्या प्राचीन तटबंदीचे अवशेष आजही आपण पाहू शकतो. सध्याच्या शहराची रचना ही मध्ययुगीन काळातील आहे. या शहराच्या संरक्षणाकरिता मध्ययुगीन काळात किल्ल्याची योजना करण्यात आली होती. या किल्ल्याची तटबंदी या संपूर्ण शहराला आहे. या तटबंदीमधून शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी सहा दरवाज्यांची सोय आहे. घणस्कोल, पिठोरी, नाडीओल, आमटोल, अमरथोल आणि अर्जुनबारी अशी या दरवाजांची नावे आहेत. या दरवाजांमधून जाणारे रस्ते मुख्य शहराला जोडतात. तसेच या संपूर्ण शहरात रस्त्यांचे जाळे आहे. लहान सहान गल्ल्यादेखील या रस्त्यांना जोडल्या गेल्या आहेत. रस्त्यांच्याकडेने दुकाने आहेत. त्यांचे दरवाजे थेट मुख्य रस्त्यावर उघडतात. हे शहर प्राचीन काळात कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होते. तसेच वडनगर वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहे. वेगवेगळे समाज, मंदिर, वस्त्यांनुसार त्या भागांचे नामकरण करण्यात आले आहे. वडनगरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या प्रामुख्याने धार्मिक आणि निवासी स्वरूपाच्या आहेत; त्यामध्ये हिंदू -जैन मंदिरे, हवेल्या, वाडे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. एकूणच या शहराची रचना मोठ्या व्यापारी शहरासारखी असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात.

पुरातत्त्वीय उत्खनन

वडनगर या शहरात प्रथम १९५३ साली महाराज सयाजीराव विद्यापीठामार्फत उत्खनन करण्यात आले. या शहराचा प्राचीन कालक्रम शोधण्याकरिता गुजरात पुरातत्त्व विभाग व त्यानंतर भारत सरकारचा पुरातत्व विभाग (एएसआय) यांनी २००६ पासून या भागात सर्वेक्षण व उत्खननासाठी सुरुवात केली होती. या उत्खनन व सर्वेक्षणाचे काम २०२२ सालापर्यंत सुरु होते. उत्खननातून या भागात व्यापारी समुदायांच्या व बौद्ध संघाच्या अस्तित्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. तसेच या उत्खननात सात कालखंड उघडकीस आले. समोर आलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून या स्थळाची प्राचीनता इसवी सनपूर्व सातव्या ते आठव्या शतकापर्यंत मागे जाते. उत्खननातून मिळालेल्या अवशेषात तटबंदी, बौद्ध मठ आणि स्तूप, लंबवर्तुळाकार रचना, इतर पुरातन वास्तू, सीलिंग, गृहसंकुल, गल्ल्या/रस्ते इत्यादींचा समावेश आहे. हे अवशेष इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते १८ व्या शतकातील गायकवाडांपर्यंतच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi village school vadnagar heritage buddhism svs
First published on: 10-06-2023 at 12:16 IST