काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या बांगलादेशने त्याच स्पर्धेत सेमी फायनल गाठणाऱ्या न्यूझीलंडला सिल्हेट कसोटीत हरवण्याची किमया केली. चौथ्या डावात ६ विकेट्स पटकावणारा तैजुल इस्लाम विजयाचा शिल्पकार ठरला. कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी बांगलादेशला विजयासाठी ३ विकेट्सची आवश्यकता होती. गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत दीड तासात संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्ल्डकप संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशच्या छोटेखानी दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिल्याच कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडसारख्या अव्वल संघाला हरवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ कसोटी सामने झाले आहेत. बांगलादेशचा न्यूझीलंडविरुद्धचा हा दुसराच कसोटी विजय आहे. गेल्या वर्षी माऊंट मांघनाई या ठिकाणी झालेल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडला नमवण्याची किमया केली होती.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने ३१० धावांची मजल मारली. सलामीवीर महमदुल हसन जॉयने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. त्याचा अपवाद वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडतर्फे अष्टपैलू ग्लेन फिलीप्सने ४ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने केन विल्यमसनच्या शतकाच्या बळावर ३१७ धावा करत नाममात्र आघाडी घेतली. केन विल्यमसनने कसोटी कारकीर्दीतलं २९वं शतक झळकावताना ११ चौकारांसह १०४ धावांची खेळी केली. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने ४ तर मोमिनुल हकने ३ विकेट्स पटकावल्या.

बांगलादेशने या अल्प आघाडीवर कळस चढवत ३३८ धावांची मजल मारली. कर्णधार नजमुल होसेन शंटोने शतकी खेळी साकारली. कर्णधारपदाच्या पदार्पणात शतकी खेळी करणारा शंटो बांगलादेशचा पहिला कर्णधार ठरला. शंटोने १०चौकारांसह १०५ धावांची खेळी साकारली. मुशफकीर रहीमने ६७ तर मेहदी हसन मिराझने ५० धावा करत शंटोला साथ दिली. न्यूझीलंडतर्फे एझाझ पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स पटकावल्या. बांगलादेशने न्यूझीलंडसमोर ३३२ धावांचं लक्ष्य दिलं.

या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्याच षटकात टॉम लॅथमला गमावलं. अनुभवी केन विल्यमसन ११ धावा करुन तंबूत परतला. हेन्री निकोल्स २ धावा करुन माघारी परतला. डेव्हॉन कॉनवेने चिवटपणे प्रतिकार केला. पण तैजुलने त्याचा प्रतिकार संपुष्टात आणला. यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल ६ धावाच करु शकला. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ग्लेन फिलीप्स १२ धावा करुन बाद झाला. डॅरेल मिचेलने एका बाजूने लढा देत ५८ धावांची खेळी केली. कर्णधार टीम साऊदीने १ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने ६ विकेट्स पटकावल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh stun new zealand in sylhet test by 150 runs psp