Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये एका पोर्श मोटारीने दोघांना चिरडल्याची घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेत आली आहे. आलिशान मोटार चालविणारा चालक अल्पवयीन असून, त्याचे वय १७ वर्षे आहे. तो पुण्यातील एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या अल्पवयीन आरोपीने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडले. मात्र, या घटनेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याला जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, आरोपीने १५ दिवस येरवडा वाहतूक विभागात वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने ३०० शब्दांचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल, अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत. खरे तर जामीन देताना घातलेल्या या अटीमुळेच हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. अल्पवयीन आरोपी प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्यामुळेच त्याला लगेच जामीन मंजूर झाला का? अशी भावना लोकांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र, सध्या या अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला असला तरीही त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. कोणत्या कायद्यांतर्गत असे करण्यात आले, याविषयीची माहिती घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी काय म्हटले आहे?

प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा हा मुलगा दारूच्या नशेत मोटार चालवत होता. त्याने वाहतुकीचे नियम मोडत ज्या दोघांना उडवले, त्यापैकी अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला; तर अनिश अवधिया याला रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि सांगितले, “या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारचालकाने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिले, त्यांच्याविरोधातही कलम ७५ व ७७ अंतर्गत कारवाई केली जाईल.” आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे आणि बारचालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : विश्लेषण: म्हणे, ‘भगवान जगन्नाथही मोदींचे भक्त’; हा जगन्नाथ पंथ नेमका आला कुठून?

पोर्श मोटार विनाक्रमांक, विनानोंदणी

विशेष म्हणजे कल्याणीनगर येथे घडलेल्या या अपघातातील आलिशान पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर चालवली जात होती. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून, पुण्यात ही मोटार आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये या मोटारीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू करण्यात आली होती. परंतु, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलाने अपघाताच्या वेळी चालविलेली मोटार विनाक्रमांक व विनानोंदणी होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, अपघातग्रस्त मोटार मुंबईमधील विक्रेत्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. हा अपघात घडताना पोर्शे मोटारीचा वेग १७० किमी प्रतितास असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे घटनाक्रम?

या दुर्घटनेमुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुलाला अल्पवयीन न मानता, प्रौढ गृहीत धरूनच त्याच्यावर खटला चालवण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी (२१ मे) या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा हा मुलगा एका स्थानिक पबमध्ये बारावीचा निकाल लागल्याचा आनंद साजरा करीत होता. इथे तो भरपूर दारू प्यायला होता. पबमधून घरी जाताना त्याचे पोर्श मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि रात्री साधारण अडीच वाजता त्याने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील दोघांचाही या जबर अपघातात मृत्यू झाला.

अल्पवयीन आरोपी काय म्हणाला?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार, अपघातानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करताना या अल्पवयीन मुलाने सांगितले की, त्याने गाडी चालविण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसून, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानादेखील नाही. हे माहीत असूनही त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे पोर्श ही आलिशान मोटार सोपवली. तो दारूचे सेवन करतो, हे त्याच्या वडिलांनाही माहीत होते. तो रात्री मित्रांसोबत पार्टी करायला गेल्याचीही माहिती त्याच्या वडिलांना होती, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्यामधील FIR मध्ये नोंदविण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर पुणे शहर पोलिस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी अल्पवयीन मुलाला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ व ४२७ नुसार जीव धोक्यात घालून किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याशिवाय महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याशी संबंधित कलमांन्वयेही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

अल्पवयीन आरोपीचे वडील ताब्यात

पुणे पोलिसांनी मंगळवारी (२१ मे) अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे. मुलाकडून झालेल्या अपघातानंतर ते फरारी झाले होते. मात्र, अल्पवयीन मुलाकडे वाहन परवाना नसताना गाडी चालविण्यास, तसेच मद्यपान करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ व ७७ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ७५ हे मुलाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे किंवा मुलाला मानसिक किंवा शारीरिक आजार होईल, असे वर्तन करण्याशी संबंधित आहे; तर कलम ७७ लहान मुलाला दारू किंवा मादक पदार्थ पुरवण्याशी संबंधित आहे. त्याशिवाय पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला दारू पुरवल्याप्रकरणी कोसी रेस्टॉरंटचे मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि हॉटेल ब्लॅकचा मॅनेजर संदीप सांगळे यांना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारणारे संशोधन ICMR ने का धुडकावून लावले?

कायदा काय सांगतो?

या प्रकरणामध्ये मुलाला जामीन देऊन वडिलांना अटक का करण्यात आली, असा प्रश्न पडू शकतो. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ नुसार, अल्पवयीन मुलाने केलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत अल्पवयीन मुलांचे पालक दोषी धरले जातील. कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय न्याय संहितेनुसार ही शिक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलावर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल आणि त्या वाहनाची नोंदणी रद्द केली जाईल. या कायद्यांतर्गत या गुन्ह्यातील वाहनाची नोंदणी १२ महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द केली जाईल. तसेच वयाची २५ वर्षे होईपर्यंत तो वाहन परवाना मिळविण्यास पात्र राहणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche crash why father has been detained juvenile granted bail essay writing vsh