कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशु खाद्य प्रकल्पातील पाण्याची टाकी स्वच्छ करीत असताना रविवारी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. सुनील कांबळे (रा. वसगडे, वय ६० ) असे कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा – गुजरातचा ऊसदर महाराष्ट्राला पेलणार का? शरद जोशी शेतकरी संघटनेचा प्रश्न, यंदाही दरात गुजरातचा गणदेवी सर्वोच्च

हेही वाचा – एकाच कुटुंबातील पाचजण नृसिंहवाडीत नदीत बुडाले; वजीर रेस्क्यूच्या जवानांनी वाचवले प्राण

गोकुळ दूध संघाचा गडमुडशिंगी येथे महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्प आहे. या ठिकाणी २५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. ती बंद अवस्थेत होती. ती वापरात आणण्याच्या दृष्टीने दुरुस्ती करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी एका कंत्राटदाराकडे काम सोपवले होते. कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी काल सायंकाळी टाकी स्वच्छ केली होती. तेथे स्वच्छतेसाठी आवश्यक काही रसायने टाकली होती. आज सकाळी चार कर्मचारी पाण्याच्या टाकीत उतरले. रसायनांचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने त्यांचा श्वास कोंडला गेला. ते गुदमरू लागले. ही बाब तेथे उपस्थित असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन चौघांना टाकीतून बाहेर काढले. यादरम्यान सुनील कांबळे या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अन्य तिघांना ऍस्टर आधार रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.