Pune Porsche Accident Case पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मेच्या मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेतले. १९ मेच्या सकाळी आरोपीला ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यासाठी नेण्यात आले. गंभीर गुन्ह्यात आरोपीवर मद्य प्राशन केल्याचा संशय असल्यास पहिल्या दीड तासात त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. मात्र, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात साडेआठ तासांनी १९ मे रोजी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर तब्बल १८ तासांनी औंध रुग्णालयात सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. परिणामी प्राथमिक रक्त तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य आरोपी असलेल्या विशाल अगरवाल याच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात त्याला विशेष वागणूक देण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपी मुलाच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा खाण्यास दिला होता, अशीदेखील माहिती समोर आली. मद्यप्राशनानंतर एखाद्याने पाव आणि चीजचे सेवन केल्यास शरीरातील मद्यांशाचे म्हणजेच दारूचे प्रमाण कमी होते, असे सांगितले जाते. त्यामुळेच कुटुंबीयांनी त्याला पिझ्झा खाण्यास दिला असावा आणि त्याच्या रक्तातील मद्यांश कमी झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, यात किती सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ताने मुंबईतील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या निवृत्त संचालक डॉक्टर रुक्मिणी कृष्णमूर्ती यांच्याशी संवाद साधला. त्या देशातील अग्रगण्य फॉरेन्सिक एक्सपर्ट्सपैकी एक आहेत.

मद्यप्राशनानंतर एखाद्याने पाव आणि चीजचे सेवन केल्यास शरीरातील मद्यांशाचे म्हणजेच दारूचे प्रमाण कमी होते, असे सांगितले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : भारतात २५ वर्षांत दोनपैकी एक बालक ‘मायोपिया’ग्रस्त होण्याचा धोका; हा आजार किती गंभीर?

पाव आणि चीजचे सेवन केल्यास शरीरातील मद्यांशाचे प्रमाण कमी होते का?

एखाद्याने काही खाल्ल्यानंतर मद्य प्राशन केल्यास रक्तात विरघळणार्‍या मद्यांशाचे प्रमाण कमी होते. तसेच, मद्य प्राशन करताना काही खाल्यासही रक्तात विरघळणार्‍या मद्यांशाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अनेक लोक मद्य प्राशन करताना, त्याच्याबरोबर काहीतरी खातात. परंतु, वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचे झाल्यास मद्य प्राशन केल्यानंतर काहीही खाल्यास त्याचा मद्यांशावर परिणाम होत नाही.

नैसर्गिक विधी केल्यास मद्यांशाचे प्रमाण कमी होते का?

मद्यप्राशनानंतर दोन ते सहा तास रक्तातील दारूचे प्रमाण खूप जास्त असते. मात्र, त्यानंतर नैसर्गिक विधीद्वारे (वीर्य किंवा विष्ठा) त्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. त्यामुळेच अशा प्रकरणांमध्ये दोन तासांच्या आत रक्ताचे नमुने घेऊन, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

आरोपीने पिझ्झाचे सेवन केल्याने, त्याच्या शरीरातील मद्यांशाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली का?

वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य नाही. कारण – मद्य प्राशन केल्यानंतर काहीही खाल्यास त्याचा मद्यांशावर परिणाम होत नाही. त्यामुळे पाव असो किंवा चीज किंवा इतर कशाचेही सेवन केल्यास मद्यांशावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. केवळ मद्य प्राशन करताना किंवा करण्याअगोदर काही खाल्ल्यास रक्तात विरघळणार्‍या मद्यांशाचे प्रमाण कमी होते.

या प्रकरणात आतापर्यंत काय घडले?

पोर्श कार अपघात प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. मुख्य आरोपी विशाल अगरवाल याच्या मुलाने १९ मे रोजीच्या मध्यरात्री आपल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती; ज्यात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अगरवालला अटक केली. त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस चौकशी करीत आहेत. ५ जूनपर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे; जिथे त्याची मानसिक चाचणी केली जाईल. अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालविण्याची मागणीही करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी त्याच्याबरोबर कारमध्ये असणार्‍या इतर मित्रांचीही चौकशी केली जात आहे.

मुख्य आरोपी विशाल अगरवाल याच्या मुलाने १९ मे रोजीच्या मध्यरात्री आपल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : २ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?

आता अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे. “पोर्श कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हलनोर आणि ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. अजय तावरे यांच्या सूचनेनुसार रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आढळून आले”, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (ता. २७ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche accident blood report rac