टोरंटो : भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने गेल्या फेरीतील पराभवातून सावरताना जोरदार पुनरागमन केले आणि ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत अमेरिकेच्या दुसऱ्या मानांकित हिकारू नाकामुराला पराभूत केले. या स्पर्धेत विदितचा हा नाकामुरावरील दुसरा विजय होता. खुल्या विभागातील अन्य तीनही लढती बरोबरीत सुटल्या, ज्यात डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद या भारतीयांमधील लढतीचाही समावेश होता.

रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. तर अझरबैजानच्या निजात अबासोवने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. या स्पर्धेच्या आता पाच फेऱ्या शिल्लक असून नेपोम्नियाशी आणि गुकेश प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत. प्रज्ञानंद त्यांच्यापेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे. नाकामुरा, विदित आणि कारुआना ४.५ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. फिरुझा ३.५ गुणांसह सातव्या, तर अबासोव तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा >>> इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन

पहिल्या टप्प्यात नाकामुराला नमविणाऱ्या विदितने दुसऱ्या टप्प्यातही उत्कृष्ट खेळ केला. आठव्या फेरीत गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर नवव्या फेरीतही विदितने इटालियन पद्धतीनेच सुरुवात केली. यानंतर विदितने चांगल्या चाली रचताना नाकामुराला अडचणीत आणले. यामधून नाकामुरा बाहेर पडू शकला नाही आणि अखेर त्याने हार मान्य केली.

गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी एकमेकांविरुद्ध चांगला खेळ केला. अखेर दोघांनाही विजयाची संधी दिसत नसल्याने ४१ चालींनंतर त्यांनी बरोबरीवर समाधान मानले. फिरुझाविरुद्ध काळया मोहऱ्यांनिशी खेळताना नेपोम्नियाशी अडचणीत होता. मात्र, कठीण स्थितीतून बाहेर येत त्याला बरोबरी नोंदवण्यात यश मिळाले. अन्य सामन्यात, अबासोवने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना कारुआनाला कोणतीच संधी दिली नाही. अखेर ही लढतही बरोबरीतच राहिली.

महिला विभागात, भारताच्या आर. वैशालीला चीनच्या टॅन झोंगीने अवघ्या २१ चालींत पराभूत केले. वैशालीचा हा सलग चौथा पराभव होता. या विजयासह झोंगीने सहा गुणांसह आघाडी मिळवली आहे. झोंगी आणि वैशाली यांच्यातील लढत सोडल्यास अन्य लढती या बरोबरीत राहिल्या. भारताच्या कोनेरू हम्पीने रशियाच्या कॅटेरिना लायनोला रोखले. नवव्या फेरीच्या निकालांनंतर ले टिंगजी आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना ५.५ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. लायनो पाच गुणांसह चौथ्या स्थानी आहे. हम्पी आणि नुरग्युल सलिमोवा चार गुणांसह संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहेत. अ‍ॅना मुझिचुक ३.५ गुणांसह सातव्या स्थानी आहे. वैशालीचे २.५ गुण असून ती आठव्या आणि अखेरच्या स्थानी आहे.

फिरुझाचा पंचांवर आरोप

गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अलिरेझा फिरुझाने आपल्याला पंचांनी विचलित केले, असा आरोप ‘एक्स’च्या माध्यमातून केला आहे. बुद्धिबळापेक्षा फॅशनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या फिरुझाने आवाज करणारे बूट घातले होते. त्याचा इतर खेळाडूंना त्रास होईल म्हणून पादत्राणे बदल किंवा हिंडू नकोस असे पंचांनी त्याला बजावले. त्यामुळे आपण विचलित झालो (आणि थोडक्यात नेपोम्नियाशीविरुद्ध जिंकलो नाही) असा दावा एकेकाळी जगज्जेत्याचा वारसदार समजला जाणाऱ्या फिरुझाने केला.

नवव्या फेरीचे निकाल

’ खुला विभाग : डी. गुकेश (एकूण ५.५ गुण) बरोबरी वि. आर. प्रज्ञानंद (५ गुण), विदित गुजराथी (४.५) विजयी वि. हिकारू नाकामुरा (४.५), अलिरेझा फिरुझा (३.५) बरोबरी वि. इयान नेपोम्नियाशी (५.५), निजात अबासोव (३) बरोबरी वि. फॅबियानो कारुआना (४.५)

 ’ महिला विभाग : आर. वैशाली (२.५) पराभूत वि. टॅन झोंगी (६), ले टिंगजी (५.५) बरोबरी वि. नुरग्युल सलिमोवा, कॅटेरिना लायनो (५) बरोबरी वि. कोनेरू हम्पी (४), अ‍ॅना मुझिचुक (३.५) बरोबरी वि. अलेक्झांड्रा गोर्याचकिना (५.५).

नवव्या फेरीअंती नेपोम्नियाशी आणि गुकेश यांनी संयुक्त आघाडी कायम राखली आहे. मात्र, गुकेश जितका भक्कम खेळतो आहे, तितकाच नेपोम्नियाशी डळमळीत वाटतो आहे. आठव्या फेरीत शेवटच्या क्रमांकावरील अबासोवला न हरवता आल्यामुळे नाराज भासणाऱ्या नेपोम्नियाशीला नवव्या फेरीत फिरुझाविरुद्ध पराभव टाळण्यासाठी शिकस्त करावी लागली. गुणतालिकेत अखेरच्या दोन स्थानांवरील खेळाडूंना हरवू न शकणाऱ्या नेपोम्नियाशीला पुढील सर्व डाव स्पर्धेत दर्जेदार खेळ केलेल्या खेळाडूंविरुद्ध लढावे लागणार आहेत. नवव्या फेरीत विदितने कमाल केली. जगातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये कायम राहिलेल्या नाकामुराला एकाच स्पर्धेत दोन वेळा हरवणे सोपे नाही, पण विदितने ते सहज शक्य केले. आठव्या फेरीत अग्रमानांकित फॅबियानो करुआनाला हरवल्यामुळे आणि विदित हा गुकेशकडून पराभूत झाल्यामुळे नाकामुराच्या स्वत:कडून अपेक्षा वाढल्या असणार. त्याने विदितला ओळखले नव्हते. बघता बघता विदितने राजावर स्वारी केली आणि नाकामुराला शरण आणले. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक