रघुनंदन गोखले

टोरंटो (कॅनडा)  येथे सुरू असलेली ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा विविध कारणांनी वेगळी आणि ऐतिहासिक ठरते आहे. ‘कॅन्डिडेट्स’मध्ये प्रथमच तीन भारतीय बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे. तसेच या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात तीन स्पर्धक कधीही आघाडीवर नव्हते. यंदा शेवटच्या विश्रांतीच्या दिवशी आणि केवळ दोन फेऱ्या शिल्लक असताना गतविजेता रशियाचा इयान नेपोम्नियाशी, स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू भारताचा डी. गुकेश, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असा अमेरिकेचा हिकारू नाकामुरा असे तीन विविध खंडांतील खेळाडू संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत. यापैकी कोण जिंकेल हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही.

१२व्या फेरीतील गुकेशच्या नितांत सुंदर विजयानंतर अनेक वेळा महिला विश्वविजेती राहिलेली सुझान पोल्गार म्हणाली, ‘‘भारताकडे असंख्य तरुण बुद्धिबळपटू आहेत, पण गुकेशचा खेळ बघता तो सर्वांना मागे टाकून खूप पुढे जाईल. फक्त १७ वर्षांचा असलेल्या गुकेशच्या खेळात जी परिपक्वता आहे, ती त्याच्या वयाच्या अन्य खेळाडूंत क्वचितच आढळते. त्याने आपल्या मनावर इतके प्रभुत्व मिळवलेले आहे की त्याचे मन ऐनवेळी कच खात नाही. तो निडर आहेच पण त्याच्याकडे उच्च दर्जाची प्रतिभासुद्धा आहे.’’ सुझानने स्वत:च्या लहान बहिणीला (तब्बल २५ वर्षे जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून राज्य करणाऱ्या ज्युडिथला) जवळून पाहिल्यामुळे ती जन्मजात प्रतिभा म्हणजे काय हे सहज सांगू शकते.

हेही वाचा >>> विनेश, अंशु, रितिकाला ऑलिम्पिक कोटा

१२व्या फेरीत निजात अबासोवला सहज हरवले असले तरी गुकेश जराही शेफारून गेला नव्हता. त्याने सरळ सांगितले की, मी आता माझ्या मनावर आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यायला लागलो आहे. माझ्यावर आता कोणतेही दडपण येत नाही. विश्रांतीच्या दिवसानंतर १३व्या फेरीत गुकेशची गाठ पडेल ती अलिरेझा फिरुझाशी. सहाव्या फेरीत फिरुझाने गुकेशला पराभूत केले होते. त्यामुळे या वेळी गुकेश सावध खेळ करेल. मात्र, त्याच्याकडे पांढऱ्या मोहऱ्यांचा वरचष्मा असेल.

हिकारू नाकामुराने जोरदार पुनरागमन केल्यामुळे त्याचे अमेरिकन चाहते सुखावले आहेत. जन्माने जपानी असणाऱ्या हिकारूच्या आईने तो लहान असतानाच अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. बुद्धिबळ म्हणजेच सर्वस्व असणाऱ्या हिकारूने लग्नही अतोषा पौरकाशियन नावाच्या इराणी बुद्धिबळपटूशी केले. दिवसभर त्याची काहीना काहीतरी बुद्धिबळविषयक धामधूम सुरू असते. १६ तारखेला विश्रांतीच्या दिवशी आराम करण्यापेक्षा हिकारूने एक विद्युतगती ऑनलाइन स्पर्धा नुसती खेळलीच नाही, तर त्यामध्ये तो विजेताही ठरला. प्रत्येक डाव संपल्यावर हिकारू त्या डावाचे विश्लेषण आपल्या चाहत्यांसाठी ‘युटय़ूब’वर करतो, मग भले त्या डावात त्याने विजय मिळवलेला असो वा नसो. हिकारूला पुढील दोन डाव नेपोम्नियाशी आणि गुकेश यांच्याशी खेळायचे आहेत.

प्रज्ञानंद आणि विदित आता मागे पडले आहेत, पण त्या दोघांनी सुंदर खेळ केला आणि मॅग्नस कार्लसनचा अंदाज खोटा ठरवला. मॅग्नसला अपेक्षा होती की भारतीय शेवटच्या क्रमांकावर येतील. मात्र, त्याला खोटे ठरवून भारतीय खेळाडूंनी टोरंटोमध्ये भारताची मान उंचावली आहे. प्रज्ञानंदची मोठी बहीण वैशालीने चार डाव हरल्यावर लागोपाठ तीन डाव जिंकून सगळयांची वाहवा मिळवली आहे. सात डावांत एकही बरोबरी नसणे हा ‘कॅन्डिडेट्स’मधील एक विक्रम असावा. आता उरलेल्या दोन फेऱ्या उत्कंठावर्धक ठरतील आणि त्यात गुकेश विजयी होऊन विश्वनाथन आनंदनंतरचा भारताचा पहिला आव्हानवीर ठरेल अशी सगळयाच क्रीडाप्रेमींना आशा असेल.

तेराव्या फेरीच्या लढती

’खुला विभाग : विदित गुजराथी (५) वि. निजात अबासोव (३), डी. गुकेश (७.५) वि. अलिरेझा फिरुझा (४.५), आर. प्रज्ञानंद (६) वि. फॅबियानो कारुआना (७), इयान नेपोम्नियाशी (७.५) वि. हिकारू नाकामुरा.

’महिला विभाग : टॅन झोंगी (८) वि. अलेक्झांड्रा गोर्याचकिना (६), कोनेरू हम्पी (६) वि. अ‍ॅना मुझिचुक (४.५), आर. वैशाली (५.५) वि. ले टिंगजी (७.५), नुरग्युल सलिमोवा (४.५) वि. कॅटेरिया लायनो (६).

(लेखक बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)