इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रईसी हे अझरबैजानमधून परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. अधिकाऱ्यांनी सोमवारी (२० मे) दिलेल्या माहितीनुसार, १७ तास उलटल्यानंतर शोध आणि बचाव पथकाला हे हेलिकॉप्टर सापडले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या निधनानंतर पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. रईसी यांच्या मृत्यूनंतर जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘X’ वर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, “इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. भारत आणि इराणचे संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि इराणच्या नागरिकांप्रति मी सहानुभूती व्यक्त करतो. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.” इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात म्हटले आहे, “दिवंगत नेत्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने २१ मे (मंगळवार) रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा ‘राष्ट्रीय दुखवटा’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.” मात्र, ‘राष्ट्रीय दुखवटा’ म्हणजे काय आणि तो कधी जाहीर केला जातो, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत.

हेही वाचा : कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारणारे संशोधन ICMR ने का धुडकावून लावले?

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?

देशात अथवा जगभरात एखादी दु:खद घटना घडल्यास त्याप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर केला जातो. हा दुखवटा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. सामान्यत: देशातील राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आणि अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर केला जातो. बरेचदा इतर देशांतील राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधानांच्या मृत्यूनंतरही देशाकडून दु:ख व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचा दुखवटा जाहीर केला जातो. मृत व्यक्तीप्रति राजकीय सन्मान व्यक्त करण्यासाठी हा ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर करण्यात येतो. याआधी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि कुवेतचे अमीर नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा पाळला होता.

इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा मृत्यू झाल्यास सामान्यत: एकाच दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो; तर भारतातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सात दिवसांपर्यंतही हा दुखवटा जाहीर केला जाऊ शकतो. त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयीचा निर्णय घेते.

भारतामध्ये राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात सरकारी कार्यालयांच्या इमारतींवर फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जातो. गृह मंत्रालयाकडून सर्व ठिकाणची राष्ट्रध्वज फडकविणारी पथके व कार्यालये यांना तत्काळ त्यासंबंधी सूचना देण्यात येतात. गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मंगळवारी राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात मनोरंजनाचे अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या निधनानंतर एक दिवसाचा ‘राष्ट्रीय शोक’ जाहीर केला आहे. ‘X’वर त्यांनी म्हटले आहे, “पाकिस्तान एक दिवस ‘शोक’ पाळणार आहे. राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या सन्मानार्थ इराणसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांच्या पार्श्वभूमीवर देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाईल.”

हेही वाचा : राजकारणी प्रवासासाठी हेलिकॉप्टरलाच पसंती का देतात?

भारतात आजवर कधी जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रीय दुखवटा?

१. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारताने पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

२. २०१८ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

३. २०१८ मध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

४. २०१८ मध्ये कुवेतचे अमीर नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

५. २०१९ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

६. २०१९ मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे निधन झाल्यानंतरही भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता.

७. २०२२ मध्ये भारतरत्न व भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

८. २०२२ मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाल्यानंतर भारत सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.