कोल्हापूर : उत्तरकार्याला पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना भांडी वाटप करण्याची प्रथा आहे. या अनाठायी खर्चाला पायबंद बसला पाहिजे, चुकीच्या प्रथा पडू नयेत यासाठी उत्तरकार्यादिवशी भांडी वाटपाला फाटा देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेत हापूस आंब्याची १५० रोपे भेट देण्याचा विधायक उपक्रम वाळवे खुर्द ( ता. कागल ) येथील संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी राबविला.

बाळासाहेब यांच्या आई सोनाबाई पाटील यांचे ४ मे रोजी निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जन दिवशी प्रचलित प्रथांना फाटा देत रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात टाकत त्यांनी जलप्रदुषण टाळले. त्यानंतर त्यांच्या उत्तरकार्याला आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. त्याला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनीही पाठिंबा दिला. बुधवारी त्यांचे उत्तरकार्य झाले. या वेळी आलेल्या नातेवाईक, पै-पाहुण्यांना व मित्रमंडळींना आंब्याची १५० रोपे भेट देण्यात आली. याशिवाय गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला आणि स्मशानभूमीतही वड तसेच पिंपळाची रोपे लावण्याचाही निर्णयही पाटील यांनी घेतला आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात एकाच वेळी तीन महिलांचे जटा निर्मूलन; आणखी एक पुरोगामी पाऊल

यावेळी माजी सरपंच शिवराज पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, मुदाळचे उपसरपंच के. ए. पाटील, रंगराव पाटील, माजी सरपंच आरती बाळासाहेब पाटील, सागर पाटील, डॉ. एम. ए. पाटील, सर्जेराव सोनाळकर, दिलीप वाडकर, प्रमोद काळे, यशवंत शेणवी, सतीश माने यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

आंबा झाडच का?

आंब्याचे झाड आहे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. आम्रवृक्ष सदाबहार, सदाहरीत आणि विपुल फळे दिणारा आहे. हा वृक्ष कधी निष्पर्ण होत नाही. देवपूजेत आणि मंगल कार्यात त्याला विशेष महत्व आहे. संसारवृक्ष बहरावा या भावनेतून विवाह प्रसंगी आंब्याचे महत्व आहे. आंबा संततीदायी आहे. पुत्र प्राप्तीसाठी या वृक्षाची पूजा करतात. थोर विभूती किंवा सत्पुरुष पुत्र व्हावा म्हणून स्त्रियांच्या ओटीत आंबा प्रसाद म्हणून देतात. आंब्याने सुवासिनींची ओटी भरतात. अधिकमास आणि दशहरात आंब्याचे वाण देण्याची पद्धत आहे.आमराईत गारवा आणि प्रसन्नता मिळते. गर्भवती स्त्रीचे आमराईत डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे.

हेही वाचा : कोल्हापुरातील अनधिकृत होर्डिंग्जची संख्या एका रात्रीत वाढली; १७ होर्डिंग हटवले

अर्थाजनाच्या दृष्टीने आंब्याचे महत्व खूप आहे. कैरीचे लोणचे, मुरंबे, आंबापोळी, कैरीचे सरबत, आंब्याचा गोळा, आंबा बर्फी असे विविध पदार्थ आंब्यापासून केले जातात. खेड्यात अनेक ठिकाणी महिला गटातर्फे हे पदार्थ केले जातात. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यात या वृक्षाचा वाटा आहे. आम्रवृक्ष शुभ, पवित्र, मांगल्यादर्शक आणि आरोग्यदायी आहे.

हेही वाचा : आंदोलनानंतर कोल्हापूर महापालिकेला जाग; ३० मे पूर्वी केवळ पाच रस्ते पूर्ण करण्याचे ठेकेदारास आदेश

आईच्या आठवणी आम्रवृक्षात

आईच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी तिच्या उत्तरकार्याला भांडीवाटप न करता आम्ही आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संवर्धनासाठीही वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याने आम्ही राबविलेल्या या उपक्रमातून हातभार लागण्यास मदत होणार असून आईच्याही स्मृती जतन होणार आहेत. – बाळासाहेब पाटील, विभागीय अध्यक्ष संभाजी बिग्रेड.